Home Health Bhandup Fire । ड्रीम मॉलमधील आग 30 तासानंतर आटोक्यात, 11 रुग्णांचा घेतला...

Bhandup Fire । ड्रीम मॉलमधील आग 30 तासानंतर आटोक्यात, 11 रुग्णांचा घेतला जीव

कुलिंग प्रक्रिया आणि सर्च ऑपरेशन सुरू

मुंबई ब्युरो : भांडुप येथील ड्रीम मॉल येथे लागलेल्या आगीला 30 तास उलटून गेले आहेत. आगीवर पूर्णपणे आता नियंत्रण मिळविण्यात आले असून आता कुलिंग प्रक्रिया आणि सर्च ऑपरेशन सुरू आहे.आता पर्यंत या अग्नितांडवाने 11 रुग्णांचा जीव घेतला आहे.

भांडुपच्या ड्रीम मॉलमधील सनराईज रुग्णालयात हे रुग्ण कोरोनावर उपचार घेत होते. गोविंदलाल दास(80) , झवेरचंद निसार(74), राजेंद्र मुणगेकर(66), सुनंदा बाई आबाजी पाटील(58) त्यांचे पती आबाजी पाटील(65), सुधीर लाड(66), मंजुलाबेन बारभाई(86), श्याम भक्तानी(75), महादेवन अय्यर(79), हरीश सचदेव(60) आणि एक अज्ञात पुरुष असे एकूण 11 जणांचा मृत्यू झाला आहे. आता या ठिकाणी अग्निशमन दलाचे सर्च ऑपरेशन सुरू आहे. शेकडो दुकाने खाक झाली असून मॉल बेचिराख झाला आहे.तीस तास उलटून गेल्यावर आगीवर नियंत्रण मिळविले असले तरी सर्व खाक झाले आहे.

भांडुपच्या ड्रीम मॉलला लागलेल्या आगीत सनराईज रुग्णालयात कोरोनाचे उपचार घेणाऱ्या 11 जणांचा मृत्यू झाला. मात्र या आगीला मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी दोषी असल्याचे फलक शिवसेनेचे संजय दीना पाटील यांनी लावले आहेत. त्यांनी सदर मॉल आणि रुग्णालय च्या अग्निसुरक्षा उपायाबाबत पालिकेला ऑक्टोंबर महिन्यात लिहिलेले पत्र या फ्लेक्सवर लावले आहे. तर दलालीचा बाबू करतात माणसाची होळी असा मथळा या फ्लेक्सला देण्यात आला आहे. हे फ्लेक्स ड्रीम मॉलच्या गेटसह आजू बाजूच्या परिसरात लावण्यात आले आहेत.

हा मॉल शापित मॉल असल्याचे देखील बोलले जात आहे. मुंबईत काही दिवसांपूर्वी मॉलचा सर्व्हे झाला होता. यात 29 मॉलमध्ये फायर यंत्रणा योग्य नसल्याचं समोर आलं होतं. यात भांडुप येथील या ड्रीम मॉलचा समावेश होता. पालिकेने या मॉलला सुद्धा नोटीस बजावली होती, अशी माहिती आहे. दरम्यान हा मॉल शापित प्रॉपर्टी आहे. निर्माण झाल्यापासून तो कधीच सुरू झाला नाही. एचडीआयएल ने तो बांधला आहे. आशियातील सर्वात मोठा मॉल होता. पण केसेस सुरू झाल्या आणि तो सुरूच झाला नाही. 10 ते 15 वर्ष मॉल असाच रिकामा आहे, त्यात मल्टिप्लेक्स फक्त सुरू आहे, त्यात हे हॉस्पिटल कसे सुरू झाले हा पण प्रश्न आहे. सगळ्यात जास्त अनधिकृत धंदे करणारी कार्यालयंही याच मॉलमध्ये आहेत, असं सांगितलं जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here