पुणे ब्युरो : पुण्यातील प्रीती म्हस्के नावाच्या महिला सायकलपटूने मुंबई- चेन्नई- कोलकत्ता- दिल्ली आणि परत मुंबई असा सुमारे 6000 किलोमीटरचा प्रवास सायकलने पार करत विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. त्यांनी हे अंतर अवघ्या 24 दिवस 6 तासांत पूर्ण करून नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. आज या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. मुंबई- चेन्नई- कोलकत्ता- दिल्ली – मुंबई या प्रवास मार्गाला Indian Golden Quadrilateral म्हणून ओळखलं जातं. हे 6000 किमीचं अंतर पूर्ण करणाऱ्या प्रीती म्हस्के या जगातली पहिली आणि एकमेव महिला ठरल्या आहेत.
यापूर्वी फक्त दोन पुरुष सायकलपटूंनी हा अक्रॉस द इंडिया लाँग सायकल ट्रॅक पूर्ण केला होता. प्रीती म्हस्के यांनी 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 6.50 वाजता या प्रवासाला सुरुवात केली होती. त्यांनी हा 6000 किमीचा सायकल प्रवास 23 मार्च रोजी दुपारी 1 वाजता पूर्ण केला आहे. 43 वर्षीय प्रीती म्हस्के या अल्ट्रा रनर, सायकलिस्ट आणि ट्रेकरही आहेत. यापूर्वी त्यांनी एव्हरेस्ट बेस कॅम्प हा अवघड ट्रेक पूर्ण केला आहे. त्याचबरोबर मुंबई ते पुणे रनिंगही केलं आहे.
याव्यतिरिक्त त्यांनी पुणे ते पाचगणी हे 101 किलोमीटरचं अंतर 15 तासात धावत पूर्ण केलं आहे. या मार्गातील तीन मोठे घाटही त्यांनी यावेळी सर केली आहेत. त्याचबरोबर सिंहगड – राजगड – तोरणा हा 52 किलोमीटरचा अवघड अल्ट्रा रनही त्यांनी पूर्ण केला आहे. तसेच नाशिक ते अमृतसर हे 1600 किलोमीटरचं अंतर त्यांनी 5 दिवसात पूर्ण केलं आहे. शिवाय 20 तासात 10 वेळा सिंहगड चढून half retesting पूर्ण केलं आहे.
सायकलिंगमध्ये प्रीती म्हस्के यांनी अनेक पराक्रम आपल्या नावावर नोंदवले आहेत. गेल्या वर्षी त्यांनी कश्मीर ते कन्याकुमारी हे 3800 किलोमीटरचं अंतर सायकलवरून अवघ्या 18 दिवसात पूर्ण केलं होतं. त्यानंतर यावर्षी प्रीती यांनी देशातली 4 महत्त्वाच्या शहरांना जोडणारा 6 हजार किमीचा गोल्डन रन पूर्ण केला आहे. दरम्यान त्यांना ऊन, वारा, पाऊस, वाहतूक कोंडीचा अशा सर्व प्रकराच्या अडथळ्यांचा सामना करावा लागला आहे. या प्रवासात त्यांच्या देखभालीसाठी एक एक्सपर्ट टिमही होती.