Home Maharashtra Maharashtra । अखेर एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझेंना अटक

Maharashtra । अखेर एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझेंना अटक

मुंबई ब्युरो : मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली जीप आढळली. नंतर या गाडीच्या मालकाचा मृतदेह मुंब्य्राच्या खाडीत आढळून आला. हे प्रकरण मग विधानसभेत विरोधकांनी उचलून धरलं. यात नाव समोर आलं ते एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं. सचिन वाझे यांना काल रात्री उशीरा एनआयएकडून अटक करण्यात आली.
सचिन वाझे यांना अटक

काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटकं आढळली होती. याप्रकरणी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी वाझे यांना अटक केल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली आहे. अटकेपूर्वी तब्बल 13 तास सचिन वाझे यांची एनआयएकडून चौकशी करण्यात आली. सचिन वाझे काल सकाळी 11 वाजताच एनआयएच्या कार्यालयात हजर झाले होते, तेव्हापासून त्यांची चौकशी सुरु होती. जवळपास 13 तासांच्या चौकशीअंती एनआयएने त्यांना अटक केली. आज (14 मार्च) सकाळी 11 च्या सुमारास त्यांना कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता आहे.

स्फोटकांनी भरलेली जीप आढळल्याने खळबळ

भारतातील श्रीमंत उद्योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली जीप आढळल्याने खळबळ उडाली होती. मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाजवळ जिलेटिनचा साठा सापडला. मुंबई पोलीस, फॉरेन्सिक टीम, आणि श्वानपथकं घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे. या स्फोटकांसह एक चिठ्ठीही सापडली असून त्यामधून घातपाताची धमकी दिल्याचं समजतं. पोलीस आणि तपास यंत्रणांकडून सीसीटीव्ही फूटेज तपासण्याचं काम सुरु आहे. मुकेश अंबानी यांचं अँटिलिया हे निवासस्थान हे पेडर रोडवर आहे. हा उच्चभ्रू परिसर आहे. दरम्यान काल मध्यरात्री एक वाजता अँटिलियाजवळ ही स्कॉर्पिओ कार पार्क केल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फूटेजमधून समोर आलं होतं.

देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत उपस्थित केला मुद्दा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. मुकेश अंबानी यांच्यासारखे उद्योजक सुरक्षित नाहीत. त्यांच्या घराबाहेर आढळलेली जिलेटिनने भरलेली गाडी आणि संपूर्ण घटनाक्रम संशय निर्माण करणारा आहे. त्यामुळे तपास एनआयएकडे सोपवावा अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. सोबतच या प्रकरणात त्यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. फडणवीस यांनी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर पार्क केलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणावर अनेक प्रश्न उपस्थित केले.

मनसुख यांचा मृतदेह आढळला

या प्रकरणात खळबळ उडाली ती मनसुख हिरण यांचा मृतदेह आढळल्यानंतर. हिरण यांचा मृतदेह मुंब्य्राच्या खाडीत आढळला. या प्रकरणी महाराष्ट्र एटीएसने हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मनसुख यांच्या पत्नी विमला हिरेन यांच्या फिर्यादीवरुन हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास दहशतवादविरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला. ज्यावेळी एटीएसचं पथक मनसुख यांच्या घरी चौकशीसाठी दाखल झालं होतं. त्यावेळी मनसुख यांची आत्महत्या नसून हत्या झाली असल्याचा आरोप हिरण यांच्या कुटुंबियांनी केला होता. अखेर विमला यांच्या फिर्यादिवरुन मनसुख हिरण प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाझेंकडून सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज

मनसुख हिरण मृत्यू प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले पोलीस आधिकारी सचिन वाझे यांची क्राईम ब्रान्चमधून बदली करण्यात आली आहे. आता या प्रकरणात एपीआय सचिन वाझेंकडून सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला. 19 मार्च रोजी त्यांच्या या अर्जावर सुनावणी होणार आहे. काल वाझे यांनी ठाण्यातील सेशन कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला.

वाझे यांची बदली

दरम्यान या प्रकरणात चर्चेत असेलेले पोलीस आधिकारी सचिन वाझे यांची क्राईम ब्रान्चमधून बदली करण्यात आली. वाझे यांची नागरी सुविधा केंद्रात बदली करण्यात आली. पोलीस मुख्यालयातून सचिन वाझे यांच्या बदलीसंदर्भात आदेश काढण्यात आले.

सचिन वाझेंचं व्हॉट्सअॅप स्टेटस

काल समोर आलेल्या सचिन वाझेंच्या व्हॉट्सअॅप स्टेटसनं खळबळ उडाली. ‘जगाला गुड बाय म्हणायची वेळ आलीय, आता माझ्याकडे पेशन्स नाहीत’, अशा आशयाचं व्हॉट्सअॅप स्टेटस सचिन वाझेंनी ठेवलं होतं. सचिन वाझेंनी ठेवलेल्या व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये म्हटलं की, 2004 मध्ये त्यांना सीआयडीनं अशाच चुकीच्या पद्धतीनं अटक केलं होतं. माझ्या सहकारी कर्मचाऱ्यांनी मला फसवलं होतं. मात्र त्यावेळी माझ्याकडं 17 वर्षांच्या अपेक्षा आणि नोकरी बाकी होती आणि पेशन्स देखील होते. मात्र आता माझ्याकडे ना 17 वर्षांचं आयुष्य आहे ना सहनशक्ती आहे ना नोकरी आहे. त्यामुळं जगाला गुड बाय म्हणायची वेळ आली आहे, असं सचिन वाझेंनी म्हटलं. 17 वर्षांपूर्वीही मला फसवण्याचा प्रयत्न केला होता, तो आता दुसऱ्यांदा होतं आहे. ही स्टोरी चुकीची आहे. या सर्व गोष्टी राजकीय दबावापोटी आणि मीडिया ट्रायलमुळं होत आहेत. 4 आणि 5 मार्च रोजी मी साऊथ मुंबईमध्ये होतो आणि मनसुख हिरण ठाण्यात होता आणि त्याची बॉडी मुंब्य्रात मिळाली, असंही वाझेंनी म्हटलं.

Previous articleBusiness | बिग बास्केट में 64.3 फीसदी हिस्सेदारी खरीदेगा टाटा ग्रुप
Next articleIPL 2021 | आईपीएल से पहले बौद्ध भिक्षुओं जैसे अवतार में नजर आए धोनी
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).