Home कोरोना Buldana । स्वॅब न देताच रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह; मोताळा कोविड सेंटरमधील अजब...

Buldana । स्वॅब न देताच रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह; मोताळा कोविड सेंटरमधील अजब प्रकार

बुलडाणा ब्युरो : कोरोनाची चाचणी न करता तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असा मेसेज तुम्हाला आला तर… असा अनुभव नुकताच बुलडाणा जिल्ह्यातील पंडितराव देशमुख यांना आला आहे. बुलडाण्यातील मोताळा येथील कोविड सेंटरमध्ये 25 फेब्रुवारी रोजी पंडितराव देशमुख यांना अस्वस्थ वाटत असल्याने ते मोताळा येथील कोविड सेंटरमध्ये तपासणी करण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी त्यांनी केवळ आपली नाव नोंदणी केली. त्यानंतर संबंधित डॉक्टरांनी पंडितराव देशमुख यांना दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता तपासणीसाठी वेळ दिला. मात्र ते या ठिकाणी परत तपासणीसाठी गेलेच नाही.

त्यानंतर काल कोविड सेंटरमधून त्यांना फोनद्वारे सांगण्यात आले की तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तुम्ही कोरोना सेंटरमध्ये यावे आणि उपचार घ्यावे. कोरोनाचा स्वॅब न देताच रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने पंडितराव यांना धक्का बसला. आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह कसा? असा प्रश्न त्यांना पडला आहे. त्यांनी मोताळा येथील कोरोना सेंटरमध्ये जाऊन याबाबत विचारणा केली असता त्यांना उडवा उडवीचे उत्तरे मिळाली.

मोताळा येथील कोरोना सेंटरमध्ये काय सुरु आहे ,याचा यावरून अंदाज बांधता येऊ शकतो. रुग्णाचा स्वॅब न देता या मोताळा येथील कोरोना सेंटरमध्ये रुग्ण पॉझिटिव्ह येतात तरी कसे? याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रविंद्र पूरी यांना विचारणा केली असता त्यांनी सॅम्पल कन्टेनरला चुकून दुसऱ्याचं नाव टाकलं गेले असल्याची चूक कबुल केली. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांवर चालणाऱ्या जिल्ह्यातील कोविड सेंटर कशी चालतात अशा प्रश्न निर्माण झाला आहे.