Home मराठी Nagpur । राष्ट्रीय सुरक्षा दिनानिमित्त मनपाच्या अधिकारी व कर्मचा-यांनी काढली सायकल रॅली

Nagpur । राष्ट्रीय सुरक्षा दिनानिमित्त मनपाच्या अधिकारी व कर्मचा-यांनी काढली सायकल रॅली

नागपूर ब्युरो : राष्ट्रीय सुरक्षा दिनानिमित्त गुरूवारी (ता.४) मनपाच्या अधिकारी व कर्मचा-यांनी सायकल रॅली काढून जनजागृती केली. सकाळी नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सीईओ भुवनेश्वरी एस., मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी आकाशवाणी चौक ते मनपा मुख्यालयापर्यंत सायकल रॅली काढली.

यावेळी उपायुक्त रवींद्र भेलावे, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन डॉ.प्रदीप दासरवार, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.नरेंद्र बहिरवार, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, उपमुख्य अग्निशमन अधिकारी बी.पी. चंदनखेडे, उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे, ग्रीन व्हिजील फाउंडेशनचे कौस्तभ चॅटर्जी, बिष्णुदेव यादव, मेहुल कोसुरकर यांच्यासह अग्निशमन विभागाचे सर्व स्थानाधिकारी, कर्मचारी व उपद्रव शोध पथकाचे जवान आदींनी या जनजागृती सायकल रॅलीमध्ये सहभाग नोंदविला.

यावेळी एनएसएसडसीडीसीएलच्या सीईओ भुवनेश्वरी एस. यावेळी म्हणाल्या, सुरक्षेसंदर्भात जनजागृतीची आज गरज आहे. प्रत्येकाने स्वत:च्या सुरक्षेबाबत जागरूक राहण्याची गरज आहे. दुचाकी चालविताना प्रत्येकाने हेल्मेट वापरणे, वेग मर्यादा पाळावी, चारचाकी वाहन चालविताना सिट बेल्ट लावणे, स्टॉप लाईनच्या आधी वाहन थांबविणे, सिग्नलवर लाल दिवा सुरू असल्यास थांबून राहणे हे सर्व सुरक्षेचे नियम आहेत. मात्र हया बाबी केवळ नियम म्हणून न पाहता त्याचा अंगीकार करून स्वत:सह इतरांचीही सुरक्षा करणे हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्याचे पालन होणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी केले.

मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगितले की, महिन्यातून एकदा सायकलने कार्यालयात येण्याचा मनपाने निर्णय घेतला असून आरोग्य जागृतीबाबत खारीचा वाटा उचलला आहे. त्या अंतर्गत राष्ट्रीय सुरक्षा दिनाच्या अनुषंगाने मनपाच्या अधिकारी व कर्मचा-यांनी संयुक्तरित्या सायकल रॅली काढली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाची यावर्षी रस्ता सुरक्षा ही संकल्पना आहे. त्यानुसार जनजागृतीसाठी मनपाच्या अग्निशमन विभागासह उपद्रव शोध पथकाचे जवान यामध्ये सहभागी झाले आहेत. रस्ता सुरक्षेसंदर्भात प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. वाहतुकीच्या संदर्भात स्मार्ट सिटीद्वारे नागपूर शहरामध्ये सायकल ट्रॅक तयार करण्यात आले आहेत. त्याचे सायकल चालविणा-यांनी पालन करावे. यासोबतच आपण प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.