Home Legal ओरियोची पार्लेविरोधात न्यायालयात याचिका, बिस्किटाचे डिझाईन चोरल्याचा आरोप

ओरियोची पार्लेविरोधात न्यायालयात याचिका, बिस्किटाचे डिझाईन चोरल्याचा आरोप

नवी दिल्ली ब्युरो : ओरियो बिस्किट कंपनीने आता पार्ले विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही याचिका पॅकेजिंग आणि बिस्किटच्या डिझाईनच्या कॉपी संबंधी आहे. पार्लेच्या फॅबियो बिस्किटचे डिझाईन हे ओरियोच्या बिस्किटप्रमाणे असल्याचा आरोप करत ओरियोने या विरोधात याचिका दाखल केली आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने या याचिकेवर 12 एप्रिलला सुनावणी घेण्याचं निश्चित केलं आहे. अमेरिकेतील मोंडलीज इंटरनॅशनलच्या इंटरकन्टिनेन्टल ग्रेट ब्रान्ड्स ने ट्रेडमार्कच्या उल्लंघनाशी संबंधित याचिका दाखल केली आहे. नऊ फेब्रुवारी रोजी या याचिकेवर सुनावणी झाली असून त्यावेळी उच्च न्यायालयाने ओरियोच्या वकिलांनी या प्रकरणी लवकर सुनावणी घ्यावी ही मागणी फेटाळली आहे.

मोंडलीजने भारतात 10 वर्षापूर्वी ओरियो बिस्किट लॉन्च केलं होतं. तर पार्ले कंपनीने गेल्या वर्षी जानेवारीमध्ये आपले फॅबिया प्रोडक्ट लॉन्च केलं होतं. ओरियोने आतापर्यंत या ब्रॅन्डचे अनेक व्हेरियन्ट लॉन्च केले आहेत. यामध्ये चोको क्रीम, ओरियो व्हॅनिला ऑरेंज, स्ट्रॉबेरी यांचा समावेश होतो.

ब्रिटानियाने फ्यूचर कन्झ्युमर विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. फ्यूचर कन्झ्युमरने ब्रिटानियाच्या अनेक पॅकेजिंगची कॉपी केली आहे असा आरोप ब्रिटानियाने केला आहे. पार्ले या बिस्किट कंपनीची ‘हाऊस ऑफ पार्ले’ या स्वरुपात सुरुवात 1928 साली करण्यात आली होती. याचे मालक मोहन दयाल चौहान यांनी 18 व्या वर्षी गारमेन्ट व्यवसायाच्या स्वरुपात या व्यवसायाची सुरुवात केली आहे. त्यानंतच्या काळात आपल्या व्यावसायिक कौशल्याने त्यांनी पार्लेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे. आज देशभरात पार्लेच्या 130 पेक्षा जास्त फॅक्टरी आहेत आणि जवळपास 50 लाख रिटेलर्स आहेत. प्रत्येक महिन्यात पार्ले जी जवळपास एक अब्जपेक्षा जास्त पॅकेटचे उत्पादन करते.

कोरोनाच्या काळात बिस्किटांचा मोठा खप झाल्याचं पहायला मिळालंय. त्यामध्ये पार्ले जी सोबत ओरियो या बिस्किटांचाही खप मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनदरम्यान पार्ले-जीची विक्री विक्रमी स्तरावर पोहोचली होता. गेल्या वर्षी मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात पार्ले-जी बिस्किटांची विक्री ही मागील आठ दशकांमधील सर्वाधिक ठरल्याचं सांगितलं.