Home Maharashtra Survey । लॉकडाऊन काळात राज्यातील प्रत्येक पाचवा व्यक्ती होता उपाशी

Survey । लॉकडाऊन काळात राज्यातील प्रत्येक पाचवा व्यक्ती होता उपाशी

654

राज्यात अन्न हक्क मोहिमेंअंतर्गत घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात झालं उघड

मुंबई ब्युरो : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनदरम्यान राज्यातील जवळपास 96 टक्के नागरिकांच्या पगारात कपात झाली आहे. राज्यात अन्न हक्क मोहिमेंअंतर्गत घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात हे उघड झालं आहे. ‘अन्न हक्क मोहिमे’च्या राज्य समन्वयक मुक्ता श्रीवास्तव यांनी शनिवारी पत्रकारांना सांगितलं की कमाईमध्ये घट येण्याचं मुख्य कारण म्हणजे नोकरी गमावणं आणि काम न मिळणं हे होतं. त्यांनी सांगितलं की सर्वेक्षण केलेल्या प्रत्येक पाचव्या व्यक्तीला अन्न विकत घेण्यासाठी पैसे नसल्यामुळे उपाशी राहावं लागलं.

या मोहिमेचा एक भाग म्हणून, अन्न व पोषण क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या गटाने गेल्या वर्षी मे आणि सप्टेंबरमध्ये मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, नंदुरबार, सोलापूर, पालघर, नाशिक, धुळे आणि जळगाव येथे एकूण 250 लोकांचं सर्वेक्षण केलं. केंद्रानं कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं मागील वर्षी मार्चमध्ये देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केलं होतं. पुढे काही महिन्यांनंतर हळूहळू निर्बंध कमी करण्यात आले.

श्रीवास्तव यांनी सांगितलं, की ज्या लोकांना सर्वेक्षणात सामील केलं होतं, यातील 96 टक्के लोकांच्या कमाईमध्ये या काळात घट झाली आणि लॉकडाऊन हटवल्यानंतर जवळपास 5 महिने स्थिती अशीच होती. त्यांनी सांगितलं की सर्वेक्षणातील 52 टक्के लोक ग्रामीण भागातील तर उरलेले शहरी भागातील होते. यातील 60 टक्के महिला होत्या.

श्रीवास्तव यांनी सांगितलं की लॉकडाऊनच्या आधी यातील 70 टक्के लोकांची महिन्याची कमाई ७ हजार रुपये होती तर इतरांची ३ हजार रुपये होती. आधीपासून इतक्या कमी पगारात घर चालवणाऱ्या या कामगारांवर लॉकडाऊनचा किती प्रभाव पडला असेल, याचा अंदाज लावला जाऊ शकतो. त्यांनी सांगितलं की सर्वेक्षणात ज्या लोकांना सामील केलं गेलं, त्यातील जवळपास 49 टक्के लोकांना भोजनासाठी आपल्या नातेवाईकांकडून किंवा इतर कोणाकडून धान्य उधार घ्यावं लागलं. श्रीवास्तव यांनी यावेळी आणखी एक धक्कादायक खुलासा केला, तो म्हणजे दोन वेळच्या जेवणासाठी 12 टक्के लोकांनी आपले दागिने तर 3 टक्के लोकांनी आपल्या जमीनी विकल्या आहेत.