Home Maharashtra Maharashtra | मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीला केंद्रीय मंत्री अनुपस्थित

Maharashtra | मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीला केंद्रीय मंत्री अनुपस्थित

580

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं अनुपस्थितीबाबत कारण

मुंबई ब्युरो : कोर्टातील स्थगितीनंतर मराठा आरक्षणाबाबत निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी मुंबईत एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. मात्र या बैठकीला केंद्रीय केंद्रीय न्याय व विधी मंत्री रवीशंकर प्रसाद अनुपस्थितीत राहिले. या महत्त्वाच्या बैठकीला केंद्रीय मंत्रीच उपस्थित नसल्याने बैठकीतील इतर सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतल्याची माहिती समोर येत आहे.

रवीशंकर प्रसाद यांच्या अनुपस्थितीबाबत हरकत घेण्यात आल्यानंतर भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर उत्तर दिलं. ‘केंद्रीय न्याय व विधी मंत्री अशा बैठकीस उपस्थितीत राहिले तर ते एका बाजूने आहेत असा चुकीचा मेसेज जाऊ शकतो. त्यामुळे ते उपस्थितीत नाहीत,’ असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

दरम्यान, या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उपसमितीचे सदस्य बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, विजय वडेट्टीवार, खा. संभाजी राजे, खा. उदयन राजे, वरिष्ठ विधिज्ञ मुकूल रोहतगी, परमजितसिंग पटवालिया, विजयसिंह थोरात, महाधिवक्ता आशिष कुंभकोणी तसंच अनेक वरिष्ठ अधिकारी व शासनाचे वकील उपस्थित होते.

सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आल्यानंतर राज्य सरकारला मोठा धक्का बसला. कारण या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. मराठा आरक्षण टिकवण्याची इच्छाशक्ती या सरकारकडे नाही, असा आरोप भाजपकडून केला जात होता. त्यातच काही दिवसांतच सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणप्रश्नी महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत ही बैठक आयोजित करण्यात आली होती.