Home मराठी ‘समाजकार्य’च्या विद्यार्थ्यांनी समाजाभिमुख संशोधन करावे- प्रधान सचिव शाम तागडे

‘समाजकार्य’च्या विद्यार्थ्यांनी समाजाभिमुख संशोधन करावे- प्रधान सचिव शाम तागडे

555

नागपूर ब्युरो : सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना गावपातळीवर पोहोचविण्यासाठी समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी समाजाभिमुख संशोधनावर भर द्यावा. या विभागाच्या विविध योजनांचा फायदा समाजातील वंचित घटकांना होण्यासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव शाम तागडे यांनी येथे केले.

समाजकल्याण विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्याय भवन येथे ‘जागर समतेचा, सामाजिक न्यायाचा-2021’ या मोहिमेचे उद्घाटन श्री. तागडे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड, नागपूरचे सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख, वर्ध्याचे श्रीपाद कुळकर्णी तर गोंदियाचे मंगेश वानखेडे आदी यावेळी उपस्थित होते.

सामाजिक न्याय विभागाच्या या स्तुत्य उपक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे. खऱ्या अर्थाने ही लोकचळवळ व्हावी, असे सांगून श्री. तागडे म्हणाले, सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजना गावपातळीवर पोहोचण्यासाठी समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मदत घेतली जात आहे. या विद्यार्थ्यांनी समाजाभिमुख संशोधन करुन त्याचा फायदा तळागाळातील नागरिकांना करुन द्यावा. या विभागाच्या योजनांसोबतच संविधानाबाबत जागृती, व्यसनमुक्ती तसेच ॲट्रासिटी कायद्याबाबत (अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा) जनजागृती अभियान वर्षभर राबविण्यात येणार आहे.

या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थ्यांसह नागरिकांचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे. या विभागामार्फत अनुसूचित जाती-जमातीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसह वृध्दाश्रम, तृतीयपंथी व्यक्तीसाठी महामंडळ तयार करण्यात आले आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, निराधार महिला, दिव्यांग मुलांसाठी चालविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती समाजातील वंचित घटकापर्यंत पोहोचविणे हे या मोहिमेचे धेय्य आहे. ज्या लाभार्थ्यांनी या योजना घेतल्या आहेत, त्यांचा सामाजिक, आर्थिक तसेच शैक्षणिक विकास झाला आहे की नाही याची तपासणी या मोहिमेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या मोहिमेच्या अंमलबजावणी दरम्यान कोविड मार्गदर्शिकेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी यावेळी केले.

सामाजिक न्याय विभागामार्फत समाजोपयोगी महत्त्वाच्या योजना तळागाळातील सर्वसामान्यपर्यंत पोहचण्यासाठी ‘जागर समतेचा, सामाजिक न्यायाचा-2021’ हा उपक्रम वर्षभर राबविण्यात येणार आहे. समाजकार्य महाविद्यालयाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत असून त्यासाठी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. व्यसनमुक्ती अभियानासाठी प्रा. विनोद गजघाटे, संविधान जनजागृतीसाठी प्रा. महेंद्रकुमार मिश्रा, ॲट्रासिटीबाबत प्रा. पुरुषोत्तम थोटे तर सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांच्या प्रसिध्दीसाठी प्रा. निशांत माटे यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

या चारही समित्यांसोबत समन्वय ठेवण्यासाठी अनिकेत समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबा शंभरकर यांची मुख्य समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमार्फत प्राध्यापकांची निवड करण्यात येवून त्यांना तज्ज्ञांद्वारे प्रशिक्षण देण्यात येईल. यानंतर हे प्रशिक्षणप्राप्त प्राध्यापक आपआपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतील. उपक्रमात सहभागी विद्यार्थी गावागावात जावून संविधानाच्या तरतुदी, नागरिकांचे अधिकार, व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन करतील, अशी माहिती डॉ. गायकवाड यांनी यावेळी दिली.

कार्यक्रमाचे संचालन प्रा. संध्या फटिंग तर आभार प्रा. विलास घोडे यांनी मानले. सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी, कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.

Previous articleNagpur। शिवाजी महाराजांनी आधुनिक लोकशाहीचा पाया रचला -जयदीप कवाडे
Next articleनीति आयोग बैठक | पीएम मोदी बोले- देश अब विकास का इंतजार नहीं कर सकता
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).