छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती. महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात उत्साह आहे. उत्साहाच्या वातावरणात राज्यभर शिवाजी महाराजांना वंदन करण्यात येत आहे. जयंतीनिमित्त राज्यभर ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कोरोना संबंधित नियमांचे पालन करुन शिवरायांना अभिवादन केलं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्यानुसार आज, 19 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. शिवरायांचं जन्मस्थळ असलेल्या शिवनेरीवर शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळाला. या विशेष कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार संभाजीराजे छत्रपती, मंत्री आदित्य ठाकरेंसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, माझं हे दुसरं वर्ष आहे. हा बहुमान जिजाऊ, शिवाजी महाराज आणि तुमच्यामुळं लाभलेलं आहे. आता कोरोनाबरोबर आपलं युद्ध सुरु आहे. या युद्धात मास्क हीच आपली ढाल आहे, असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटलं आहे. छत्रपतींनी ज्या काही लढाया केल्या त्यात त्यांनी शत्रूला पराभूत केले. त्यांच्या ढाल तलवारी आज नसल्या तरी कोरोना या शत्रूशी लढाई करताना मास्क ही आपली ढाल आहे, हे विसरू नका, असा सल्ला त्यांनी दिला.
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, महाराष्ट्राच्या भूमीत जन्म घेतलेल्या प्रत्येकाच्या आशा-आकांक्षांच्या स्वप्नपूर्तीची जयंती आहे. छत्रपती शिवरायांसोबत स्वराज्यासाठी लढलेल्या मावळ्यांच्या शौर्याची, त्यागाची जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे युगपुरुष, महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आले आणि त्यांना आदर्श मानणारे कोट्यवधी युवक, आजही गावागावात महाराष्ट्राची अस्मिता जागृत ठेवत आहेत, हे या भूमीचं, आपल्या सर्वांचं भाग्य आहे.
प्रारंभी शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायिला. त्यानंतर पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. यावेळी आदिवासी पारंपरिक नृत्य सादरीकरण झाले.