Home मराठी Nagpur । मनपा उपद्रव शोध पथकांनी केली ९० मंगल कार्यालयाची तपासणी

Nagpur । मनपा उपद्रव शोध पथकांनी केली ९० मंगल कार्यालयाची तपासणी

599

नागपूर ब्युरो : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी बुधवारी सर्व दहा झोनच्या अंतर्गत येणा-या 90 मंगल कार्यालय, लॉन यांची तपासणी केली. शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग बघता मंगल कार्यालय, लॉन तसेच गर्दीचे ठिकाण हे हॉटस्पॉट ठरु शकतात. हा धोका लक्षात घेता मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी मंगल कार्यालयांवर कडक कारवाई करण्याचे सक्त आदेश निर्गमित केले आहे.

मंगळवारी शोध पथकांच्या जवानांनी 7 सभागृहांवर कारवाई करुन रु 37,000 दंड वसूल केले होते. बुधवारी कोणत्याही सभागृहात लग्न समारंभ होतांना दिसले नाही. मनपा आयुक्तांनी मंगळवारी साथरोग अधिनियम 1897, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या वापर करुन आदेश निर्गमित केले आहे. या अंतर्गत गर्दी जमवून नियमांचे उल्लंघन करणा-यांसाठी आकारण्यात येणारा दंड वाढविला आहे.

सभागृह, मंगल कार्यालय, लॉन इ. कार्यक्रम स्थळी व्यवस्थापकाने कोव्हिड नियमांचे उल्लंघन केले, मास्क, सेनेटाइजरचा वापर केला नाही, गर्दी जमविल्यास पहिल्यावेळी 15 हजार रुपये दंड आकारण्यात येईल. दुस-यांदा नियम मोडल्यास 25 हजार रुपये तसेच तिस-यांदा नियम मोडल्यास 50 हजार रुपये दंड आकारला जाईल. आयोजकांवर ही आता रु. 10 हजार दंड आकारण्यात येईल.