Home Maharashtra आज विठ्ठल-रुक्मिणी विवाहाचा सोहळा, कोरोनामुळं भाविकांविनाच विधी

आज विठ्ठल-रुक्मिणी विवाहाचा सोहळा, कोरोनामुळं भाविकांविनाच विधी

771

पंढरपूर ब्युरो : वसंतपंचमी अर्थात वसंताचा म्हणजेच निसर्गाचा उत्सव, तो सतत सुंदर भासणारा निसर्ग वसंत ऋतूत सोळा कलांनी फुलून उठतो. आणि याच मुहूर्तावर साक्षात परब्रह्म पांडुरंग आणि जगन्माता रुक्मिणीचा विवाहसोहळा संपन्न होत असतो. आज वसंत पंचमी विठुरायाच्या विवाहाची तिथी. शेकडो वर्षांपासून ही परंपरा चालत आली आहे. साक्षात देवाचा विवाह असल्याने याला उपस्थित राहण्यासाठी शेकडोच्या संख्येने भाविक येत असतात मात्र कोरोनामुळे यंदा भाविक नसले तरी थेट स्वर्गातील देव या विवाहासाठी उपस्थित असल्याची फुल सजावट केली आहे.

असा असेल आजचा कार्यक्रम

आज सकाळी 10 वाजता भागवताचार्य अनुराधा शेटे या रुक्मिणी स्वयंवरची कथा सांगायला सुरुवात करतील. पावणे अकरा वाजता देवाला पंचपक्वानाचा महानैवेद्य दाखवला जाईल. साडे अकरा वाजता विठ्ठल रुक्मिणी या वधू वर यांना विवाहाचा पोशाख परिधान होईल. यानंतर रुक्मिणी मातेकडून आलेला गुलाल देवाच्या अंगावर टाकला जाईल तर देवाकडचा गुलाल रुक्मिणी मातेच्या अंगावर टाकण्यात येईल. बरोबर 12 वाजता रुक्मिणी स्वयंवर विवाह मुहूर्त येईल आणि विठ्ठल रुक्मिणीच्या उत्सव मूर्ती सजवलेल्या विवाह मंडपात आणल्या जातील आणि साधारण बारा वाजता या विवाहाला सुरुवात होईल. यानंतर लग्नाच्या भोजनावळी सुरू होतील.

सोहळ्यासाठी खास सजावट

या आगळ्या-वेगळ्या विवाहाची आज सकाळपासून सुरु होणारी धामधूम पंढरपुरकर व लाखो भाविकांना घरीच बसून पाहावी लागणार आहे. यंदाचा विवाह सोहळा खास असून या विवाहसोहळ्यासाठी साक्षात ब्रह्मदेव सरस्वती, शंकर पार्वती, विष्णू महालक्ष्मी, बालाजी पद्मावती, राधा कृष्ण या जोड्यांसह गणपती, नारदमुनी यासारखे स्वर्गातील देवही उपस्थित राहणार आहेत. पुण्यातील फुल सजावटीची सेवा देणारे भारत भुजबळ ही संकल्पना मूर्तरूपात आणत आहेत, तेही फुलासाजवटी मधून. असे असले तरी कोरोनाचे संकट अजून गेले नसल्याने देवाच्या विवाहातही कोरोनाची सर्व बंधने पाळावी लागणार आहेत. यंदा वधू -वर अर्थात विठुराया व रुक्मिणी मातेचा विवाहाचा पेहराव बंगलोर येथील प्रसिद्ध फॅशन डिझायनर सविता चौधरी यांनी डिझाईन करून अर्पण केला आहे.

विवाहसोहळ्याला खास पोशाख

वसंतपंचमी ते रंगपंचमी या काळात देवाला व रुक्मिणीमातेला पांढरे कपडे वापरण्याची परंपरा असल्याने देवासाठी खास पांढऱ्या रंगाची अंगी व उपरणे बनवण्यात आले आहे. यावर विष्णूच्या शुभ खुणा असलेला शंख, चक्र व ओम विविध प्रकारच्या रंगीबेरंगी मोत्याच्या बनविण्यात आले आहे. रुक्मिणी मातेलाही अतिशय उंची सिल्कची कांजीवरम साडी निवडण्यात आली आहे. तसे दरवर्षी देवाचा पोशाख खास असला तरी यंदा तो फॅशन डिझायनरने बनवून अर्पण केल्याने पहिल्यांदाच देवाला असा खास बनविलेला पोशाख विवाहात घातला जाणार आहे.

5 टन विविध प्रकारची रंगीबेरंगी फुले

अजूनही राज्यात कोरोनाचे संकट संपले नसल्याने या विवाहसोहळ्यासाठी दरवर्षी प्रमाणे राज्यभरातून येणाऱ्या भाविकांना देवाच्या लग्नाला उपस्थित राहता येणार नसून त्यांना घरी बसूनच टीव्हीवर या आनंदात सहभागी व्हावे लागणार आहे. विवाहाची सध्या मंदिरात जोरदार लगबग सुरु असून भाविक जरी येणार नसले तरी हा विवाह सोहळा दरवर्षी प्रमाणेच शाही पद्धतीने साजरा केला जाणार असल्याचे विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले. यंदाही विवाहस्थळ अर्थात विठ्ठल मंदिर सजवण्यासाठी पुण्यातील भाविक भारत भुजबळ हे जवळपास 5 टन विविध प्रकारची रंगीबेरंगी फुलांसह पंढरपुरात दाखल झाले असून काल सकाळपासूनच त्यांचे फुले गुंफण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.

फुलांचा देखावा

विवाह स्थळ असलेला विठ्ठलसभा मंडपाला दरबाराचे स्वरूप देण्यात आले असून या विवाहसोहळ्याला स्वर्गातील देव उपस्थित असल्याचा फुलांचा देखावा केला जात आहे. मंदिराच्या महाद्वार अर्थात नामदेव पायरीला देखील विवाह वाद्यांची आकर्षक सजावटीचे काम हाती घेतले असून यात विवाहातील सर्व वाद्ये, डोली फुलातून साकारले जाणार आहे. विठ्ठल व रुक्मिणी गाभारा देखील अतिशय आकर्षकरीतीने सजवण्यात येत आहे. या सजावटीसाठी तब्बल 60 कारागीर झटत असून यासाठी ॲंथोरियम, विविध रंगी गुलाब, ओर्केड जरबेरा, मोगऱ्यासह 36 प्रकारच्या पाच टन फुलांचा वापर करण्यात येत आहे. यामुळेच उद्या होणारा देवाचा शाही विवाह जगभरातील विठ्ठल भक्तांच्या आकर्षणाचे केंद्र बनले असून आता सर्व आली आहे. या शाही विवाहाची कथा भगवताचार्य अनुराधाताई शेटे सांगत असून उद्या कथेच्या विवाहप्रसंगी देवाच्या डोक्यावर अक्षता पडणार आहेत.

Previous articleCorona | कठोर निर्णय घ्यावे लागतील, अजित पवारांचे संकेत
Next articleNagpur । जिल्ह्यांमध्ये आता उपविभागीय स्तरावरही दक्षता समिती
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).