नागपूर ब्युरो : नागपूर शहरातील झोपडपट्टीवासीयांना त्यांच्या हक्काचे मालकी हक्क पट्टे लवकरात लवकर मिळावे याकरिता या संपूर्ण प्रक्रियेला गती देण्यात यावी, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले. शहरातील पट्टे वाटपाच्या प्रलंबित प्रश्नाबाबत महापौरांनी गुरूवारी (ता.4) मनपामध्ये विशेष बैठक घेतली.
मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये झालेल्या बैठकीत महापौर श्री.दयाशंकर तिवारी, उपमहापौर श्रीमती मनीषा धावडे यांच्यासह प्रतोद दिव्या धुरडे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त मिलींद मेश्राम, सहायक संचालक नगररचना हर्षल गेडाम, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, स्थावर अधिकारी राजेंद्र अंबारे, जितेंद्र तोमर, लीना बुधे आदी उपस्थित होते.
बैठकीत प्रारंभी उपायुक्त मिलींद मेश्राम यांनी शहरातील झोपडपट्ट्यांनी माहिती दिली. शहरातील अतिक्रमणित झोपडपट्ट्यांतर्गत पट्टे वाटप करण्याबाबत सर्वेक्षण करण्यात येत आहे. लॉकडाउनच्या काळामध्ये हे सर्वेक्षणकार्य थांबलेले होते. आता पुन्हा नव्याने सुरू झाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. नागपूर शहरात एकूण ४२६ अतिक्रमित झोपडपट्टयांची नोंद आहे. यापैकी अधिसूचित असलेल्या २९९ झोपड्या व १२७ अधिसूचित नसलेल्या झोपडपट्टी आहेत. यापैकी नागपूर महानगरपालिकेच्या जागेवर १६, नागपूर सुधार प्रन्यासच्या जागेवर ५५, महाराष्ट्र शासनाच्या जागेवर ८४, रेल्वेच्या जागेवर ११, खाजगी मालकीच्या जागेवर ८२, मिश्र मालकिच्या जागेवर १५१, इतर शासकीय जागेवर ९, आबादी ९ व झुडपी जंगल क्षेत्रात ९ अशा एकूण ४२६ झोपडपट्ट्या आहेत, अशीही माहिती उपायुक्तांनी दिली.
नागपूर शहरामध्ये महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास, राज्य शासन, रेल्वे, खाजगी, नझुल व अन्य ठिकाणी झोपडपट्ट्या आहेत. या झोपडपट्टी वासीयांना त्यांच्या हक्काचे मालकी पट्टे देण्यासाठी आधी संपूर्ण प्रशासकीय व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. त्यादृष्टीने या सर्व झोपडट्ट्यांचे सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. यासाठी मनपा, नासुप्र यासह इतर सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे. नागरिकांच्या सुविधेसाठी सर्वांनी एकत्रितरित्या योग्य समन्वय साधून कार्य करावे व नागरिकांच्या मालकी हक्क पट्ट्यांच्या कार्यवाहीला गती द्यावी, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी दिले. तसेच खाजगी जागेतील झोपडपट्टीवासियांना मालिकी हक्काचे पट्टे बददल प्रक्रिया तत्काल करण्याचेही निर्देश दिले.
शहरातील बहुतांशी क्षेत्रांचे सर्वेक्षण पूर्ण झालेले असून शोभाखेत, भोईपूरा, नयापूर, खदानवस्ती, बजेरीया, भालदारपूरा, बारसेनगर, नारा, मातंगपूरा आधी भागामध्ये सर्वेक्षणचे कार्य सुरू असल्याची माहिती यावेळी लीना बुधे यांनी दिली. सर्वेक्षण कार्यामध्ये कुठलीही अडचण किंवा अडथळे निर्माण झाल्यास स्थानिक लोकप्रतिनिधींचे सहकार्य घेण्याची सूचना महापौरांनी यावेळी केली.
भूजल पातळी वाढविण्यासाठी पावसाच्या पाण्याचा उपयोग व्हावा
शहरातील पावसाळी नाल्या बुजल्या असल्यामुळे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचते. या पाण्याचा उपयोग भूजल पातळी वाढविण्यासाठी होऊ शकेल का, याचा विचार व्हावा. ते शक्य असेल तर प्रस्ताव तयार करून पावसाळ्यापूर्वी त्याची अंमलबजावणी करावी, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.
यासंदर्भात मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीला उपमहापौर मनीषा धावडे, प्रतोद दिव्या धुरडे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, जलप्रदाय विभागाच्या अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता राजेश दुफारे, राजेश भूतकर, अविनाश बाराहाते, गिरीश वासनिक, धनराज मेंढुलकर, अनिल गेडाम, श्री. गुरुबक्सानी आदी उपस्थित होते.
याप्रसंगी महापौर दयाशंकर तिवारी यांनी पावसाळी नाल्या अनेक ठिकाणी जोडल्या नसल्याची बाब अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. या नाल्या जोडल्या नसल्यामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचून राहते. त्याचा नागरिकांना त्रासच होतो. यावर पर्याय म्हणून ह्या पाण्याचा उपयोग भूजल पातळी वाढविण्यासाठी होऊ शकतो का, त्याचा अभ्यास करून जर ते शक्य असेल तर त्याचा तातडीने प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
सेंट्रल एव्हेन्यूवर जी काही महत्त्वाची वाहनतळ आहेत, अशा ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग करून रस्त्यावर साचणारे पाणी तिकडे वळून ते जमिनीत टाकता येईल का, त्याचीही चाचपणी करण्यास त्यांनी सांगितले. शहरातील उद्यानांच्या बाहेर साचणाऱ्या पाण्यालाही उद्यानात वळवून तेथील भूजल पातळी वाढविण्यावर विचार व्हावा जेणेकरून परिसरातील बोरवेल, विहिरी आदींची पाणी पातळी वाढून १२ महिने तेथे पाणी राहील. या विषयावर अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली. पावसाळ्यापूर्वी असा एखादा प्रयोग करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.
ड्रेनेज विभागाच्या पुनर्रचनेची गरज
नागपूर शहरात अनेक ठिकाणी नाल्या चोक होतात. काही ठिकाणी मनुष्यबळाने तर काही ठिकाणी मशीनने चेंबर क्लिअर केले जाते. मात्र, लोककर्म आणि आरोग्य विभाग (स्वच्छता) यांच्यात योग्य समन्वय नसल्यामुळे बऱ्याचदा चेंबर स्वच्छ करण्यात अडचणी येतात. म्हणून ड्रेनेज विभागाची पुनर्रचना करण्याची गरज महापौर दयाशंकर तिवारी यांनी बोलून दाखविली.
सफाई कर्मचा-यांच्या विविध प्रश्नांबाबत शिष्टमंडळाशी महापौरांची चर्चा
नागपूर शहर स्वच्छ, सुंदर दिसावे, शहरातील नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी सफाई कर्मचारी अविरत सेवा बजावतात. २० वर्ष सेवा पूर्ण झालेल्या या सफाई कर्मचा-यांना स्थायी करण्याचा महत्वाचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. स्थायी झालेल्या सर्व ऐवजदार सफाई कर्मचा-यांना इतर कर्मचा-यांप्रमाणेच सातवा वेतन आयोगानुसार वेतन मिळावे, याबाबतचा प्रस्ताव शासनदरबारी पाठविण्यात यावा, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले. तसेच एवजदारांना थकबाकीची रक्कम टप्याइत-टप्यार ने देण्याचेही निर्देश त्यांनी दिले.
सफाई कामगारांच्या विविध प्रश्नांच्या संदर्भात भाजपा अनुसूचित जाती मोर्चाद्वारे देण्यात आलेल्या निवेदनावर चर्चा करण्यासाठी महापौरांनी मनपा मुख्यालयात बैठक घेतली. डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये झालेल्या बैठकीत महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह उपमहापौर मनीषा धावडे, माजी महापौर संदीप जोशी, प्रतोद दिव्या धुरडे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेविका लीला हाथीबेड, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, उपायुक्त निर्भय जैन, उपायुक्त मिलींद मेश्राम, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन डॉ.प्रदीप दासरवार, सहायक आयुक्त (सा.प्र.वि.) महेश धामेचा, प्रमुख लेखा व वित्त अधिकारी विजय कोल्हे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.नरेंद्र बहिरवार, कार्यकारी अभियंता अविनाश भुतकर, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण आदी उपस्थित होते.
दयाशंकर तिवारी यांनी ७ जानेवारीला महापौर म्हणून पद स्वीकारले आणि ८ जानेवारीला मनपाच्या कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला, असे नमूद करीत भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे शहर अध्यक्ष राजेश हाथीबेड यांनी महापौर दयाशंकर तिवारी व माजी महापौर संदीप जोशी यांचे आभार मानले व अभिनंदन केले. सर्व कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग करण्यात आला असून यामधून स्थायी झालेल्या सफाई कर्मचा-यांना मात्र वंचित ठेवण्यात आले असून त्यांनाही आयोग लागू करण्याची मागणी राजेश हाथीबेड यांनी यावेळी केली. यावर महापौरांनी उपरोक्त निर्देश दिले.
लाड पागे समितीच्या शिफारशी अंतर्गत सफाई कर्मचा-यांच्या वारसांना वारसाहक्काचा लाभ देण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. या विषयाच्या अनुषंगाने मनपाकडे कागपत्रांची पूर्तता करण्यात आलेल्या कर्मचा-यांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले असून कागदपत्रे प्राप्त न झालेल्यांची प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती यावेळी उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन डॉ. प्रदीप दासरवार यांनी दिली. सदर विषयाच्या अनुषंगाने तत्कालीन महापौर संदीप जोशी यांच्या निर्देशानुसार समिती गठीत करण्यात आली असल्याचे राजेश हाथीबेड यांनी सांगितले. विषयाला न्याय देण्यासाठी दोन समित्या गठीत करण्यात आलेल्या होत्या. या दोन्ही समित्यांची एक समिती पुनर्गठीत करून अधिकारी व कर्मचारी संघटनेने समन्वयातून व योग्य चर्चेतून या प्रश्नावर तोडगा काढावे, असे माजी महापौर संदीप जोशी यांनी सांगितले.
सफाई कर्मचा-यांच्या संपूर्ण प्रश्नांच्या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेत समिती गठीत करण्यात यावी. या समितीमध्ये कर्मचा-यांच्या तीन प्रतिनिधींचा समावेश करावा व संपूर्ण प्रश्नांवर समन्वयाने मार्ग काढावा, असे निर्देश यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.
याशिवाय सफाई कर्मचा-यांकरिता डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजना सुरू करण्यात आलेली आहे. मात्र या योजनेंतर्गत बहुतांशी सफाई कर्मचा-यांना घर मिळाले नसल्याचा प्रश्न यावेळी मांडण्यात आला. संबंधित विषयाच्या अनुषंगाने प्रशासनाकडून महापौरांनी आढावा घेतला. सदर योजना लागू करण्याबाबत जागेच्या संदर्भात आयुक्तांच्या स्वाक्षरीचे जिल्हाधिका-यांना पत्र पाठवून त्याचा पाठपुरावा करण्याचे निर्देश महापौरांनी दिले.
कोरोना काळात सेवाकार्य बजावत असताना मनपाचे सफाई कर्मचारी मृत पावले. या मृत सफाई कामगारांना शासनाच्या विमा योजनेचा लाभ मिळावा याबाबत योग्य कार्यवाही करण्याबाबत मागणी सफाई कर्मचारी प्रतिनिधींकडून करण्यात आली. मनपाच्या मृत सफाई कर्मचा-यांना विमा योजनेचा लाभ देण्याबाबत शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठविण्याचे सुद्धा निर्देश महापौरांनी यावेळी दिले. याशिवाय २९ सप्टेंबर २०१९च्या पूर्वीचे मृतक ऐवजदारांसह आजारी असलेल्या ऐवजदारांच्या वारसांनाही ऐवजदार कार्ड देण्याबाबतही कार्यवाहीचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.