Home Maharashtra Nagpur | रस्ते अपघातातील जखमींना मदत करणाऱ्यांना पोलीसांचे सहकार्य

Nagpur | रस्ते अपघातातील जखमींना मदत करणाऱ्यांना पोलीसांचे सहकार्य

– खासदार डॉ. विकास महात्मे यांचे कथन

नागपूर ब्यूरो : रस्त्यावर अपघात दिसल्यास आजूबाजूचे नागरिक पोलीस तसेच कायद्याच्या भीतीपोटी मदतीसाठी सरसावत नाही. परंतु आता अपघात झालेल्या व्यक्तीला मदत केल्यास पोलीस ठाणे अथवा न्यायालयात जाणे कायद्याने बंधनकारक नाही, असे प्रतिपादन खासदार तथा संसद सदस्य रस्ता सुरक्षा समितीचे उपाध्यक्ष डॉ. विकास महात्मे यांनी शुक्रवार (15 जानेवारी) ला येथे केले.

प्रादेशिक परिवहन कार्यालयात रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत आयोजित विविध कार्यक्रमांच्या पूर्वतयारीबाबत आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी डॉ. महात्मे बोलत होते. प्रादेशिक परिवहन अधिकारी दिनकर मनवर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी खंडेराव देशमुख, विनोद जाधव, विदर्भ ऑटोरिक्षा चालक फेडरेशनचे अध्यक्ष विलास भालेराव, अशासकीय सदस्य चंद्रशेखर मोहिते, जनआक्रोश स्वयंसेवी संस्थेचे सचिव रवि कासखेडीकर, अशोक करंदीकर आदी यावेळी उपस्थित होते.

केंद्र शासनामार्फत 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी 2021 या कालावधीत ‘रस्ता सुरक्षा अभियान’ राबविण्यात येणार आहे. यासाठी ‘संसद सदस्य रस्ता सुरक्षा समिती’ स्थापन करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष परिवहन महामार्ग तथा सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग विभाग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आहेत. समितीचे ब्रीद वाक्य ‘सडक सुरक्षा-जीवनरक्षा’ असे आहे. अभियानादरम्यान अपघात व त्यामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्ती व जखमी व्यक्तीचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने सर्व संबंधित विभाग विविध उपक्रम राबवित आहेत.

उपक्रमांबाबत माहिती देताना श्री. महात्मे म्हणाले की, रस्ते अपघात कमी करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत संपूर्ण जिल्ह्यामध्ये गावोगावी चित्ररथ फिरेल. जनआक्रोश स्वयंसेवी संस्थेमार्फत ‘चौक सभा’ आयोजित करून बेशिस्त वाहनधारकांना वाहतुकीचे नियम समजावून सांगितले जातील. अभियान काळात महिलांची मोटरसायकल रॅली काढण्यात येईल. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना गुलाबपुष्प देऊन लाजविण्यात येईल. कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात ट्रक तसेच जड वाहनधारकांना वाहतुकीच्या नियमांबाबत मार्गदर्शन करण्यात येईल.

लायन्स क्लबमार्फत वाहन चालकांची शारीरिक तपासणी करण्यात येईल. ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी शहरात एक दिवस ‘नो हॉकिंग डे’ राबविण्यात येईल. अपघात झाल्यानंतर पहिला एक तास रुग्णावर उपचार करण्यासाठी ‘गोल्डन अवर’ असतो. या काळात रुग्णाला तात्काळ प्रथमोपचार मिळणे गरजेचे असते. यासाठी रस्त्याच्या कडेला असणारे छोटे दुकानदार, हातठेलेचालक यांना अपघातानंतर करावयाच्या उपाययोजनांबाबत प्रशिक्षण दिले जाईल. वाहनांवर ‘मी वाहतुकीच्या नियमांचे पालन करतो, तुम्हीही करा’ असे स्टिकर्स लावण्यात येतील. या अभियानाचा जास्तीत जास्त प्रचार व प्रसार होऊन ही जनचळवळ व्हावी.

अपघातात एखादी व्यक्ती दगावल्यास त्यांच्या कुटुंबियांना विमा संरक्षणाचा लवकर फायदा मिळत नाही. अशा घटनेसाठी विमा कंपन्यांतर्फे ‘लोक अदालत’ राबविल्या जाईल. जेणेकरुन अपघाती मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना विमा कवचाचा लगेच लाभ मिळेल. सडक सुरक्षा अभियान ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.
या अभियानाबाबत नागरिकांमध्ये प्रचार आणि प्रसार व्हावा, यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. शहरात मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षात अपघाताचे प्रमाण 27 टक्के, मृत्यूचे प्रमाण 32 टक्क्यांनी घटल्याचे दिसून येते. अभियान यशस्वी करण्यासाठी प्रशासनासोबतच नागरिकांचा स्वयंस्फूर्तीने सहभाग महत्वपूर्ण आहे. असेही ते यावेळी म्हणाले.

जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉट, अपघातांची कारणे व उपाययोजना, वेग मर्यादा, वाहतूक रस्ता सुरक्षा मोहीम, प्रशिक्षण केंद्र आदींवर यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच अभियानादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमांबाबत संबंधिताना यावेळी निर्देश देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here