Home मराठी Nagpur | जिल्ह्यात 17 जानेवारीला पल्स पोलिओ लसीकरण

Nagpur | जिल्ह्यात 17 जानेवारीला पल्स पोलिओ लसीकरण

जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याकडून आढावा

नागपूर ब्यूरो : कोरोना साथ रोगाच्या काळामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करत येत्या 17 जानेवारीला शून्य ते पाच या वयोगटातील प्रत्येक मुलाला पोलिओचा डोस देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज दिले. यापूर्वी डोस दिला असेल तरी पुन्हा देण्यात यावा, असेही त्यांनी निर्देशित केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा आरोग्य विभागाने केलेला आराखडा आज चर्चिला गेला. 17 जानेवारी रोजी जिल्ह्यामध्ये ही मोहीम राबविली जाणार आहे. यासाठी जिल्हास्तरीय समन्वय समितीची सभा आज घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी ठाकरे यांच्यासह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक थेटे, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. मोहम्मद साजिद, ग्रामीणचे उपविभागीय परिवहन अधिकारी अभिजीत कोल्हे, लायन्स क्लबचे पदाधिकारी बलविंदर सिंग, उपशिक्षणाधिकारी श्रीमती एस. एन. शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ. धनविजय, जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी, श्रीमती सुरेखा चौबे आदी उपस्थित होते.

नागपूर महानगर वगळता जिल्हा परिषद नागपूर आरोग्य विभागामार्फत जिल्हास्तरीय कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. यासाठी ही जिल्हास्तरीय समन्वय समितीची सभा होती.

17 जानेवारीला राबविण्यात येणाऱ्या पल्स पोलिओ मोहिमेसाठी नागपूर महानगर वगळता जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्र मिळून 23 लक्ष 62 हजार 259 लोकसंख्या आहे. यामध्ये पाच वर्षाखालील बालकांची संख्या दोन लक्ष 7 हजार 580 आहे. या सर्व बालकांना 100 टक्के लसीकरण करण्याबाबत आरोग्य विभाग तयारी करीत आहे. मनपा देखील याच दिवशी ही मोहिम राबवणार आहे.

महामार्गावरील रस्त्याच्या बाजूला वास्तव्यास असलेली घरे, धाबे, शेतातील लाभार्थी, पूल व इमारतीच्या बांधावर असलेल्या मजुरांची बालके, भटक्या लोकांची बालके, याशिवाय बाजाराच्या दिवशी येणारे बालके यांना मोबाईल पथकाद्वारे देखील पोलिओ लसीकरण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. या मोहिमेसाठी ग्रामीण भागात असणारी सर्व शासकीय यंत्रणा सहभागी होणार आहे. या शिवाय या कार्यक्रमाची प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील नियोजन

या मोहिमेला शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी जिल्हास्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक यांना तालुक्यांचे वाटप करण्यात आले आहे. आज यासंदर्भात जिल्हास्तरीय सभा घेण्यात आली. वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक यांची कार्यशाळा देखील घेण्यात आली. तालुका टास्क फोर्स सभा, पर्यवेक्षक, बुथवरील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात विविध सार्वजनिक उपक्रम राबवून हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. गावांमधील प्रत्येक नवजात शिशूची माहिती गोळा करण्याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्रांना सूचित करण्यात आले आहे. आवश्यक असणाऱ्या प्रसिद्धी साहित्य व अहवालाचे नियोजन करण्यात आले असून बांधकाम ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांची माहिती देण्याचे कामगार विभागाला सूचित करण्यात आले आहे. या शिवाय अंगणवाडी सेविका, आशा यांची बैठक मोठ्या प्रमाणात पुढील कालावधीत घेतल्या जाणार आहे. गेल्या वर्षी ज्या भागांमध्ये कमी नोंदी झाल्या होत्या अशा रामटेक व अन्य तालुक्याकडे विशेष लक्ष वेधण्यात आले आहे.

जिल्ह्यात 3.20 लक्ष लसी येणार

जिल्ह्यासाठी या मोहिमेकरिता तीन लक्ष 20 हजार पोलिओ लसीची मागणी करण्यात आलेली असून 17 जानेवारीच्या पूर्वी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना ही लस पुरवली जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील आरोग्य व ग्रामीण पातळीवरील यंत्रणेतील 6 हजार 97 कर्मचारी कार्यरत असणार आहेत.

शेवटचा रुग्ण 2001 मध्ये

नागपूर जिल्ह्यामध्ये यापूर्वी शेवटचा पोलिओ रुग्ण सन 2001 मध्ये आढळून आला होता. तेव्हापासून आतापर्यंत एकही पोलिओ रुग्ण आढळून आलेला नाही. हा शेवटचा रुग्ण महानगरपालिका क्षेत्रात आढळला होता. ग्रामीण भागात मौदा तालुक्यात 1998 मध्ये शेवटचा रुग्ण आढळला होता. तर महाराष्ट्रात आंबेजोगाई तालुक्यात 2010मध्ये शेवटचा रुग्ण आढळून आला. तथापि, ही परिस्थिती कायम ठेवण्यासाठी दरवर्षी ही मोहीम राबविण्यात येते. यापूर्वी शून्य ते पाच वयोगटातील बालकाला डोस दिला असला तरी पुन्हा एकदा डोस देणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील सर्व क्षेत्रातील नागरिकांनी देखील आपल्या अवतीभवतीच्या 0 ते 5 वयोगटातील शिशुला 17 जानेवारीला हा डोस मिळेल यासाठी प्रयत्न करावा. या सामाजिक कार्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी आज येथे केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here