Home हिंदी Nitin Raut | ‘गोरेवाडा’ विकासकामांच्या निधीसाठी प्रस्ताव पाठवा

Nitin Raut | ‘गोरेवाडा’ विकासकामांच्या निधीसाठी प्रस्ताव पाठवा

691

आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयात आढावा बैठक

नागपूर ब्यूरो : आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय घोषित झाल्यानंतर गोरेवाडा प्राणीसंग्रहालयात उच्च दर्जाच्या सोईसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या सुविधांची कार्यवाही चार टप्प्यात बांधकाम करण्यात येणार असून, त्यासाठी लागणाऱ्या निधीसाठी एकसंघ आणि परिपूर्ण प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज प्रशासनाला दिले.

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय येथे सोमवारी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी वरिष्ठ अधिका-यांसोबत आढावा बैठक घेतली. आमदार राजू पारवे, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महाव्यवस्थापक ऋषिकेश रंजन, वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एन. वासुदेवन, गोरेवाडा प्रकल्पाचे विभागीय व्यवस्थापक पी. बी. पंचभाई, वास्तूविशारद अशफाक अहमद आदी उपस्थित होते.

राज्यात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे प्रयत्नशील असल्याचे सांगून त्यांच्याकडे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाच्या‌ संपूर्ण प्रकल्पाचे सादरीकरण करण्याच्या सूचना अधिका-यांना दिल्या. गोरेवाडा विकास प्रकल्पाने निधीसाठी पाठविलेला प्रस्ताव पर्यटन मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवतील. मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर प्राणीसंग्रहालयासाठी आवश्यक निधी विविध टप्प्यात मिळेल. तो मिळाल्यानंतर टप्प्याटप्प्याने येथे उच्च दर्जाच्या सुविधा उभारण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

पहिल्या टप्प्यातील पर्यटन सुविधांचे काम पूर्ण झाले असून, लवकरच दुस-या व तिस-या टप्प्यातील सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. पहिल्या टप्प्यात वाघ, बिबट्या, अस्वल आणि हरिण आदी चार जंगल सफारी सुरु करण्यात आल्या आहेत. पुढील टप्प्यात आफ्रिकन सफारीसाठी काम सुरु करण्याचे प्रस्तावित आहे. हे काम वर्षभरात पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, त्यासाठी लागणारा निधी मिळविण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. राऊत यांनी दिले.

राज्यात पर्यटनवाढीला चालना मिळावी. राज्यातील विविध पर्यटनस्थळांकडे ओघ वाढावा, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. नागपुरात उमरेड क-हांडला, पेंच आदी अभयारण्यानंतर गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय सुरू झाले आहे, याकडे लक्ष वेधून या संपूर्ण प्रकल्पाचा एकसंघ आणि परिपूर्ण माहितीचा प्रस्ताव तयार करून तो पाठविण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. गोरेवाडा येथे पक्ष्यांसाठीही जागा राखीव ठेवून तेथे बर्ड पार्क बनविण्यासाठी प्रस्ताव तयार करावा. आफ्रिकन सफारी, वॉटर ट्रीटमेंट प्लांट आदी विविध विकासकामांसाठी लागणा-या निधीबाबत एकत्रित प्रस्ताव तयार करून तो पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पाठवण्याचे निर्देश त्यांनी दिले.

विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी संग्रहालयाची पाहणी करत परिसरातील विकासकामांचा आढावा घेतला.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).