Home हिंदी निवडणुकीमध्ये कोरोना प्रोटोकॉलची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी : जिल्हाधिकारी

निवडणुकीमध्ये कोरोना प्रोटोकॉलची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी : जिल्हाधिकारी

732

नागपूर ब्यूरो : 1 डिसेंबर रोजी नागपूर विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक होत आहे. कोरोना काळामध्ये ही निवडणूक होत असून यामध्ये सर्व यंत्रणांचे कोरोनापासून संरक्षण होईल, यासाठी आरोग्य यंत्रणेने निर्देशित केलेल्या सर्व सूचनांचे पालन केले गेले पाहिजे, असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज दिले.

पदवीधर निवडणुकीसाठी जबाबदारी सोपविण्यात आलेल्या सर्व विभाग प्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज घेण्यात आली. या बैठकीमध्ये कोरोना संदर्भात राज्य व केंद्र शासनाने सूचवलेल्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना पाळण्याचे निर्देश दिले. यासाठी नागपूर शहरातील आरोग्य यंत्रणेची जबाबदारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर यांच्याकडे तर संपूर्ण ग्रामीण भागातील जबाबदारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी.एस. सेलोकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांनी संपूर्ण निवडणूक काळामध्ये कोरोना संदर्भात नोडल अधिकारी म्हणून कामकाज बघण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

5 नोव्हेंबर पासून सुरु झालेल्या पदवीधर निवडणूक प्रक्रियेमध्ये नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा अखेरचा दिनांक 12 नोव्हेंबर आहे. 13 तारखेला नामनिर्देशनपत्रांची छाननी केली जाईल. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 17 नोव्हेंबर आहे. एक डिसेंबरला मतदान होणार असून मतमोजणी 3 डिसेंबर रोजी होणार आहे.

यावेळी जिल्हाधिकारी यांनी निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक विभागाचा आढावा घेतला. निवडणूक साहित्य मतदान केंद्रांची उपलब्धता, मतपेट्या, बॅलेट पेपर, वाहतूक यंत्रणा, प्रशिक्षण, मनुष्यबळाची उपलब्धता, प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती त्यांचे कामकाज याबाबत देखील यावेळी चर्चा करण्यात आली. पोलीस विभागाने या काळात अवैध दारू विक्री व वाहतूक व्यवस्थेबाबतही जागरुक राहण्याचे त्यांनी सुचवले. मतदारांवर प्रभाव पाडणाऱ्या कोणत्याही अवैध प्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस दलाने सज्ज असावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुढील आठवड्यामध्ये प्रत्येक विभागाची वेगळी बैठक घेण्यात येणार असून 17 नोव्हेंबर पासून प्रत्यक्ष प्रचार प्रसार सुरू होणार आहे. त्यासाठीच्या अनुषंगिक तयारीचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

      या बैठकीला जिल्हाधिकारी यांच्यासोबत नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, उपाधीक्षक बसवराज तेली, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, उपायुक्त मिलिंद साळवे, उपनिवडणूक अधिकारी हेमा बडे, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी.एस. सेलोकार, निवडणूक विभागातील अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).