Home हिंदी ‘सन्मान स्त्री शक्तीचा’ : पत्रकारितेतील सविता हरकरे म्हणजे महिलांसाठी आदर्श : महापौर

‘सन्मान स्त्री शक्तीचा’ : पत्रकारितेतील सविता हरकरे म्हणजे महिलांसाठी आदर्श : महापौर

693

नागपूर : सविता हरकरे यांनी ज्या काळात पत्रकारिता सुरू केली त्या काळात पत्रकारितेतील महिलांचा वावर फार कमी होता. विपरीत परिस्थितीत त्यांनी पत्रकारिता क्षेत्र आवड म्हणून निवडले आणि त्यातच करियर केले. आज त्यां चे या क्षेत्रातील योगदान हे नव्या पिढीतील महिला पत्रकारांसाठी आदर्श आहे, असे उद्‌गार महापौर संदीप जोशी यांनी काढले.

महापौर संदीप जोशी यांनी नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून ‘सन्मान स्त्री शक्तीचा’ हा उपक्रम सुरू केला. नवरात्रीतील नऊही दिवस विविध क्षेत्र आपल्या कर्तृत्वाने गाजविणाऱ्या महिलांचा प्रातिनिधिक सत्कार करण्याचे त्यांनी ठरविले. मंगळवारी (ता. 20) चौथ्या दिवशी त्यांनी पत्रकार ते उपवृत्तसंपादक असा प्रवास करणाऱ्या सविता देव हरकरे यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार केला.

यावेळी त्यांच्यासोबत उपमहापौर मनीषा कोठे होत्या. मनपाचा मानाचा दुपट्टा, साडी-चोळी, तुळशीचे रोप आणि मानपत्र देऊन महापौर संदीप जोशी आणि उपमहापौर मनीषा कोठे यांनी त्यांचा गौरव केला. सविता हरकरे यांनी सन 1989 मध्ये ‘जनवाद’ या वृत्तपत्रातून खऱ्या अर्थाने पत्रकारितेची सुरुवात केली. त्यापूर्वी महाल येथून प्रकाशित होणाऱ्या जरब नामक नियतकालिकात गुन्हेगारी जगतावर लिहिले होते. जनवादमध्ये असताना अंमली पदार्थाच्या नागपुरातील जाळ्याचा त्यांनी पर्दाफाश केला होता. जनवादनंतर त्यांनी ‘लोकमत’मध्ये आपली सेवा दिली. गेल्या २९ वर्षांपासून त्या ‘लोकमत’मध्ये आहेत. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील प्रतिष्ठीत अवार्ड ही प्राप्त झाले आहे. आज त्या उपवृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहे. या काळात त्यांनी अनेक विषयांवर लिखाण केले. त्यांचे लिखाण समाजाला प्रेरणा आणि दिशा देणारे असल्याचे गौरवोद्‌गार महापौर संदीप जोशी यांनी यावेळी काढले.

सत्कारप्रसंगी सत्कारमूर्ती सविता हरकरे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. पत्रकारितेत पूर्वीच्या काळात महिला अपवादानेच यायच्या. तो अपवाद मी होते. परंतु महिला कुठल्याही क्षेत्रात कमी नाही, हे माझ्यासारख्या महिलांच्या पत्रकारितेने दाखवून दिले. आम्हा महिलांच्या कर्तृत्वाची दखल महापौरांनी घ्यावी, याचा आम्हाला आनंद आहे. हा सत्कार आमच्यासाठी प्रोत्साहन देणारा असून मी महापौर आणि मनपाची ऋणी असल्याचे त्या म्हणाल्या.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).