Home हिंदी कोव्हिडला घाबरू नका, फक्त सतर्क राहा!

कोव्हिडला घाबरू नका, फक्त सतर्क राहा!

कोव्हिड संवादच्या माध्यमातून डॉक्टरांचे आवाहन

नागपूर ब्यूरो : सध्या नागपूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी जाणवत असला तरी धोका कमी झालेला नाही. त्यामुळे प्रत्येकाने सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. मागील अनेक महिन्यांपासून कोरोनाच्या लस संबंधी संशोधन सुरू आहे. मात्र कोरोनावरील लस किती प्रभावी ठरणार, ती प्रत्येकापर्यंत पोहोचायला किती वेळ लागणार हे निश्चित नाही. त्यामुळे लसीवर अवलंबून न राहता प्रत्येकाने जबाबदारीने नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे. तो दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींच्या विना मास्कने संपर्कात आल्यास जास्त पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला कोरोना होईल किंवा आपल्यामुळे आपल्या कुटुंबियांना धोका निर्माण होईल ही भीती न ठेवता सतर्क राहा व नियमांचे पालन करा, असे आवाहन जनरल सर्जन तथा कोठारी हॉस्पिटलचे संचालक डॉ. जगदीश कोठारी व कन्सलटिंग फिजिशियन डॉ. मुकुंद गणेरीवाल यांनी केले.

नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोसिएशन (आय.एम.ए.) यांच्या संयुक्त विद्यमाने महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतील ‘कोव्हिड संवाद’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात सोमवारी (ता.12) डॉ. जगदीश कोठारी आणि डॉ. मुकुंद गणेरीवाल यांनी ‘कोव्हिड आणि गृहविलगीकरण आणि कोव्हिड आणि शस्त्रक्रिया’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी नागरिकांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसरन केले.

मास्क लावणे अत्यावश्यक

कोव्हिड-19 या विषाणूचा संसर्ग व्यक्तीच्या तोंडातून किंवा नाकातून निघणा-या तुषारामधून होतो. या विषाणूंनी नागरिकांच्या शरीरात प्रवेश केल्यास फुफ्फुसासह अन्य अवयवही बाधित होण्याचा धोका असतो. कोव्हिडपासून बचावाचा सर्वोत्तम उपाय सुरक्षा बाळगणे हेच आहे. यासाठी मास्कची भूमिका मोठी आहे. घराबाहेर कुठेही जाताना, कामावर असताना प्रत्येकाने मास्क लावणे अत्यावश्यक आहे. मास्क लावताना त्याने तोंड आणि नाक पूर्णपणे झाकलेले असावे, वारंवार मास्कला हात लावू नये, मास्कला हात लावल्यास लगेच हात साबण आणि पाण्याने धुवावे किंवा सॅनिटाजरने स्वच्छ करावे. याशिवाय दोन व्यक्तींमध्ये सुरक्षेचे अंतर ठेवणे हे सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे गर्दीत जाणे टाळा, कुठेही गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्या. समोरची प्रत्येक व्यक्ती कोरोनाबाधित आहे हे मानूनच सतर्क राहून काळजी घ्या, असेही आवाहन डॉ.जगदीश कोठारी आणि डॉ.मुकुंद गणेरीवाल यांनी केले.

‘आयसोलेशन’चे नियम पाळा

कोरोनाचा संसर्ग झाल्यास लक्षणे नसल्यास किंवा सौम्य लक्षणे असल्यास रुग्णाला गृह विलगीकरणात ठेवण्याची परवानगी आहे. यासाठी रुग्णाने वेगळ्या खोलीत राहण्याची गरज असते. घरी विलगीकरणाची व्यवस्था नसल्यास महानगरपालिकेद्वारे शहरात विविध ठिकाणी कोव्हिड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत. याशिवाय शहरातील काही हॉटेल्समध्येही ‘पेड आयसोलेशन’ची व्यवस्था आहे. कोव्हिडचा संसर्ग वाढू नये आपल्यामुळे इतरांना धोका निर्माण होउ नये यासाठी प्रत्येकाने ‘आयसोलेशन’चे नियम कटाक्षाने पाळा.

कुठलाही गैरसमज ठेवू नका

रुग्णालयात कुठल्याही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी सुरक्षेच्या दृष्टीने कोव्हिड चाचणी करायला सांगितले जाते. याशिवाय कोव्हिड बाधित रुग्णांचे सीटी स्कॅनही केले जाते हे केवळ रुग्णाला आजाराचा कितपत धोका आहे हे तपासण्यासाठीच असते. त्यामुळे कुठलाही गैरसमज ठेवू नका. कोव्हिडच्या या संकटाच्या काळात शासकीय आणि खाजगी रुग्णालयातील डॉक्टर अविरत त्यांचे कर्तव्य पार पाडत आहेत. आपणही स्वत:च्या सुरक्षेसाठी आपली जबाबदारी ओळखून सुरक्षित राहूया, असा मौलिक संदेशही यावेळी डॉ.जगदीश कोठारी आणि डॉ.मुकुंद गणेरीवाल यांनी दिला.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here