नागपूर ब्युरो : महाराष्ट्राच्या स्थापनेपासून लोकप्रशासनाच्या माध्यमातून निर्माण झालेला आयाम, त्या – त्या काळानुरुप लोककल्याणाच्या माध्यमातून निर्माण झालेली धोरणे, राज्यातील विविध ऐतिहासिक घटनांचा मागोवा ‘लोकराज्य’ च्या माध्यमातून वेळोवेळी सूचिबद्ध झालेला आहे. हा बहुमोल ऐतिहासिक दस्ताऐवज आता डिजीटल फॉरमेट मध्ये अंकनिहाय उपलब्ध होत असून लवकरच तो गुगल व इतर प्लॅटफॉर्मद्वारे वाचक, अभ्यासकांपर्यंत पोहोचवू असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने ‘लोकराज्य’ च्या दुर्मिळ अंकाच्या प्रदर्शनाचे उद्धाटन व पहिल्या टप्प्यात प्राथमिक स्तरावर डिजीटल स्वरुपात उपलब्ध केलेल्या ५० दुर्मिळ अंकाचे लोकार्पण प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. विधानभवन परिसरात उभारण्यात आलेल्या या प्रदर्शनाच्या उद्धाटन समारंभास प्रभारी उपसचिव अजय भोसले, संचालक प्रशासन किशोर गांगुर्डे, नागपूर विभागाचे संचालक गणेश मुळे, संचालक वृत्त गोविंद अहंकारी, कक्ष अधिकारी युवराज सोरेगावकर, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील लोकप्रशासन, राज्यपातळीवर घेतलेली विविध धोरणात्मक निर्णय याबद्दल संपूर्ण भारतात आकर्षण आहे. राज्यशास्त्र, इतिहास या ज्ञानशाखातील संशोधकांसाठी महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये, जडणघडणीमध्ये कालपरत्वे झालेल्या विविध निर्णयांची माहिती लोकराज्यच्या अंकामध्ये वेळोवेळी घेण्यात आलेली आहे. ही जडणघडण व यातील पाऊलखुणा असा मोठा दस्ताऐवज आता जगातील प्रत्येक व्यक्तीला एका क्लिकवर उपलब्ध करुन देवू असे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी स्पष्ट केले.




















