नागपूर ब्युरो: पोलीस आयुक्त डॉ रवींद्र कुमार सिंगल नागपूर शहर यांच्या संकल्पनेतून दि 04/10/2025 रोजी सायं.4.00 वा नागपूर शहर पोलीस आयुक्तालयातील महिला अधिकारी व अंमलदार यांच्याकरिता “पाळणाघर” या उपक्रमाचे उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.नागपूर शहर पोलीस दलामध्ये अनेक महिला अधिकारी आणि अंमलदार आपले कर्तव्य पार पाडत असताना त्यांना अनेक वेळा विविध अडचणींचा सामना करावा लागतो. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांना जेव्हा नागपूर शहर पोलीस दलातील महिलांच्या अडचणींबाबत चर्चा करण्याची संधी मिळाली, त्यावेळी त्यांनी जाणले की — कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे, विशेषतः लहान बालकांची काळजी घेण्यासाठी घरी कोणी नसल्याने, आणि पती-पत्नी दोघेही नोकरीवर असल्यामुळे आपत्यांची देखभाल करणे अत्यंत कठीण होते. यामुळे पोलिस महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. हीच अडचण ओळखून, पोलीस आयुक्तांनी काही दिवसापूर्वीच “पाळणाघर” सुरू करण्याची संकल्पना मांडली होती. यासाठी विशेष प्रशिक्षित तज्ञ श्रीमती प्रिन्सी सोनी ,इतर तसेच पोलीस अधिकारी यांच्या समन्वयातून त्यांनी ठाम निश्चय करून या उपक्रमाला मूर्त रूप दिले. आज पोलीस मुख्यालय, नागपूर येथे या “पाळणाघर” चे उद्घाटन पोलीस आयुक्त डॉ रवींद्र कुमार सिंगल यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

नागपूर शहरातील 34 पोलीस ठाणे व 10 शाखांमधील प्रत्येकी 5 महिला अंमलदार/अधिकारी यांना त्यांच्या आपत्यांसह या कार्यक्रमाकरिता आमंत्रित करण्यात आले होते. या उद्घाटन सोहळ्यास एकूण 80 महिला अंमलदार, 4 महिला पोलीस अधिकारी, 60 लहान आपत्ये — अशा मिळून 144 पोलीस दलातील सदस्यांसह इतर मान्यवर पाहुण्यांची उपस्थिती होती.
पोलीस आयुक्तांनी या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी नमूद केले की, *“नागपूर शहर पोलीस दलातील महिला अधिकारी व अंमलदार आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडतात. मात्र लहान मुलांच्या देखभालीमुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. ‘चिमणीघर’ पाळणाघर हा त्यांच्या हक्काचा दिलासा आहे. या उपक्रमामुळे त्यांना निश्चिंतपणे कर्तव्य बजावता येईल आणि व्यावसायिक तसेच कौटुंबिक जीवनात समतोल राखणे सुलभ होईल”ही सुविधा केवळ नागपूरपुरती मर्यादित न राहता इतर पोलीस दलांसाठीही एक आदर्श ठरेल, असा विश्वास पोलिस आयुक्त यांनी मांडला.* या पाळणाघराला “चिमणीघर” असे नामकरण करण्यात आले आहे. ज्याप्रमाणे लहान पक्ष्यांची काळजी प्रेमाने घेतली जाते, त्याच भावनेने या “चिमणीघरात” पोलीस आपत्यांची देखभाल केली जाईल. हे केवळ नावापुरते नाही, तर येथे लहान मुलांसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. आरोग्य, स्वच्छता व सुरक्षिततेकडे विशेष लक्ष दिले जाईल, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

उद्घाटन प्रसंगी पोलीस उपायुक्त श्रीमती महक स्वामी यांनी पाळणाघराची आवश्यकता स्पष्ट करत त्याचे महत्त्व सांगितले. सहपोलीस आयुक्त श्री नवीन चंद्र रेड्डी यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, पोलीस ठाण्यात महिला अंमलदारांना त्यांच्या लहान बाळांसह कर्तव्य बजावताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, ज्याचा परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर होतो. या समस्येचे एकमेव समाधान म्हणजे “पाळणाघर” असे त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमात विविध महिला अधिकारी अंमलदारांनी देखील आपले अनुभव मांडले. यात पोलीस स्टेशन मानकापूर येथील API निशा खोब्रागडे, आर्थिक गुन्हे शाखेतील Wpc अवेक्षणी, तसेच पोलीस स्टेशन खापरखेडा येथील Wpc प्रगती यांनी पाळणाघराचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाला सहपोलीस आयुक्त, अप्पर पोलीस आयुक्त श्री वसंत परदेशी (गुन्हे) तसेच सर्व पोलीस उपायुक्त उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सपोनी अमोल दोंड, जनसंपर्क अधिकारी, पोलीस आयुक्त कार्यालय यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता पीआरओ टीममधील महिला पोलीस अंमलदार निधी, प्रियंका, पायल, पोलीस अंमलदार अनुराग, अंकित तसेच वेल्फेअर शाखेचे सपोनी श्री पिंपळेशेंडे यांनी परिश्रम घेतले.




















