Home मराठी गुजरात विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता, आज 12 वाजता निवडणूक आयोगाची...

गुजरात विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता, आज 12 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

336

गुजरातमधील विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होऊ शकतात. निवडणूक आयोग आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. यादरम्यान निवडणूक आयोग गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकतो, असे मानले जात आहे. गुजरातमध्ये गेल्या 27 वर्षांपासून भाजपचे सरकार आहे.

गुजरातमध्ये गेल्या वेळेप्रमाणेच यावेळीही दोन टप्प्यांत निवडणुका होऊ शकतात, असे मानले जात आहे. आयोगाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात गुजरातमध्ये दोन टप्प्यांत मतदान होऊ शकते. शक्यतो 2 डिसेंबरला पहिल्या टप्प्यासाठी आणि 5 किंवा 6 डिसेंबरला दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होऊ शकते. त्याचवेळी हिमाचल प्रदेशात 8 डिसेंबरला मतमोजणी होऊ शकते. हिमाचल प्रदेशमध्ये 12 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

यापूर्वी, 2017च्या विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक हिमाचल प्रदेशमध्ये 12 ऑक्टोबर आणि गुजरातमध्ये 13 दिवसांनी 25 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आले होते. यावेळी 13 दिवसांचे अंतर 21 दिवसांपर्यंत वाढू शकते. हिमाचलच्या निवडणुकीच्या तारखा 14 ऑक्टोबरला जाहीर झाल्या. गुजरात विधानसभेचा कार्यकाळ 18 फेब्रुवारी 2023 पर्यंत आहे.

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकारणाचा पारा चांगलाच तापला आहे. भाजप गुजरातची सत्ता कायम ठेवण्याचा प्रयत्न करत असून यावेळी 182 जागांपैकी 160 पेक्षा जास्त जागांचे लक्ष्य ठेवले आहे. त्याचवेळी भाजपला सत्तेतून बेदखल करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. या सगळ्यात आम आदमी पक्षही या दोघांच्या जागी नवा पर्याय देण्यासाठी विविध आश्वासने देऊन जोरदार प्रयत्न करत आहे.

1960 मध्ये महाराष्ट्रापासून वेगळे झाल्यानंतर अस्तित्वात आलेल्या गुजरातमध्ये 1962 मध्ये पहिली निवडणूक झाली. राज्यात काँग्रेस प्रदीर्घ काळ सत्तेत राहिली, पण 1995च्या निवडणुकीत भाजपने विजय मिळवला तेव्हा पक्षाच्या सर्व नव्या निर्णयांची प्रयोगशाळा गुजरात बनली. 2017च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला काँग्रेसकडून आव्हान निश्चितच मिळाले, पण आपली सत्ता टिकवण्यात भाजपला यश आले.

गुजरातमध्ये विधानसभेच्या 182 जागा आहेत. 2017च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने यापैकी 99 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर भाजपला तगडी टक्कर देत काँग्रेसने 77 जागा जिंकल्या होत्या. इतरांच्या खात्यात 6 जागा होत्या. या निवडणुकीत भाजपला 50% आणि कॉंग्रेसला 42% मते मिळाली.

Previous articleसीबीआयने पुन्हा उघडली 20 हजार कोटींच्या 101 बँक घोटाळ्यांची फाइल, शिंदे सरकारने दिली संमती
Next articleअखेर 3 फूट उंचीच्या अझीम मन्सूरींच लग्न झालं:बेगम बुशराची उंचीही 3 फूट
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).