विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे यांनी सुचवलेली 12 नावांची यादी रद्द समजावी, असे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना पाठवले आहे. एकनाथ शिंदे आता नवीन यादी राज्यपालांना पाठवणार आहेत. गेल्या आठवड्यात शिंदेंनी हे पत्र राज्यपालांना पाठवल्याची माहिती आहे.
ठाकरे सरकारने पाठवलेल्या यादीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या प्रत्येकी 4 जणांचा समावेश आहे. त्यामुळे विधान परिषदेवरील या आमदारांची नियुक्ती रद्द झाल्यास मविआतील तिन्ही प्रमुख घटक पक्षांना धक्का बसणार आहे.
महाविकास आघाडी सरकारने 2 वर्षांपूर्वी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे विधान परिषदेसाठी 12 सदस्यांची यादी पाठवली होती. मात्र, राज्यपालांनी अद्याप या नावांना मंजुरी दिलेली नाही. या नियुक्त्यांवरून ठाकरे सरकार व राज्यपालांमध्ये अनेकदा वादाच्या ठिणग्याही उडवल्या. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील या मुद्द्यावरून राज्यपालांवर ताशेरे ओढले होते.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात सत्तांतर होताच मविआला शह देण्यासाठी ही जुनी यादी रद्द केली जाईल, अशी अटकळ बांधली जात होती. तसेच, एकनाथ शिंदे ही जुनी यादी रद्द करून नवी नावे सादर करतील, असेही भाकित वर्तवले जात होते. ते आता खरे ठरताना दिसत आहे. राज्यपालांना नवीन यादी सादर करण्याचे सर्वाधिकार मंत्रिमंडळाने शिंदेंना दिले आहेत, अशीदेखील माहिती आहे.
ठाकरे सरकारने पाठवलेल्या यादीत कोणाची नावं?
- काँग्रेस -1) सचिन सावंत 2) रजनी पाटील 3) मुजफ्फर हुसैन 4) अनिरुद्ध वनकर
- राष्ट्रवादी काँग्रेस – 1) एकनाथ खडसे 2) राजू शेट्टी 3) यशपाल भिंगे 4) आनंद शिंदे
- शिवसेना – 1) उर्मिला मातोंडकर 2) नितीन बानगुडे पाटील 3) विजय करंजकर 4) चंद्रकांत रघुवंशी