Home International पुण्याच्या 92 वर्षीय रीना रावळपिंडीच्या वडिलाेपार्जित घरी 75 वर्षांनंतर पाेहाेचल्या, समाेसा-चाटचाही घेतला...

पुण्याच्या 92 वर्षीय रीना रावळपिंडीच्या वडिलाेपार्जित घरी 75 वर्षांनंतर पाेहाेचल्या, समाेसा-चाटचाही घेतला आस्वाद!

फाळणी आणि वडिलाेपार्जित घर सुटल्याचे दु:ख ७५ वर्षे हृदयात साठवणाऱ्या ९२ वर्षीय रीना छिब्बर अखेर पाकिस्तानच्या रावळपिंडीत दाखल झाल्या. एका क्षणात त्यांच्या आठवणी ताज्या झाल्या. जणू सगळे काही कालच घडले असावे. पुण्याच्या रीना रावळपिंडीच्या प्रेम गल्लीतील ‘प्रेम हाऊस’ मध्ये पाेहाेचल्या. तेव्हा त्यांच्या शेजाऱ्यांनी त्यांचे स्वागत ढाेल-ताशे वाजवून केले. हे प्रेम पाहून आजीबाईंचे डाेळे भरून आले हाेते. तेथील वातावरणात फार काही बदल झालेला नव्हता. तेच घर, गल्ली, चाैक, पार. प्रेम गल्लीचे नामकरण रीना यांचे वडील प्रेमचंद यांच्यावरून झाले हाेते. रीना यांनी घरात प्रवेश करताच त्यांच्या मनात आठवणींनी गर्दी केली. घराच्या बाल्कनीत आल्यावर त्या गुणगुणायला लागल्या- ‘ये गलिंया, ये चाैबारा, यहां आना है दाेबारा’.

शेजाऱ्यांनी रीना आजींना रावळपिंडीतील प्रसिद्ध पाणीपुरी, समाेसा चाट खाऊ घातले. रीना भावुक हाेत म्हणाल्या, मला आजही माझ्या मैत्रिणी फातिमा, आबिदा यांच्याबद्दल सर्वकाही आठवते. आम्ही मैत्रिणी मिळून सायंकाळी घराच्या छतावर खेळण्यात रमून जायचाे. आजीबाईंनी रावळपिंडीतील माॅडर्न स्कूलला देखील भेट दिली. तेथे त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले हाेते. रीना यांच्या शेजारी राहणाऱ्या मुमताज बीबींना भारतातून कुणीतरी पाहुणा येणार असल्याचे कळले. तेव्हा त्या लगबगीने प्रेम हाऊसमध्ये आल्या. दाेन्ही देशांची संस्कृती एक आहे.

भारत-पाकिस्तानातील तरुणांनी परस्परांशी संवाद साधला पाहिजे. फाळणीचा विचार करणारे लाेक आता या जगात नाहीत. हे विचार संपले आहेत. आपण आता नवीन सुरुवात केली पाहिजे. पाकिस्तानातील लाेकांनी मला दिलेले प्रेम, आपुलकी मी कधीही विसरू शकणार नाही. पाकिस्तानात मी एकटी आली आहे. परंतु जाताना माझी झाेळी भरलेली असेल.

रीना छिब्बर म्हणाल्या, माझी मुलगी साेनालीने पाकिस्तानी पत्रकार सज्जाद हैदर यांनी यूृट्यूबर पाेस्ट केलेला रावळपिंडीचा व्हिडिओ दाखवला हाेता. हा व्हिडिओ पाहून त्यांनी वडिलाेपार्जित घर ओळखले. हैदर यांच्या सहकार्यानेच व्हिसा मिळू शकला. परराष्ट्र राज्यमंत्री हीना रब्बानी यांनी रीना यांना विशेष व्हिसा दिला.

Previous article#Maha_Metro | दूसरी मेट्रो रेल परियोजना महा मेट्रो के कार्यों का अनुकरण करे : श्याम दुबे
Next article#Nagpur | मैं भी लूंगा बारिश का मज़ा
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).