Home Education #IIM Nagpur | ‘आयआयएमएन’ विद्यार्थ्‍यांचे जीवन घडवेल – राष्ट्रपती रामनाथ कोविंद

#IIM Nagpur | ‘आयआयएमएन’ विद्यार्थ्‍यांचे जीवन घडवेल – राष्ट्रपती रामनाथ कोविंद

मिहान परिसरातील नवीन कॅम्पसचे रविवारी थाटात उद्घाटन 

नागपूर ब्यूरो: आयआयएम नागपूर विद्यार्थ्‍यांसाठी केवळ प्रशिक्षण केंद्र नसून ते त्‍यांचे जीवन घडविणारे केंद्र ठरेल. त्‍यांच्‍या अंतर्गत प्रतिभांना प्रोत्‍साहन देत नवीनता आणि उद्योजकतेची कास धरत आत्‍मनिर्भर भारताची निर्मिती करेल, असा विश्‍वास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्‍यक्‍त केला.

मिहान परिसरातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) कॅम्पसचे उद्घाटन रविवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार डॉ. विकास महात्मे, कृपाल तुमाने यांच्यासह नागपूर आयआयएमच्या संचलन मंडळाचे अध्यक्ष सी. पी. गुरनानी आणि संस्थेचे संचालक डॉ. भिमराय मैत्री यावेळी उपस्थित होते.

आपण सध्या ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्था आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात असलो तरी देशातील एक वर्ग या तंत्रज्ञानापासून दूर आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठांनी सामाजिक जबाबदारीचा भाग म्हणून गावे दत्तक घ्यावीत. तसेच ‘आयआयएम’सारख्या देशातील सर्वोत्कृष्ट संस्थांनी आपल्या परिसरात नाविन्यपूर्ण उपक्रमशीलता आणि डिजिटल तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी पावले उचलावीत, असे आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज येथे केले.

नाविन्यपूर्ण संशोधन आणि उद्यमशीलतेला मोठे प्रोत्साहन लाभत असलेल्या काळात विविध युनिकॉर्न किंवा स्टार्ट-अप्सनी नवा इतिहास घडविल्याचा उल्लेख करुन राष्ट्रपती म्हणाले, विविध नवीन क्षेत्रे व्यावसायिकतेच्या परिघात येत चालली असून त्यातून अनेक नव्या वाटा खुल्या झाल्या आहेत. शिक्षण, आरोग्य अशा काही महत्वाच्या क्षेत्रात हे नविन उपक्रम सुरु झाले आहेत. त्यातून रोजगार निर्मितीसोबतच महसूल प्राप्ती होणार असल्याने हा बदल देशासाठी निश्चितच ‘गेम चेंजर’ ठरु शकतो. नाविन्यता (इनोव्हेशन) आणि उद्योजकता या दोन्हींमध्ये आपले जीवन सुखकर करण्याची क्षमता तर आहेच पण त्यासोबतच अनेकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचीही क्षमता आहे. या अनुषंगाने नागपूर आयआयएम विद्यार्थ्यांमध्ये रोजगार दाते होण्याची क्षमता विकसीत करण्यासाठी अनुरुप अशी परिसंस्था निर्माण करेल, असा विश्वासही श्री. कोविंद यांनी यावेळी व्यक्त केला.

वंचितांच्या समस्या समजून घेण्यासाठी सामाजिक उत्तरदायित्वाच्या जाणीवेने नव्या पीढीने नेतृत्व भावना जोपासून काम करावे, असे आवाहन करुन राष्ट्रपती म्हणाले, सामाजिक उद्यमशीलता वाढत असून व्यावसायिक वर्तुळातील अनेकांनी याबाबत चांगला आदर्श घालून दिला आहे. भारतीय आदर्शवादात अर्थ हा नेहमीच धर्माचा अवलंब करुन प्राप्त केला जातो. समाजसेवी असणे हे चांगला व्यावसयिक असण्यासारखे आहे. पाश्चिमात्य जगात नव्वदोत्तर कालखंडात व्यावसायिक आणि व्यवसायांनी आपल्या क्षेत्राच्या नैतिक पैलूंवरही भर द्यायला सुरुवात केली. यासंदर्भात स्टिफन कोवे आणि मायकेल सँडलसारख्या व्यवस्थापन तज्ज्ञांनीही नैतिकतेचा अभाव असल्याचा व्यवसाय म्हणजे जणू लुटीचा प्रकार असल्याचे सांगितले आहे. या अनुषंगाने येथील संदर्भातही जाणिवेने अनुरूप बदल व्हावेत, असे आवाहन राष्ट्रपतींनी केले.

नागपूर होणार ‘एज्‍युकेशन हब’ – नितीन गडकरी

नागपूर हे जसे मेडीकल हब, लॉजिस्‍टीक हब म्‍हणून वेगाने विकसित होत आहे, तसेच ते भविष्‍यात आयएएमच्या माध्यमातून एक जागतिक दर्जाची ‘एज्युकेशन हब’ म्हणून विकसित होत असल्याचा अभिमान असल्‍याचे नितीन गडकरी म्‍हणाले. विदर्भातील समृद्ध वने व खनिजसंपदा यावर आधारित उद्योगांना मोठ्या प्रमाणात संधी आहे. उद्योगांच्या विकासासाठी या संस्थेने संयुक्तपणे उपक्रम राबविल्यास या भागाचा विकास होईल. व्यवस्थापन क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून या संस्थेचा निश्चितच नावलौकिक वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दुर्गम भागातील शाळा दत्‍तक घ्‍या – धमेंद्र प्रधान

शिक्षणप्रणालीला महत्त्व देणारे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीदिनी भारताच्या एका प्रमुख संस्थेच्या कॅम्पसचे लोकार्पण होत असल्याचा आनंद व्यक्त करून धमेंद्र प्रधान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असलेल्या ज्ञान, अर्थ आणि नितीला अनुसरून या संस्थेची वाटचाल असावी, अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली. आयआयएमएनने गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातील शाळा, महाविद्यालये दत्तक घेवून तेथील विकासाचे माध्यम व्हावे. विभागातील छोटे उद्योग, तसेच रस्त्यावरील व्यावसायिकांसाठी आयआयएमने पुढाकार घेवून व्यवसाय सुलभतेचे मॉडेल तयार करावे, असे आवाहन केले.

राज्‍य शासन सहकार्य देणार – सुभाष देसाई

आयआयएमएन मधून बुद्धिमान विद्यार्थी व साहसी उद्योजक निर्माण होतील, असा आत्मविश्वास व्यक्त करताना सुभाष देसाई यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी विदर्भाच्या विकासाचे स्वप्न पाहिले होते. त्या दिशेने आज एक महत्वाचे पाऊल पडत असल्‍याचे सांगितले. संस्थेने अनेक आंतरराष्ट्रीय संस्थेशी भागीदारी केली असून विविध देशातील संस्था या संस्थेशी जोडल्या गेल्या आहेत. या संस्थेच्या माध्यमातून अनेक तरुणांना आपला उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन व प्रशिक्षण मिळत आहे. ही संस्था नागपूरसह राज्यासाठी महत्त्वपूर्ण असल्यामुळे या संस्थेच्या विकासासाठी राज्य शासनातर्फे संपूर्ण सहकार्य देण्यात येणार आहे, असे ते म्‍हणाले.

नवभारताची कल्‍पना प्रत्‍यक्षात उतरवेल – देवेंद्र फडणवीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक दर्जाचे कौशल्ययुक्त मनुष्यबळ मिळावे, यासाठी व्यवस्थापन अभ्यासक्रमाचा विस्तार करण्याची सुरुवात केली आहे. कौशल्ययुक्त मनुष्यबळ निर्माण करण्याची ही प्रक्रिया असून नागपुरात उभी राहिलेली आयआयएमची वास्तू ‘स्टेट ऑफ आर्ट दर्जाची’ असून नवीन भारताचे स्वप्न साकारणारी आहे, असे गौरवोद्गार देवेंद्र फडणवीस यांनी काढले. प्रशिक्षित मनुष्यबळ असेल तेथेच उद्योग येतात. त्यामुळे या परिसरात जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण देणाऱ्या संस्था सुरु झाल्याने उद्योजकतेचा विकास होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आयआयएम संचालन मंडळाचे अध्यक्ष सी.पी. गुरनानी यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या माध्यमातून नाविन्याची, संशोधनाची जिद्दी असणारी पिढी निर्माण करण्याची मोहीम असल्‍याचे सांगितले. जागतिक दर्जाचे कॅम्पस निर्माण करू शकल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.

तत्पूर्वी, राष्ट्रपतींनी आयआयएमएनच्‍या सुसज्ज अशा इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण करून उद्घाटन केले. त्यानंतर 132 एकर क्षेत्रावर विकसित करण्यात आलेल्या परिसराची पाहणी केली. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राष्ट्रपती यांना स्मृतिचिन्ह देवून स्वागत केले. आयआयएम संचलन समितीचे अध्यक्ष सी. पी. गुरनानी व संचालक डॉ. भीमराय मैत्री यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. बिल्‍डींग कमिटी चेअरमन वैभव डांगे यांची उपस्थिती होती.

Previous articleMother’s Day 2022 | जिसने शुरू किया मदर्स डे, उसने ही की खत्म करने की कोशिश
Next articleकांग्रेस कार्य समिति की आज बैठक, भविष्य की रणनीति पर होगी चर्चा
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).