Home Nagpur व्याख्यान व प्रकाशन सोहळा । तेलाच्या अर्थकारणाचा प्रश्न सुटेपर्यंत जागतिक राजकारणात स्थिरता...

व्याख्यान व प्रकाशन सोहळा । तेलाच्या अर्थकारणाचा प्रश्न सुटेपर्यंत जागतिक राजकारणात स्थिरता अशक्य

नागपूर ब्युरो : तेलाच्या अर्थकारणाचा प्रश्न सुटेपर्यंत जागतिक राजकारणात स्थिरता येऊ शकत नाही, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतुक व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. डॉ. दंदे फाउंडेशन व राजहंस प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

वनामतीच्या सभागृहात ज्येष्ठ संपादक गिरीश कुबेर यांच्या ‘तेल नावाचं वर्तमान’ या पुस्तकाचे प्रकाशन नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. दंदे फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. पिनाक दंदे व राजहंस प्रकाशनचे नरेश सबजीवाले यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. प्रकाशन सोहळ्यानंतर ‘जागतिक अशांतता आणि ऊर्जा क्षेत्रापुढील आव्हान’ या विषयावर गिरीश कुबेर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.

 

गडकरी म्हणाले, ‘तेलाच्या अर्थकारणाने जगात दहशत निर्माण केली आहे. जगातील अशांततेचे मूळ तेलाच्या अर्थकारणात दडले आहे. त्यामुळे स्वयंपूर्ण होणे हाच एक मार्ग आहे. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून शेतकऱ्यांनी अन्नदाता होतानाच उर्जादाताही व्हायला हवे.’ सध्या भारतात तेल, गॅस आदींच्या आयातीवर आठ लाख कोटी रुपये खर्च होतात. भविष्यात हा खर्च २५ लाख रुपयांवर जाईल. हे पैसे देशाबाहेर गेले तर देशाच्या अर्थकारणावर परिणाम होईल. त्यासोबतच प्रदूषणाचाही भीषण सामना करावा लागणार आहे. त्यामुळे पर्यायी इंधनाचा वापर ही काळाची गरज असणार आहे, असेही ते म्हणाले.

गिरीश कुबेर यांनी सौर ऊर्जेपुढील आव्हानांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, ‘कोळसाआधारीत वीजेसाठी सौर उर्जा हा पर्याय दिला जातो, पण सौरउर्जेसाठी वापरल्या जाणाऱ्या बॅटरीचे आणि त्यासाठी लागणाऱ्या लिथियमचे काय करायचे, या प्रश्नांची उत्तरे कुणाकडेच नाहीत. त्यामुळे हरितउर्जा ही सरसकट पर्यावरणस्नेही आहे, हा गैरसमज आहे.’

उर्जाविषयक विविध पर्यायांना स्थान द्यावे लागेल. तसे प्रयत्न ज्या ज्या देशांनी केले, ते सर्व महासत्ता म्हणून गणले जातात. भारताला महासत्ता होण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर उर्जाविषयक विविध प्रयत्नांना स्थान द्यावेच लागेल. उर्जेच्या जाणिवांकडे आपण प्रगल्भपणे बघितलेच नाही, म्हणून व्यापक उर्जांधळेपणा देशात आला आहे. या उर्जांधळेपणातून बाहेर येण्याची गरज आहे, असेही कुबेर म्हणाले.

डॉ. पिनाक दंदे यांनी प्रास्ताविकातून भूमिका विषद केली. ते म्हणाले, ‘गिरीश कुबेर यांचे पुस्तक ज्या विषयावर आहे त्या विषयावर नितीन गडकरीच अनुभवातून बोलू शकतात, याची आम्हाला जाणीव होती. नितीनजींनी देखील या निमंत्रणाचा आनंदाने स्वीकार केला.’ संचालन ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी यांनी केले. राजहंस प्रकाशनचे नरेश सबजीवाले यांनी आभार मानले.

Previous article12+ मुलांचे लसीकरण उद्यापासून; 60+ वरील सर्व ज्येष्ठांना बूस्टर डोस मिळणार
Next article#Nagpur | 19 ते 24 मार्च दरम्‍यान खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाचा दुसरा टप्‍पा 
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).