Home Finance पुन्हा महागाई । जीएसटी कौन्सिल किमान टॅक्स रेट वाढवण्याची शक्यता; स्लॅब 5%...

पुन्हा महागाई । जीएसटी कौन्सिल किमान टॅक्स रेट वाढवण्याची शक्यता; स्लॅब 5% वरून 8% करण्याचा विचार

खाद्यतेल, मसाले, चहा, कॉफी, साखर, मिठाई आणि इन्सुलिनसारख्या जीवनरक्षक औषधांसहित अनेक वस्तू महाग होऊ शकतात. जीएसटी परिषद आगामी ४७ व्या बैठकीत वस्तू आणि सेवा कराचा (जीएसटी) किमान दर ५% वरून वाढवून ८% करण्यावर विचार करू शकते. त्याशिवाय महसूल वाढवणे आणि नुकसान भरून काढण्यासाठी केंद्रावरील राज्यांचे अवलंबित्व संपवण्यासाठी जीएसटी व्यवस्थेत सूट असलेल्या उत्पादनांच्या यादीतही कपात होण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी रविवारी ही माहिती देताना सांगितले की, राज्यांच्या अर्थमंत्र्यांचा एक समूह (जीओएम) परिषदेला या महिनाअखेरीस आपला अहवाल सोपवू शकतो. त्यात सर्वात खालचा टॅक्स स्लॅब वाढवणे आणि स्लॅब तर्कसंगत करणे यांसारखी अनेक पावले उचलण्याची सूचना केली जाऊ शकते. सध्या जीएसटीच्या टॅक्स स्लॅबमध्ये ५%, १२%, १८% आणि २८% असे चार दर आहेत.

आवश्यक वस्तूंवर कर लागत नाही किंवा मग त्या सर्वात खालच्या स्लॅबमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, लक्झरी वस्तू सर्वात उच्च टॅक्स स्लॅबमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. सूत्रांनुसार, कराचा किमान दर ५% वरून ८% करण्याचा प्रस्ताव जीओएम मांडू शकतो. त्यामुळे वार्षिक १.५० लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळू शकतो. खालच्या स्लॅबमध्ये १% ची वाढ केल्यास वार्षिक ५०,००० कोटी रुपयांची महसूल वाढ होऊ शकते. या स्लॅबमध्ये प्रामुख्याने पाकीटबंद खाद्यपदार्थ येतात.

सूत्रांनी सांगितले की, जीएसटी करप्रणाली तर्कसंगत करण्यासाठी जीओएम त्याचा आराखडा तीन स्तरांचा करण्यावरही विचार करत आहे. त्यात करांचा दर ८%, १८% आणि २८% ठेवला जाऊ शकतो. जीएसटी परिषदेने हा प्रस्ताव मंजूर केला तर १२% च्या कक्षेत येणाऱ्या सर्व वस्तू आणि सेवा १८% च्या स्लॅबमध्ये येतील. त्याशिवाय जीएसटीपासून सूट असलेल्या वस्तूंची संख्या कमी करण्याचा प्रस्तावही जीओएम देईल. सध्या ब्रँडविना असलेले आणि पॅकेजविना असलेले खाद्यपदार्थ आणि डेअरीच्या वस्तू जीएसटीच्या कक्षेबाहेर आहेत. जीएसटी परिषदेची पुढील बैठक मार्चअखेरीस किंवा एप्रिलच्या सुरुवातीस होऊ शकते. तीत जीओएमच्या अहवालावर चर्चा केली जाईल.

५% या किमान दराच्या कक्षेतील वस्तू व सेवा

प्रमुख वस्तू :

  1. खाद्यतेल, मसाले, चहा, कॉफी, साखर, मिठाई, काजू.
  2. इन्सुलिनसारखी जीवनरक्षक औषधे, बर्फ.
  3. वॉकिंग स्टिक, दिव्यांगांना उपयोगी पडणारे साहित्य,
  4. बायोगॅस, खते, अगरबत्ती.
  5. कोळसा, फ्लाय अॅश ब्लॉक्स, कॉयर मॅट्स आणि फ्लोअर कव्हरिंग.
  6. वाऱ्यावर चालणारी पिठाची गिरणी किंवा पाणचक्की, नॅचरल कॉर्क.

परिवहन सेवा :

  1. इंधन खर्चाविना मोटर कॅब भाड्याने घेणे.
  2. एसी वाहने आणि रेडिओ टॅक्सींकडून परिवहन सेवा घेणे.
  3. एअरक्राफ्ट लीजिंग.
  4. तीर्थयात्रेसाठी हवाई मार्गाने नियोजित वाहतूक किंवा प्रवास, त्यात चार्टर्ड विमानांचाही समावेश.
  5. टूर ऑपरेटर सर्व्हिसेस.

इतर :

  1. प्रिंट मीडिया अॅडव्हर्टायझिंग स्पेस.
  2. वृत्तपत्र छपाईतील रोजगार.
  3. देशाबाहेर जहाजाद्वारे वस्तू पाठवणे.
Previous articleओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नाहीच : सर्वपक्षीय बैठकीत नेत्यांची भूमिका
Next articleएनएसई च्या माजी सीईओला केली अटक:​​​​​​​चित्रा रामकृष्ण यांना तीन दिवसांच्या चौकशीनंतर अटक
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).