Home Education ऑनलाइन अभ्यास । ना कोचिंग क्लास, ना आई-वडील.. तरीही हिंगोलीत बसून एमबीबीएसला...

ऑनलाइन अभ्यास । ना कोचिंग क्लास, ना आई-वडील.. तरीही हिंगोलीत बसून एमबीबीएसला प्रवेश

394

पाल्याला एमबीबीएसला प्रवेश मिळावा म्हणून विद्यार्थीच काय, पालकही जिवाचे रान करतात. मोठमोठ्या शहरात घर करून लाखो रुपये खर्चून कोचिंग क्लास लावले जातात. इतके करूनही यशाची खात्री अत्यंत कमी. पण जिद्द, चिकाटी असेल तर छोट्या शहरात राहून क्लास न लावताही यश मिळवता येते हे हिंगोलीच्या कैलास शेषराव ढोकर या विद्यार्थ्याने सिद्ध करून दाखवले. कौतुक म्हणजे वयाच्या दुसऱ्या वर्षी आईचे अन् दहाव्या वर्षी वडिलांचे छत्र हरवले, तरीही न खचता हिंगोलीच्या सेवा सदनात राहून त्याने हे देदीप्यमान यश मिळवले.

वरूड काजी येथील कैलासच्या आई-वडिलांचे निधन झाल्यानंतर काकांनी त्याचा सांभाळ केला. त्याने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण वरूड काजी व सेनगाव येथे पूर्ण केले, तर परभणी येथून बारावी उत्तीर्ण केली. कैलासला डॉक्टर होण्याची इच्छा होती. त्यानुसार त्याने अभ्यास सुरू ठेवला. मात्र काही कारणांमुळे मागील वर्षी त्याला नीटची परीक्षा देता आली नाही. त्यामुळे निराश झालेल्या कैलासने थेट नाशिक गाठून एका कंपनीत नोकरी करण्यास सुरुवात केली. याबाबतची माहिती सेवा सदन वसतिगृहाच्या अध्यक्षा मीरा कदम व त्यांचे पती धनराज कदम यांना मिळाल्यानंतर त्यांनी कैलासला बोलावून घेतले. त्याची अडचण लक्षात घेऊन त्याला सेवा सदनात ठेवून घेतले. त्याच्या नीट परीक्षेच्या अभ्यासाची तयारीही करून घेतली. कैलासनेही सोशल मीडियाच्या माध्यमातून अभ्यास सुरू ठेवला.

नीट परीक्षेत त्याने ४४१ गुण मिळवले. त्याला बीएएमएससाठी प्रवेश मिळणे शक्य होते. मात्र त्याला अनाथ प्रमाणपत्र मिळाल्यास त्याचा एमबीबीएससाठी नंबर लागू शकतो ही बाब त्यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना सांगितली तसेच प्रमाणपत्र देण्याची विनंती केली. दरम्यान, कैलासची हुशारी अन् त्याची वैद्यकीय शिक्षण घेण्याची इच्छा लक्षात घेत जिल्हाधिकारी पापळकर यांनी ्र प्रमाणपत्र दिले. विशेष म्हणजे जिल्ह्यातील अनाथ मुलाचे पहिले प्रमाणपत्र त्याला मिळाले. या प्रमाणपत्राचा त्याला वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी लाभ झाला असून त्याची कुपर (मुंबई) येथे निवड झाली.

नियोजनाबाबत कैलास म्हणाला की, पहाटे चारला उठून अभ्यासाला बसायचो. यूट्यूबवरील व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यास केला. दुपारी जेवण व त्यानंतर पुन्हा अभ्यास असे दिवसभराचे नियोजन होते. रात्री केवळ पाच तास झोप घेतली. एक वर्ष गॅप पडल्यानंतरही खचून न जाता अभ्यास सुरू ठेवला. त्यासाठी सेवा सदनच्या अध्यक्षा, ज्यांना आम्ही आई मानतो त्या मीरा कदम व धनराज कदम यांनी पाठबळ दिल्याने हे यश गाठता आले.

आता खरी आमची परीक्षा, लोकवाटा जमा करू

आता खरी परीक्षा आमची आहे. होस्टेलची व्यवस्था नसल्याने कैलासच्या राहण्याचा व भोजनाचा खर्च करावा लागणार आहे. त्यासाठी दानशूरांकडून मदत घेतली जाणार असून लोकवाट्यातून त्याचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. – मीरा कदम, अध्यक्षा, सेवा सदन वसतिगृह, हिंगोली.

Previous articleओबीसी आरक्षणाविना निवडणूक हा घटनादुरुस्तीचा भंग : आयोग, आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी
Next articleसरकारने ब्युटी कॅमेरा आमो स्वीट सेल्फीसहित चीनचे 54 अ‍ॅप बॅन केले
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).