Home बॉलिवूड लता मंगेशकर | ‘गानकोकिळा’ काळाच्या पडद्याआड, दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

लता मंगेशकर | ‘गानकोकिळा’ काळाच्या पडद्याआड, दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

522

चित्रपटसृष्टीसाठी आजचा दिवस काळा दिवस ठरला आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 93 व्या वर्षी गानकोकिळेने या जगाचा कायमचा निरोप घेतला आहे. आज सकाळपासून लता दीदी उपचाराला प्रतिसाद देत नव्हत्या. सकाळी 8.12 वाजता अवयव निकामी झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. मागील 8 जानेवारीपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातील आयसीयूत त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना कोरोनाची लागण झाली होती, शिवाय न्यूमोनियाचेही त्यांना निदान झाले होते. त्यांच्या निधनानंतर दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

दुपारी 12.30 वाजता प्रभूकुंज या त्यांच्या निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. संध्याकाळी शिवाजी पार्कवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या घराबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवरांनी रुग्णालयात जाऊन त्यांचे अंत्यंदर्शन घेतले आहे.

आपल्या भावना व्यक्त करताना नितीन गडकरी म्हणाले – लता मंगेशकर या देशाचा अभिमान होता. त्यांनी संपूर्ण विश्वात देशाचे नाव मोठे केले होते. लता मंगेशकर हे जगातील सातवे आश्चर्य आहे, असे म्हटले जाते. त्यांचा आवाज आपण कधीही विसरु शकत नाही. वयाच्या 60 ते 70 व्या वर्षी त्यांचा आवाज हा 20 वर्षांच्या तरुणीप्रमाणे होता. त्यांचे जाणे एक मोठा आघात आहे. आमचा एक मोठा आधार गेला आहे. अनेक भाषांमध्ये त्यांनी गाणी गाऊन विश्वात एक रेकॉर्ड निर्माण केला. माझे त्यांच्या कुटुंबाशी खूप घनिष्ठ नाते होते. त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. संपूर्ण देशाला त्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांच्या जाणे संपूर्ण देशासाठी मोठा आघात आहे. मला खूप दुःख आहे, आजच मुंबईत आलो आणि सकाळीच मी दुःखद बातमी मिळाली. लता दीदींचे जाणे आपल्या सगळ्यांच्या जीवनाला मोठा धक्का आहे.

आठवड्याभरापूर्वी त्यांनी कोरोनावर मात केली होती आणि त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली होती. पण शनिवारी पुन्हा एकदा त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आल्याचे वृत्त आले होते. अखेर उपचारादरम्यान दीदींनी आज अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीसह देशात शोककळा पसरली आहे.

दीदींचा अल्पपरिचय

लता मंगशेकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 ला एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. मध्यप्रदेशच्या इंदोर शहरात जन्मलेल्या लता पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या थोरल्या कन्या होत्या. त्यांचे वडील रंगमंचाचे कलाकार आणि गायक होते. लता मंगेशकरांचे कुटुंब संगीतासाठी प्रसिद्ध असून, सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. वयाच्या पाचव्या वर्षी लता दीदींनी वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बाल-कलाकार म्हणून कामाची सुरुवात केली होती. 1942 मध्ये लता दीदी अवघ्या 13 वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.

लता मंगेशकर यांनी आपली वेगळी ओळख निर्माण करत हिंदी, मराठीसह अनेक भाषांमध्ये रसिकांच्या मनावर आपले नाव कोरले. त्यांच्या नावे गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌समध्ये देखील विक्रम नोंदलेले आहेत. 1974 ते 1991 च्या कालावधीत सर्वात जास्त रेकॉर्डिंग्सचा विक्रम त्यांनी केला. बॉलिवूडसह देशविदेशातील विविध भाषांतील गाण्यांना आपल्या मोहक आवाजाने त्यांनी स्वरबद्ध केले. लता मंगेशकरांच्या कारकिर्दीची सुरुवात 1942 मध्ये झाली. त्यांनी हजारांहून अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली आहेत. 2001 साली त्यांना ‘भारतरत्‍न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लता मंगेशकर अर्थात लतादिदींनी आपल्या जादुई आवाजाच्या जोरावर ‘गानकोकिळा’ अशी बिरुदावली आपल्या नावासमोर मिळवली होती. गायनाच्या क्षेत्रात अमूल्य योगदान दिल्याबद्दल त्यांना भारत रत्नसह पद्म विभूषण, पद्म भूषण आणि दादासाहेब फाळके अवार्ड सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.