Home मराठी ‘जल जीवन मिशन’अंतर्गत विभागातील 6 हजार 123 गावात नळाद्वारे पिण्याचे पाणी-प्रधान सचिव...

‘जल जीवन मिशन’अंतर्गत विभागातील 6 हजार 123 गावात नळाद्वारे पिण्याचे पाणी-प्रधान सचिव संजीव जैस्वाल

555
  • * जल जीवन, स्वच्छ भारत मिशनचा आढावा
  • * नळाद्वारे बारा महिने गुणवत्तापूर्ण पाण्याचा पुरवठा
  • * मिशन म्हणून योजना पूर्ण करण्याचा संकल्प
  • * पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकटीकरणाला प्राधान्य
  • * प्रत्येक गावाचा स्वतंत्र आराखडा तयार करा

नागपूर : ग्रामीण भागातील जनतेला बाराही महिने नळाद्वारे गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी ‘जल जीवन मिशन’ हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम विभागातील 6 हजार 123 गावांमध्ये राबविण्यात येत आहे. दर दिवशी प्रती व्यक्ती 55 लिटर पिण्याचे पाणी देणाऱ्या या योजनेसाठी गावनिहाय आराखडा तयार करुन मिशन मोडवर या कार्यक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याच्या सूचना पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जैस्वाल यांनी दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात ‘जल जीवन मिशन’ तसेच ग्रामीण स्वच्छ भारत अभियानाचा आढावा प्रधान सचिव श्री. जैस्वाल यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जल जीवन, पाणी व स्वच्छता मिशनचे संचालक ऋषीकेश येशोद, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे सहसचिव अभय महाजन, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे आयुक्त चिंतामणी जोशी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या अवर सचिव श्रीमती अनुष्का दळवी, श्रीमती सरोज देशपांडे, डॉ. रविंद्र भराटे, विकास उपायुक्त अंकुश केदार तसेच विभागातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

‘जल जीवन मिशन’अंतर्गत ‘हर घर जल’ हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम केंद्र व राज्य शासनातर्फे राबविण्यात येत असून प्रत्येक घरात नळाद्वारे बाराही महिने पाणी देण्यासाठी 90 दिवसांचा विशेष कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगताना प्रधान सचिव संजीव जैस्वाल म्हणाले की, राज्यातील 12 लाख घरांना नळाद्वारे पाणी देण्याचे ध्येय साध्य करावयाचे आहे. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गावनिहाय सविस्तर प्रकल्प अहवाल(डीपीआर) तयार करताना पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत निश्चित करण्यासोबतच स्त्रोत वाढविण्यासाठी इतर योजनांचा समन्वय करुन हे मिशन यशस्वी करावे, अशा सूचना यावेळी दिल्या.

‘जल जीवन मिशन’अंतर्गत पाच बाबींवर लक्ष केंद्रित करायचे असून यामध्ये प्रत्येक घरात पाईप लाईनद्वारे पाणी पुरविणे, प्रति व्यक्ती किमान 55 लिटर बारा महिने पिण्याचे पाणी पुरवठा करणे. तसेच गुणवत्तापूर्ण पाण्याचा दर्जा राखणे आवश्यक आहे. पाणीपुरवठा करताना प्रत्येक घराची चेकलिस्ट तयार करुन आराखडा तयार करावा. या आराखड्याला जिल्हाधिकारी यांनी मान्यता द्यावी. 90 दिवसांच्या मिशन कार्यक्रमांतर्गत ठरवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे, असेही त्यांनी सांगितले.

‘जल जीवन मिशन’ आराखडा लोकसहभाग तसेच ग्राम सभेच्या माध्यमातून तयार करायचा असून यासंदर्भात लोकांचे प्रबोधन करावयाचे आहे. विदर्भात भूजल पातळी समाधानकारक आहे. परंतू ज्या गावांना आठ महिने पाणीपुरवठा केला जातो अशा गावात अतिरिक्त पाण्याचा स्त्रोत शोधणे आणि त्याचे बळकटीकरण करताना यापूर्वी तयार करण्यात आलेल्या आराखड्यात परिस्थितीनुरुप बदल करावा, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

मिशनच्या अंमलबजावणीसाठी मंजूर योजनेनुसार निधी उपलब्ध आहे. योजनेची अंमलबजावणी करताना दहा टक्के लोकसहभाग असला तरी योजना पूर्ण झाल्यानंतर हा निधी संबंधित गावांना मिळणार असून या निधीमधून पुढील पाच वर्षे योजनेच्या देखभाल व दुरुस्तीचे कामे करणे शक्य होणार आहे. गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या गावांमध्ये सौर ऊर्जेवर योजना कार्यान्वित करता येईल यासाठी अतिरिक्त निधी सुद्धा मिळणार आहे. योजनेच्या अंमलबजावणीचे संपूर्ण अधिकार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना असून त्यांनी नियमित आढावा घेवून ही योजना मिशन मोडवर राबवावी असे सांगितले.

नागपूर विभागात या मिशन अंतर्गत 6 हजार 123 गावांचा समावेश असून त्यापैकी 3 हजार 916 गावांचे सविस्तर प्रकल्प अहवाल पूर्ण झाले आहेत. 1 हजार 99 गावात प्रत्यक्ष कामे प्रगतीपथावर असून या मिशनसाठी 1 हजार 415 कोटी रुपयांचे आराखडे आहेत. यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तसेच जिल्हानिहाय कंत्राटदारांची निवड करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे यावेळी सांगितले.
शाळा व अंगणवाड्यांना पिण्याचे पाणी

विभागातील शाळा व अंगणवाड्यांना नळाद्वारे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी मिशन अंतर्गत कार्यक्रम राबविण्यात येत आहे. विभागातील 10 हजार 399 शाळा तसेच 11 हजार 483 अंगणवाड्यांमध्ये नळाद्वारे पाणी पुरविण्यासाठी 90 दिवसांच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत 31 डिसेंबरपूर्वी पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. या योजनेचा आढावा यावेळी प्रधान सचिवांनी घेतला.

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्रत्येक घरात शौचालय व गाव हागणदारीमुक्त करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत विभागातील 6 हजार 980 गावांचा समावेश करण्यात आला आहे. हा उपक्रम ग्रामसेवक, गटविकास अधिकारी तसेच जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत शौचालयाचा वापर वाढविण्यासोबतच सार्वजनिक शौचालय संकुल सुद्धा बांधण्यात येणार आहेत. यासाठी प्रत्येकी 3 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. नागपूर विभागासाठी 659 कोटी रुपये या कार्यक्रमासाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

पाण्याचे नमुने तपासण्यासाठी विभागात 26 प्रयोगशाळा

‘जल जीवन मिशन’अंतर्गत गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी मिळण्यासाठी पाण्याचे नमुने तपासणीसाठी नागपूर विभागात 26 प्रयोगशाळा भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतर्फे सुरु करण्यात येणार आहेत. या प्रयोगशाळेमुळे नागरिकांना गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.

यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा यांनी जीवन प्राधिकरणातर्फे राबविण्यात येत असलेल्या पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेतला. पिण्याच्या पाण्याच्या मोठ्या योजनांची कामे प्राधिकरणातर्फे करण्यात येतील. विभागात 25 योजनांची कामे सुरु असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
‘जल जीवन मिशन’चे संचालक ऋषिकेश येशोद, स्वच्छता विभागाचे सहसचिव अभय महाजन तसेच भूजल सर्वेक्षण यंत्रणेचे आयुक्त चिंतामणी जोशी विभागात सुरु असलेल्या योजनांचा आढावा घेतला.

प्रारंभी विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात ‘जल जीवन मिशन’, स्वच्छ भारत मिशन तसेच अटल भूजल योजना यासंदर्भात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती प्रास्ताविकात दिली. आभार विकास उपायुक्त अंकुश केदार यांनी मानले.

Previous articleवाहतूक नियम मोडल्यास दहापट दंड, शिक्षेसह परवाना निलंबनाचीही तरतूद
Next articleसीडीएस बिपिन रावत की बेटियों के आंसू नहीं थम रहे, अंतिम दर्शन करने पहुंचे शाह और डोभाल
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).