Home Maharashtra राज्यात अद्याप 123 एसटी डेपो ठप्प, महामंडळाचा 127 आगार सुरू झाल्याचा दावा

राज्यात अद्याप 123 एसटी डेपो ठप्प, महामंडळाचा 127 आगार सुरू झाल्याचा दावा

500

एसटी कर्मचाऱ्यांच्या ८ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या आंदोलनाला एक महिना पूर्ण होत असताना महाविकास आघाडी सरकारला संप हाताळण्यात अपयश आले आहे. आजही १२३ आगार ठप्प असून १२७ आगार सुरू झाल्याचा दावा महामंडळ करत आहे. विशेष म्हणजे, निवडणुकीपूर्वी आपणच जाहीर केलेल्या जाहीरनाम्यांचा विसर पडलेल्या राज्य सरकारने याच मागणीसाठी आंदोलनकर्त्या कामगारांवर या महिनाभरात कारवाईचा बडगा उगारला आहे.

महिनाभरात एसटी महामंडळाने ९,९१० आंदोलकर्त्या कामगारांना निलंबित केले असून रोजंदारीवरील २०१४ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली आहे. एवढ्या प्रदीर्घ कालावधीपर्यंत चाललेला महामंडळ स्थापनेनंतर ६१ वर्षांतील हा पहिलाच व विक्रमी संप ठरला आहे. पगारवाढीनंतर १९ हजार कर्मचारी कामावर परतल्याचा दावा सरकारने केला असला तरी आंदोलनकर्त्या कामगारांची आशा २० डिसेंबरला होऊ घातलेल्या न्यायालयाच्या निर्णयाकडे आहे.

पहिलाच दीर्घकालीन संप

महामंडळाच्या स्थापनेपासून महिनाभर प्रदीर्घ काळ चाललेला हा ऐतिहासिक संप ठरला आहे. १९७२ मध्ये १५ दिवसांचा संप झाला होता. त्यानंतर चार दिवसांपेक्षा अधिक दिवस झालेला हा पहिलाच संप आहे. याआधीही एस. टी. कर्मचाऱ्यांना प्रत्येक वेतनवाढीसाठी संपाचे आंदोलन छेडावे लागल्याचा महामंडळाचा इतिहास आहे.

  1. – १९७२ मध्ये १५ दिवसांचा संप झाला.
  2. – २००७ मध्ये मॅक्सी कॅबच्या विरोधात एक दिवसाचा संप झाला.
  3. – ऑक्टोबर २०१७ मध्ये चार दिवसांचा संप झाला होता.
  4. – जून २०१८ मध्ये सातव्या वेतनासाठी संप केला.