Home Maharashtra #Maharashtra । संप काही सुटेना, खान्देशात 5 बसेसवर दगडफेक, चालक जखमी; मुंबईत...

#Maharashtra । संप काही सुटेना, खान्देशात 5 बसेसवर दगडफेक, चालक जखमी; मुंबईत ‘फ्लॅश लाइट’ आंदोलन

418
मुंबई ब्युरो : एसटी संपाचा फटका रविवारी राज्यातील शिक्षकांच्या टीईटी परीक्षेला बसला. हजारो विद्यार्थी या परीक्षेला मुकले. एसटी बसची सोय नसल्याने नाशकात अनेक उमेदवार उशिरा पोहोचले, तर औरंगाबादेत सुमारे २५०० उमेदवार परीक्षेला हजर राहू शकले नाहीत.

इकडे, मुंबई भाजप नेत्यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनात रविवारी रात्री कामगार-कर्मचाऱ्यांनी ‘फ्लॅश लाइट’ आंदोलन केले. आंदोलनात उपस्थित सुमारे १० ते १२ हजार कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी मोबाइलचे फ्लॅश लावून राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, राज्यातील संपकऱ्यांचा संयम आता सुटत चालल्याचे दिसत असून रविवारी धुळे येथे ४, तर जळगावात एका बसवर दगडफेक झाली. या दगडफेकीत प्रतीक्षा यादीतील नियुक्त चालक कामाच्या पहिल्याच दिवशी जखमी झाला.

एसटी कर्मचाऱ्यांनी ‘चलो मुंबई’ची हाक दिल्यानंतर राज्यातील अनेक आगारांतून कर्मचारी आपल्या कुटुंबकबिल्यासह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससमोरील आझाद मैदानात धडकले आहेत. या संपकरी कर्मचाऱ्यांची संख्या १० हजारांच्या आसपास असून जमावाचे नियंत्रण करताना पोलिस यंत्रणांची तारांबळ उडत आहे. दरम्यान, राज्यभरात सोमवारी एसटी आंदोलनाची तीव्रता आणखी वाढवण्यात येणार असून आंदोलनाच्या १५ व्या दिवशी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरासमोर उग्र आंदोलन करण्याची घोषणा आझाद मैदानावर उपस्थित रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

धुळ्यात प्रतीक्षा यादीतील ५० नियुक्त

राज्यातील २५० आगारांतील प्रत्येकी १०० ते १५० कर्मचारी मुंबईत आले आहेत. मैदानात कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी उसळली आहे. पोलिसांच्या सूचनांचे पालन करत कर्मचाऱ्यांनी मैदानातच दिवसभर घोषणाबाजी सुरू आहे. मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांवर म्हणजे टोलनाक्यांवर बंदोबस्त लावण्यात आला असून गाड्यांनी भरून येणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना थांबवण्यात येत आहे.

टीईटीला मुकले शेकडो उमेदवार
  • जिल्हा पहिले सत्र दुसरे सत्र
  • औरंगाबाद १७३३ १२१५
  • नाशिक २१२८ १६५२
  • सोलापूर १४१० ११६७
  • जळगाव ८४० ५९६

राज्यातील ४९ मार्गावर रविवारी अवघ्या १६७ बस धावल्या. त्यातून ४ हजार ६१९ प्रवाशांनी प्रवास केला. त्यामध्ये ६१ बस शिवनेरी, ७३ शिवशाही, तर केवळ ३३ साध्या लाल बस होत्या. रविवारी ४ हजार १४४ एसटीचे कर्मचारी कामावर हजर होते. रविवारी सुटीचा दिवस असल्याने हजार कर्मचाऱ्यांची संख्या रोडावल्याचा दावा एसटी महामंडळाने केला.

निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात, ‘एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी घोषित करणार’ असे म्हटले होते. आता राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकार असताना हे वचन पूर्ण होणार नसेल तर त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा का दाखल करू नये, असा संतप्त सवाल आझाद मैदानातील एसटी कामगार करत आहेत.

एसटी हा संप मोडीत काढण्यासाठी धुळे येथे प्रतीक्षा यादीतील ५० कर्मचाऱ्यांना नियुक्ती देऊन रविवारी जळगाव आणि धुळे आगारातून पोलिस बंदोबस्तात ११ बसेस सोडण्यात आल्या या वेळी आंदोलकांनी बसचालकांना गांधीगिरी करीत फुलांचे हार दिले तसेच पेढेही भरवले.त्यानंतर चार बसवर अज्ञातांनी दगडफेक करून काचा फोडल्या. नियुक्तीच्या पहिल्याच दिवशी एक चालक जखमी झाला, तर जळगावात विदगावला जाणाऱ्या बसवर दुपारी दगडफेक करण्यात आली.

Previous article@indiannavy | स्वदेशी बनावटीची युद्धनौका आयएनएस विशाखापट्टणम आज होणार नौदलात दाखल
Next article#Maharashtra । वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या वनरक्षक स्वाती ढुमणे यांच्या कुटुंबाला 15 लाखांची मदत
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).