Home Maharashtra यंदा नागपूरऐवजी मुंबईत । विधिमंडळ हिवाळी अधिवेशन लांबणीवर, डिसेंबरअखेर अथवा जानेवारीत होणार

यंदा नागपूरऐवजी मुंबईत । विधिमंडळ हिवाळी अधिवेशन लांबणीवर, डिसेंबरअखेर अथवा जानेवारीत होणार

477

मुंबई / नागपूर ब्युरो : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचे सावट, विधान परिषद निवडणूक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर झालेली शस्त्रक्रिया यांमुळे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन लांबणीवर गेले आहे. अधिवेशन येत्या डिसेंबरअखेरीस अथवा जानेवारीत होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, हिवाळी अधिवेशन प्रथा-परंपरेप्रमाणे नागपूरला होत असते, परंतु यंदा कोरोना, विधान परिषद निवडणुकीमुळे मंुबईतच होण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे अधिवेशन नागपूरलाच व्हावे यासाठी काँग्रेस आणि भाजपचे नेते आग्रही आहेत.

जुलैमध्ये विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची सांगता होताना हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबर २०२१ रोजी नागपूर येथे होईल, असे घोषित करण्यात आले होते. मात्र, नियोजित अधिवेशनाला २५ दिवसांचा कालावधी शिल्लक असताना अद्याप मंत्रालय पातळीवर अधिवेशनाच्या तयारीची हालचाल नाही. अधिवेशनाच्या महिनाभर आधी कामकाज सल्लागार समितीची बैठक होते. अधिवेशनाला जेमतेम २२ दिवस शिल्लक असताना सल्लागार समितीच्या बैठकीचा पत्ता नाही. मुख्यमंत्री मंगळवारी (ता.१६) कामकाजाला प्रारंभ करण्याची शक्यता होती. मात्र मुख्यमंत्र्यांच्या डिस्चार्जविषयी मुख्यमंत्री कार्यालयास सायंकाळपर्यंत अधिकृत माहिती मिळालेली नव्हती.

अभिभाषणाचा पेच

राज्यघटनेच्या कलम १७४ नुसार विधिमंडळाच्या दोन अधिवेशनांत सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी असता कामा नये. तसेच वर्षाच्या प्रारंभी होणाऱ्या अधिवेशनात राज्यपालांचे अभिभाषण होते. हिवाळी अधिवेशन जानेवारीत झाले तर अभिभाषण घ्यावे लागेल. -डॉ. अनंत कळसे, निवृत्त प्रधान सचिव, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय.

काँग्रेस-भाजपला हवे नागपूर

राष्ट्रवादी व शिवसेना यांचा सूर अधिवेशन मुंबईत घेण्याचा आहे. मात्र काँग्रेस आणि भाजपला अधिवेशन नागपूरला हवे आहे. त्यामुळे काँग्रेस-भाजप हा मुद्दा लावून धरतील. मात्र मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीचे कारण पुढे केल्यास या दोन्ही पक्षांना माघार घ्यावी लागेल आणि अधिवेशन मुंबईत होईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Previous articleअमरावतीत 14 हजार जणांवर गुन्हे; भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडे यांना अटक व जामिनावर सुटका
Next article#Health । सुविधा असलेल्या रुग्णालयांत सूर्यास्तानंतरही पोस्टमॅार्टेम शक्य, रात्रीच्या पोस्टमॅार्टेमचे व्हिडिओ रेकॉर्डिंग
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).