पुणे ब्युरो : महाराष्ट्रातील शाळा सुरु करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. आता 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरु होतील अशी माहिती आहे. दुसरीकडे महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील महाविद्यालयं कधी सुरु होणार यासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. पुण्यातील कार्यक्रमानंतर बोलताना उदय सामंत यांनी महाविद्यालय सुरु करण्याची वेळ आली आहे. राज्यातील महाविद्यालय दिवाळीनंतर सुरु करण्याचा विचार असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार
राज्यातील महाविद्यालयं सुरु करण्यासंदर्भात सगळ्या विद्यापीठांच्या कुलगुरूंकडून अहवाल मागवला आहे. महाविद्यालय कधी सुरु करायची याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. महाविद्यालय सुरु करण्याची वेळ आलेली आहे. दिवाळीनंतर महाविद्यालय सुरू करण्याचा विचार असल्याचं उदय सामंत महणाले आहेत.
शाळा 4 ऑक्टोबरला सुरु होणार
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. आता, 4 ऑक्टोबरपासून कोरोना नियमांचं पालन करुन शाळा सुरु होतील. कोरोनाची स्थिती सामान्य झाल्यानं राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे.
राज्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात ऑगस्ट महिन्यात एकदा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी तो निर्णय स्थगित करण्यात आला होता. मुख्यमंत्री यांनी कोरोनाचे नियमांचं पालन करुन शाळा सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. गेल्या वर्षीपासून शाळा बंद होत्या. कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्यानं शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बहुतांश ठिकाणी लसीकरण झालं आहे. शिक्षक आणि शालेय कर्मचारी यांचं लसीकरण झालेलं आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.