Home Health Nagpur | आता प्रत्येक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला संस्थात्मक विलगीकरण बंधनकारक

Nagpur | आता प्रत्येक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला संस्थात्मक विलगीकरण बंधनकारक

मनपा आयुक्तांचे आदेश : ‘डेल्टा प्लस’चा धोका टाळण्यासाठी निर्णय

नागपूर ब्यूरो: नागपुरात डेल्टा प्लसचे संशयित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता त्याच्या प्रसारावर प्रतिबंध घालण्यासाठी यापुढे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला संस्थात्मक विलगीकरणात जावे लागेल अथवा रुग्णालयात दाखल व्हावे लागेल. या संदर्भात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आदेश जारी केले आहेत. सर्व झोन आयुक्तांना यासंदर्भात सूचना जारी केल्या असून संबंधित झोनमधील पॉझिटिव्ह आलेला रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात अथवा रुग्णालयात दाखल झाला अथवा नाही याबाबत त्यांना बारकाईने लक्ष ठेवायचे आहे.

कोरोनाची रुग्णसंख्या सध्या आटोक्यात असली तरी ‘डेल्टा प्लस’चा धोका कायम आहे. पॉझिटिव्ह आल्यानंतर संबंधित रुग्ण डेल्टा प्लसचा रुग्ण असू शकतो, ही शक्यता लक्षात घेता त्याच्यापासून विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनीही सतर्क राहून यापुढे ते पॉझिटिव्ह आल्यास स्वतःच याबाबत खबरदारी घ्यायची आहे. आपल्यामुळे संसर्ग होऊ नये, याची काळजी घ्यायची आहे. मनपा आयुक्तांच्या या आदेशानुसार आता कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर गृह विलगीकरणात राहता येणार नाही. तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने संस्थात्मक विलगीकरणात आणि गरज भासल्यास रुग्णालयात दाखल व्हायचे आहे.

मनपाचे संस्थात्मक विलगीकरण केन्द्र आमदार निवास येथे आहे. तसेच कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालय (गांधीनगर), पाचपावली सुतिकागृह रुग्णालय किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल कॉलेज), इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) मध्ये उपचारासाठी भरती होऊ शकतात. कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण खाजगी रुग्णालयामध्ये सुध्दा दाखल होऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here