Home Health Nagpur | महापौर नेत्र ज्योती योजनेचा लाभ घ्या : महापौर दयाशंकर तिवारी

Nagpur | महापौर नेत्र ज्योती योजनेचा लाभ घ्या : महापौर दयाशंकर तिवारी

मनपा-महात्मे नेत्रपेढीतर्फे होणार मोतीबिंदू शस्त्रक्रिया : पोद्दरेश्वर मंदिरात शिबीर

नागपूर ब्यूरो: नागपूर महानगरपालिका आणि महात्मे नेत्रपेढीच्या संयुक्त विद्यमाने महापौर नेत्र ज्योती योजना आणि दृष्टी सुधार योजना सुरू करण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले. महापौर नेत्र ज्योती योजनेच्या शुभारंभ निमित्ताने श्री पोद्दारेश्वर राम मंदिर ट्रस्टच्या, मनपा, महात्मे नेत्रपेढी आणि जिल्हा अंधत्व नियंत्रण समितीच्या संयुक्त विद्यमाने पोद्दारेश्वर राम मंदिर येथे रविवारी (ता. १८) मोफत नेत्र तपासणी तथा मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. मंचावर दैनिक भास्करचे संजय देशमुख, पोद्दारेश्वर मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, महापौर पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आपण काही संकल्प केले होते. आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील नागरिकांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणे, हा त्यातील एक संकल्प होता. अनेकजणांच्या शस्त्रक्रिया पैश्याभावी होत नाही. त्यामुळे दृष्टी जाण्याची शक्यता असते. आता मनपा आणि महात्मे नेत्रपेढी विविध ठिकाणी शिबिरे घेऊन गरजवंतांवर शस्त्रक्रिया करणार आहे. यासोबतच लहानपणापासून दृष्टिदोष असणाऱ्या, तिरपे बघणाऱ्या व्यक्तीवरही महापौर दृष्टी सुधार योजने अंतर्गत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. कर्णबधीर व्यक्तींवरही एका योजनेअंतर्गत शास्त्रक्रिया करण्यात येणार आहे. एका शस्त्रक्रियेसाठी सुमारे सात लाखांचा खर्च असून वर्षातून पाच कर्णबधीरांना याचा लाभ मिळणार आहे. या सर्व नागरिकहिताच्या योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापौरांनी यावेळी केले.

शिबिरात परिसरातील अनेक नागरिक सहभागी झाले होते. कोरोना नियमांचे पालन करीत आयोजित या शिबिरात उपस्थित नागरिकांची नेत्रतपासणी करण्यात आली. शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या नागरिकांवर पुढील उपचार आणि शस्त्रक्रिया महात्मे नेत्र रुग्णालयात करण्यात येणार आहे. शिबिरामधे ४७८ नागरिकांची चाचणी करण्यात आली. यातील १५० रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येईल आणि मंदिरातर्फे १३५ लोकांना चश्मे दिले जातील. शिबिरात मनपाच्या आरोग्य विभागाचे अधिकारी, महात्मे नेत्र रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर डॉ. अनु कुमारी, डॉ. अरविंद डोंगरवार, आदर्श भैसारे, पुष्पराज कुशवाह, करिश्मा गिरडकर, महादेव बावणे यांच्यासह पोद्दारेश्वर राम मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी सहभागी झाले होते.