Home Nagpur #Nagpur | स्टेट हॅण्डलूम एक्स्पो ‘हथकरघा-२५’ चे थाटात उद्घाटन, स्वदेशी वस्त्रांच्या प्रोत्साहनाचे...

#Nagpur | स्टेट हॅण्डलूम एक्स्पो ‘हथकरघा-२५’ चे थाटात उद्घाटन, स्वदेशी वस्त्रांच्या प्रोत्साहनाचे केंद्र बनले नागपूर

117

राज्याचे वस्त्रोद्योग आयुक्त संजय दैने यांच्या हस्ते उद्घाटन, देशभरातील विणकरांच्या साड्या व ड्रेस मटेरियल्स ठरले आकर्षण

 

नागपूर ब्यूरो : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर स्वदेशी वस्त्रांच्या खरेदीला चालना देण्यासाठी आयोजित स्टेट हॅण्डलूम एक्स्पो ‘हथकरघा-२०२५’ चे आज नागपूरात मोठ्या उत्साहात उद्घाटन झाले. धरमपेठ येथील कुसुमताई वानखेडे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे वस्त्रोद्योग आयुक्त मा. संजय दैने (भा.प्र.से.) यांच्या हस्ते करण्यात आले. नवी दिल्ली येथील हातमाग विकास आयुक्तांच्या सौजन्याने आणि महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ, उमरेड रोड, नागपूर यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

उद्घाटनप्रसंगी सहआयुक्त (प्रशासन) सीमा पांडे, सहआयुक्त (तांत्रिक) गणेश वंडकर, सहाय्यक आयुक्त निशा काकडे, प्रादेशिक उपायुक्त सुदाम काटे, विणकर सेवा केंद्राचे उपसंचालक संदीप ठुबरीकर, सहायक संचालक महादेव पौनिकर, एनएचडीसीचे सहाय्यक व्यवस्थापक उपेंद्र बहिरे, हातमाग महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक गंगाधर गजभिये आणि स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या प्राचार्या कृपा सावलानी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत गंगाधर गजभिये यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ज्ञानदेव बाभूळकर यांनी केले. कार्यक्रमात अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हातमाग वस्त्रांना जागतिक मागणी : आयुक्त संजय दैने
उद्घाटनप्रसंगी बोलताना आयुक्त दैने म्हणाले, “हातमाग वस्त्रांना देशातच नव्हे तर परदेशातही मोठी मागणी आहे. विविध राज्यांतील विणकरांनी विणलेले फॅन्सी व डिझायनर साड्या, ड्रेस मटेरियल या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण आहे. नागपूरकरांनी या प्रदर्शनाला नक्की भेट देऊन स्वदेशी वस्त्रांची खरेदी करून विणकरांना प्रोत्साहन द्यावे.”

देशभरातील विणकरांचा सहभाग
प्रदर्शनात महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड व तेलंगणा या राज्यांतील हातमाग सहकारी संस्थांचा सहभाग आहे. हातमागावर उत्पादित कपड्यांची थेट विक्री या ठिकाणी सुरू असून, ग्राहकांना विविध प्रकारच्या पारंपरिक व आधुनिक डिझाईनच्या वस्त्रे खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे.

प्रदर्शनाचा उद्देश
या प्रदर्शनाचा उद्देश हातमाग उत्पादकांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, ग्रामीण विणकरांनी तयार केलेले कपडे थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवणे, तसेच नविनतम डिझाईन्सची माहिती देणे हा आहे.

📍 प्रदर्शनाचे तपशील

– ठिकाण: कुसुमताई वानखेडे सभागृह, धरमपेठ, नागपूर
– कालावधी: ६ ते १९ ऑक्टोबर
– वेळ: सकाळी ११ ते रात्री ९
– प्रवेश: निःशुल्क