नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
नागपूर, २२ जुलै : भारतीय हवामान खात्याने २२ ते २६ जुलै या कालावधीत नागपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः २३, २४ आणि २६ जुलै रोजी यलो अलर्ट तर २५ जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही ठिकाणी अतीवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना विशेष सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. विजांचा कडकडाट सुरू असताना घरातच राहावे, मोबाईल फोन वापरणे टाळावे, तसेच घरातील इलेक्ट्रिकल उपकरणे बंद ठेवावीत. झाडाखाली थांबू नये आणि शेतात असताना सुरक्षित आसरा घ्यावा, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप खांडे यांनी दिली.
जलपर्यटन स्थळी अतीउत्साही होणे टाळावे. पोहण्याचा प्रयत्न करु नये, जरी जलतरणात प्राविण्य असले तरीही अशा वेळी नदी-नाल्यांत उतरणे धोकादायक ठरू शकते. पुरामुळे वाहत असलेले रस्ते किंवा पूल ओलांडण्याचा कोणताही प्रयत्न करू नये.
प्रशासनाने निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करावे आणि स्वतःबरोबर आपल्या कुटुंबीयांचेही संरक्षण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कोणतीही आपत्कालीन माहिती किंवा मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्ष, नागपूर – दूरध्वनी क्रमांक ०७१२-२५६२६६८ वर संपर्क साधावा.




















