मंत्रिमंडळात सध्या जे काही सुरू आहे, त्यात १० मार्चनंतर मोठे फेरबदल होतील, असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा येथील काँग्रेसच्या मेळाव्यात केले. यामुळे राजकीय पक्षांच्या भुवया उंचावल्या आहेत. या मेळाव्यात विविध पक्षांतील अनेकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नाना पटोले म्हणाले, सध्या राज्य सरकारमध्ये जे काही चालले आहे, त्यात बदल करण्याची वेळ आली आहे. १० मार्चनंतर हे बदल होतील. पाच राज्यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. माझे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी बोलणे झाले आहे. राज्य सरकारमध्ये काँग्रेसचे १२ मंत्री आहेत. या मंत्र्यांच्या माध्यमातून लोकांची कामे करण्यासाठी जनता दरबार भरवले जाणार आहेत. काँग्रेसचे मंत्री लोकांमध्ये राहून लोकांची कामे करतील, असे बदल भविष्यात बघायला मिळतील, असे पटोले यांनी सांगितले.
कोरोनामुळे सरकार आणि पक्षाच्या कामावर अनेक बंधने, नियंत्रणे आली होती. आता रुग्णसंख्या कमी होत असल्याने १० मार्चनंतर काँग्रेसच्या मंत्र्यांचे जनता दरबार होणार आहेत. काँग्रेस पक्षाचे मंत्री जिल्ह्याजिल्ह्यात जाऊन जनता दरबार घेऊन लोकांचे प्रश्न सोडवणार आहेत, असे पटोले यांनी सांगितले.
पाच राज्यांतील विधानसभांचे निकाल दहा मार्चपर्यंत लागणार आहेत. महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्तारही गेले अनेक महिने रखडलेला आहे. त्यामुळे मार्चमध्ये मंत्रिमंडळात खांदेपालट होण्याचा अंदाज आहे.
आघाडीतील मंत्रिमंडळात काँग्रेसचे दहा कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री आहेत. यातील वर्षा गायकवाड, अस्लम शेख आणि नितीन राऊत यांच्या विभागाची बदलाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मार्चनंतर काँग्रेसच्या पक्षांतर्गत निवडणुका तसेच अध्यक्षाची निवड होणार आहे. या गोंधळात काँग्रेसला राज्यातील मंत्रिमंडळात खांदेपालट करण्यास कितपत अवधी मिळेल याविषयी शंका आहे. मात्र मंत्रिमंडळ विस्तार व्हावा, अशी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची तीव्र इच्छा आहे. कारण त्यांना ऊर्जामंत्रिपद हवे आहे.