गडचिरोली ब्युरो : चंद्रपुरातील दारूबंदी उठविण्याच्या निर्णयाने नुकसानच आहे याचा निषेध व्हायला हवा अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी दिली आहे. हा निर्णय अत्यंत अयोग्य आणि दुर्दैवी असल्याची टीका करत अंमलबजावणी होत नसल्याने दारू बंदी उठवली हा अजब तर्क राज्य शासनाच्या सर्व योजनांसाठी लागू होणार का? असा थेट सवाल देखील यावेळी त्यांनी विचारला.
कोरोना नियंत्रणाचे तीन-तेरा झाले, मग नियंत्रण थांबवायचे का? असा उद्विग्न सवालही त्यांनी विचारला. राज्य कल्याणकारी योजना राबवण्यासाठी दारूचा महसूल हवा हा कुतर्क, 1000 कोटी वैध तर 500 कोटी अवैध दारू महसूल कुणाच्या खिशात जाणार याचा शोध घेण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मांडलं.
सदर निर्णय़ामुळे सहा लाख कुटुंब प्रभावित तर 80 हजार पुरुष व्यसनी होणार असल्याची भीती व्यक्त करत, महिलासंदर्भातील गुन्हे आकड्यांमध्ये मोठी वाढ तर आदिवासी जनतेवर मोठा परिणाम होण्याची चिंताही त्यांनी व्यक्त केली.
6 वर्षांपूर्वी ज्या समितीने दारुबंदी करण्याचा अहवाल दिला त्याचे डॉ. अभय बंग हे सदस्य होते. हा निर्णय अत्यंत अयोग्य आणि दुर्दैवी असल्याची टीका त्यांनी केली असून अंमलबजावणी होत नसल्याने दारू बंदी उठवली हा अजब तर्क राज्य शासनाच्या सर्व योजनांसाठी लागू होणार का? असा सवाल त्यांनी विचारला.
समितीच्या अहवालानुसार दारुबंदी उठवली
अवैध दारू विक्री व गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. यावर बोलताना मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, जिल्ह्यात अवैध दारु मोठ्या प्रमाणावर वाढली होती. लहान बालके, महिला अवैध दारुच्या धंद्यात उतरले होते. तरुण वर्ग अमली पदार्थाच्या आहारी जात होते. त्यामुळं क्राईम वाढले होते. दारू बंदी होताच अवैध दारू सुरू झाली होती. मागील सरकार ने दारू बंदी केली मात्र अंमलबजावणी करू शकले नाही, आंध्र, तेलंगणा आणि अवतीभवतीच्या जिल्ह्यातून दारू येत होती. समितीच्या अहवालानुसार दारू बंदी उठविली आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.