Home Maharashtra Maharashtra । दिलीप वळसे पाटील राज्याचे नवे गृहमंत्री

Maharashtra । दिलीप वळसे पाटील राज्याचे नवे गृहमंत्री

अनिल देशमुख यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर

मुंबई ब्युरो : शरद पवार यांचे विश्वासू दिलीप वळसे पाटील अखेरीस गृहमंत्री झाले. गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करावा असे विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिले आहे. गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा असेही या पत्रात म्हटले आहे. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ व राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्याबाबत देखील पत्रात विनंती करण्यात आली आहे.

शरद पवार यांचे सचिव ते गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

शरद पवार यांचे खासगी सचिव ते राज्याचे नवीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा मोठा प्रवास आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले मंत्रिमंडळ स्थापना होत असताना गृहमंत्रीपदी शरद पवार यांची पहिली पसंती ही दिलीप वळसे पाटील हीच होती. त्यावेळी वळसे पाटील यांच्या तब्येतीच्या कारणांमुळे त्यांनी ही जबाबदारी नाकारली होती. त्यामुळे ही जबाबदारी विदर्भातील अनिल देशमुख यांच्याकडे देण्यात आली होती. दिलीप वळसे पाटील म्हणजे मृदुभाषी, कायद्यावर एकदम पकड आणि शरद पवार यांचा विश्वास ही सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे. दिलीप वळसे पाटील हे सात वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

लोडशेडिंग मुक्त महाराष्ट्र याची सुरुवात

ऊर्जा मंत्री म्हणून दिलीप वळसे पाटील यांनी अनेक वर्षे कार्यभार सांभाळला होता.लोडशेडिंग मुक्त महाराष्ट्र याची सुरुवात त्यांच्या काळात झाली. अर्थमंत्री म्हणून एक वर्ष त्यांनी कारभार स्वीकारला. याबरोबरच वैद्यकीय शिक्षण उच्च व तंत्रज्ञान विभागाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. दिलीप वळसे पाटील यांनी विधान सभेचे पाच वर्षे म्हणून अध्यक्षपद भूषवले आहे. त्यामुळे संसदीय कामकाजाचा त्यांचा अनुभव दांडगा आहे. सर्व पक्षातील नेत्यांबरोबर त्यांचे चांगले संबंध आहेत. अतिशय अडचणीच्या काळात ही शांतपणे काम करणे, प्रसार माध्यमांसमोर बाजू संयमाने मांडणे हे ही त्यांची वैशिष्ट आहेत.

महत्वाची जबाबदारी

गृहखात्यासारख्या विभागात विशेषतः सचिन वाझे आणि माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या आरोपनंतर गृहखाते आणि पोलीस विभागात असुरक्षिततेच वातावरण आहे. प्रशासनाला विशेषतः पोलीस अधिकाऱ्यांमध्ये सरकार प्रति विश्वास निर्माण करून गृह विभागावर पकड जमावण्याचे आव्हान दिलीप वळसे पाटील यांच्या समोर आहे.अतिशय अडचणीच्या काळात वळसे पाटील यांना महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. ही जबाबदारी ते कशी निभावतात याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here