मुंबई ब्युरो : भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये रात्री 12 वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली आहे. या मॉलमध्ये सनराईज हे कोव्हिड रुग्णालय आहे. काल रात्री लागलेल्या या आगीत कोव्हिड रुग्णालयातील 11 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या आगीत मृताच्या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आगीच्या या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 20 पेक्षा जास्त गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. महापौर किशोरी पेडणेकर, अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश ककाणी हे देखील घटनास्थळी दाखल झाले. ही आग प्रथमतः पहिल्या मजल्यावर लागली आणि ती वाढत जाऊन वरच्या रुग्णालयापर्यंत पोहचली. रुग्णालयात आग लागली तेव्हा 76 रुग्ण होते. त्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन शिड्यांच्या मदतीने खाली काढले. मात्र नंतर ही आग प्रचंड वाढली असून अजून ही त्यात काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या आगीमध्ये 11 जणांचा मृत्यू झाल्याचे उपायुक्त प्रशांत कदम यांनी सांगितले. बचाव कार्य मोठ्या प्रमाणात सुरु आहे. बचाव कार्य संपल्यानंतर ही आग कशी लागली याची चौकशी करण्यात येणार असल्याचं महापौरांनी आणि उपायुक्तांनी स्पष्ट केलं.
या मॉलच्या टॉप फ्लोअरवर असलेले हे हॉस्पिटल गेल्या वर्षी कोरोनाच्या बिकट परिस्थितीत निर्माण करण्यात आले होतं असं सनराईज हॉस्पिटलच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. कोरोनाच्या काळात या हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेक कोरोना रुग्णांचे प्राण वाचवण्यात आले आहेत, आगीचे आणि इतर सर्व नियमांचे पालन करून हे हॉस्पिटल सुरु असून आताच्या आगीमध्ये स्टाफने बचावकार्यात मोलाचं योगदान दिलं असल्याचंही हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.
ड्रीम मॉलमधील सनराईज हॉस्पिटलला ओसी नव्हती
ड्रीम मॉलमधील सनराईज हॉस्पिटलला ओसी नव्हती अशी माहिती हाती आली आहे. 6 मे 2020 रोजी सनराईज हॉस्पिटलला कोविड रुग्णांच्या उपचारासाठी कोविड हॉस्पिटल म्हणून तात्पुरती परवानगी देण्यात आली होती. 31 मार्च 2021 पर्यंत तात्पुरत्या परवानगीचा कालावधी संपणार होता. सनराईज हॉस्पिटल प्रशासनाची आग प्रकरणी चौकशी केली जाणार असल्याचं महापालिका आयुक्तांनी सांगितलं आहे. कुणाचा निष्काळजीपणा भोवला याचीही चौकशी होणार आहे. मार्च महिन्यात या हॉस्पिटलमधील अनियमितता आणि इतर त्रुटींकरता कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. या रुग्णालयात 78 पेशंट होते. त्यांपैकी 6 पेशंटचा मृत्यू झाला आहे तर 72 रुग्णांना आपण इतरत्र हलवलंय, अशी माहितीही आयुक्तांनी दिली आहे.
मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर
भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये लागलेल्या आगीमुळे सनराईज रुग्णालयातील रुग्णांच्या झालेल्या मृत्यूंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन त्यांनी पाहणीही केली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली त्याचप्रमाणे अशा रीतीने राज्यभरात ज्या मॉल्स किंवा इतर वास्तूंमध्ये कोविड रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालये सुरु आहेत त्या ठिकाणच्या अग्नीसुरक्षेची तपासणी तात्काळ करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. ही घटना दुर्दैवी असल्याचे सांगून ते म्हणाले की, यासंदर्भात ज्यांनी दुर्लक्ष व दिरंगाई केली अशा सर्व जबाबदार लोकांवर कठोर कारवाई करण्यात येईल.