Home कोरोना Nagpur । गरज वाटेल त्या ठिकाणी सक्ती करा, संसर्ग वाढता कामा नये...

Nagpur । गरज वाटेल त्या ठिकाणी सक्ती करा, संसर्ग वाढता कामा नये -रवींद्र ठाकरे

597
नागपूर ब्युरो : कोरोना चाचण्यांची संख्या वाढविणे, गर्दीवर नियंत्रण ठेवणे, लसीकरण पूर्ण क्षमतेने करणे आणि सोबतच कोणत्याच परिस्थितीत जिल्ह्यात बाधितांची संख्या वाढणार नाही याची काळजी घेणे या सर्व आघाड्यांवर एकाच वेळी प्रशासनाला काम करायचे असून यासाठी सर्व यंत्रणांनी परस्पर सामंजस्याने व सहकार्याने पूर्ण गतीने कार्यरत व्हावे, असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी येथे दिले.

जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याभरात रुग्णांमध्ये मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत ही वाढ ठळकपणे पुढे येत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोना आजाराचा संसर्ग होणार नाही, यासाठी काही निर्बंध लावणे अनिवार्य होणार आहे. यासंदर्भात आज आरोग्य, महसूल, पोलीस व अन्य सर्व यंत्रणांच्या विभाग प्रमुखासोबत जिल्हाधिकाऱ्यांनी बचत भवन येथे आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, जिल्हा आरोग्य अधिकारी दीपक सेलोकर, जिल्हा शल्य चिकित्सक देवेंद्र पातुरकर यांच्यासह आरोग्य यंत्रणेतील अधिकारी, महसूल, तसेच पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर आळा घालण्यासाठी प्रशासनासह नागरिकांनीही खबरदारी घ्यावी. जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. ज्या खासगी रुग्णालयात सिटीस्कॅन केले जाते, तेथे रुग्णांमध्ये कोविडची लक्षणे आढळल्यास त्याबाबत नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास किंवा शासकीय वैद्यकीय रुग्णालय- नियंत्रण कक्ष येथे त्या रुग्णाची माहिती त्वरित द्यावी. तसेच संबंधित रुग्णाला कोरोना चाचणी करण्यास सूचना द्याव्यात. यात दिरंगाई करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, अशा सूचना ठाकरे यांनी यावेळी दिल्या.

समाजातील नियमित संपर्कात येणारे व्यावसायिक जसे दुधवाला, भाजीवाला, वृत्तपत्र विक्रेते, हातठेलेधारक, दुकानदार, ऑटोचालक यांची रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करावी. सार्वजनिक ठिकाणे, स्वच्छतागृहे, बसेस, रेल्वे येथे स्वच्छताविषयक सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे. या ठिकाणी नियमित निर्जंतुकीकरणासाठी फवारणी कार्यक्रम राबविण्यात यावा. लग्न समारंभात पन्नासपेक्षा जास्त व्यक्तींच्या उपस्थितीवर बंदी आहे. लग्न समारंभात उपस्थित सर्व व्यक्तींनी मास्क परिधान करणे, सॅनिटाईजरचा वापर करणे, सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे. याबाबत नियमांचे पालन होत नसल्यास संबंधित हॉल, लॉन मालकास जबाबदार ठरवून आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत त्यांच्याविरोधात आवश्यक कारवाई करण्यात येईल. तसेच आवश्यकतेनुसार कोरोना चाचणी केंद्रे वाढवावीत, असेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

कोरोनाचा वाढता प्रसार थांबविण्यासाठी नियमांची काटेकोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. यासाठी काढण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोर पालन न करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंग व सॅनिटाईजचा वापर करणे आवश्यक आहे. रेस्टॉरंट, हॉटेल, खाद्यगृह हे पन्नास टक्के क्षमतेने सुरु करण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. त्यासंबंधी घालून दिलेल्या अटी व शर्तीचे पालन कटाक्षाने करण्यात यावे. खाजगी डॉक्टरांकडे कोविड सदृश्य रुग्ण आढळून आल्यास त्याबाबत नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास किंवा शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या नियंत्रण कक्षाला माहिती द्यावी. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये प्रतिकंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी सर्व स्तरावर करण्यात यावी, असे आवाहन कुंभेजकर यांनी यावेळी केले.

Previous articleअमरावती, यवतमाळ, अकोला जिल्ह्यांत कोरोना प्रादुर्भाव असलेल्या भागात तातडीने कंटेनमेंट झोन जाहीर करा
Next articleIPL Auction | जानिए कौन हैं वो खिलाड़ी जिनपर लगी सबसे ऊंची बोली
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).