Home Maharashtra बाळासाहेब थोरातांनी उभे केलेले सहकाराचे मॉडेल सर्व राज्यांसाठी उपयुक्तः मुख्यमंत्री भूपेश बघेल

बाळासाहेब थोरातांनी उभे केलेले सहकाराचे मॉडेल सर्व राज्यांसाठी उपयुक्तः मुख्यमंत्री भूपेश बघेल

667

संगमनेर ब्यूरो : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याने शेतीमालाचे भाव वाढून शेतकर्‍यांना फायदा न होता भांडवलदार व व्यापारी यांना फायदा झाला. कृषीप्रधान भारतात केंद्र सरकार शेतकर्‍यांचे हाल करत असून हे दुर्देवी आहे. महाराष्ट्रात सहकारात चळवळीतून ग्रामीण विकास झाला असून सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी उभे केलेले सहकाराचे मॉडेल हे छत्तीसगड सह देशातील सर्व राज्यांसाठी उपयुक्त ठरेल असे गौरवोद्गार छत्तीसगडचे मुख्यमंत्री नामदार भूपेश बघेल यांनी काढले.

मालपाणी लॉन्स येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील हे होते तर व्यासपीठावर राज्याचे महसूल मंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, आ. लहू कानडे, आ.डॉ. किरण लहामटे, माजी आमदार नरेंद्र घुले, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, महानंदचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख , बाजीराव पा.खेमनर, काँग्रेस सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, राजेश मालपाणी, सचिन गुजर, करण ससाणे, डॉ. राजीव शिंदे, कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ, लक्ष्मणराव कुटे, विजय अण्णा बोराडे , उत्कर्षाताई रूपवते , प्राचार्य केशवराव जाधव, प्रा. बाबा खरात, इंद्रजितभाऊ थोरात, आदी उपस्थित होते.

याप्रसंगी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्काराने ज्येष्ठ संपादक संजय आवटे यांना तर हरितक्रांतीचे प्रणेते डॉ.आण्णासाहेब शिंदे पुरस्काराने ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजित डिसले यांना आणि सहकारातील कार्यकर्ता या पुरस्काराने अ‍ॅड माधवराव कानवडे यांना गौरवण्यात आले. 1 लाख रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

याप्रसंगी बोलताना नामदार बघेल म्हणाले की, महाराष्ट्र ही स्वतंत्रता आंदोलनाची भूमी असून या राज्याने देशाला विचार दिले आहेत. सहकार चळवळ ही येथील विकासाचा गाभा आहे. संगमनेरचा सहकाराचे मॉडेल सर्वांसाठी उपयुक्त आहे. हा प्रयोग छत्तीसगडमध्ये आपण राबवणार असून देशाला ही मार्गदर्शक ठरणार आहे. देशात सध्या शेतकरी व कामगार विरोधी धोरण राबवले जात असून दिल्लीच्या वेशीवर चाळीस दिवस शेतकरी आंदोलन करतात. मात्र केंद्र सरकार त्यांच्याकडे परस्पर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे. खरे तर केंद्र सरकारने छत्तीसगड सरकारचे मॉडेल राबवले पाहिजे. खासदार राहुल गांधी यांनी दिलेली न्याय योजना अत्यंत प्रभावीपणे राबवली गेल्याने या राज्यात विकासाला गती मिळाली असल्याचेही ते म्हणाले. राज्यात बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष दमदार वाटचाल करत असून त्यांच्या नेतृत्वामुळे संगमनेर व परिसरासाला वैभवाचे दिवस आल्याचे बघेल म्हणाले.

यावेळी बोलताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचा समृद्ध वारसा नामदार बाळासाहेब थोरात हे सांभाळत आहेत. मला कधीही बाळासाहेब थोरात यांचा फोन आला की पहिले निळवंडेचे काम आहे असेच वाटते. भाऊसाहेब थोरात , ना.बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरण व कालव्यांसाठी ध्यास घेतला असून येत्या 2023 – 24 पर्यंत कालव्यांची कामे पूर्ण करून पाणी देणारच आहोत. पाण्याचे दुर्भिक्ष्य कमी करणे हाच महाविकास आघाडी सरकारचा मुख्य उद्देश असून यासाठी वळण बंधार्‍यांना ही स्वतंत्र विभाग सुरू केला आहे. त्या कामांना गती दिली आहे. बाळासाहेब थोरात सर्वांना बरोबर घेऊन चालणारे नेते आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागाचा विकास झाला असून सहकार बरोबर शैक्षणिक व प्रगतीमध्ये हा संगमनेर तालुका अग्रेसर ठरला आहे. राज्यातही नामदार बाळासाहेब थोरात यांचे अत्यंत महत्त्वाची भूमिका असून त्यांच्या सहकार्यामुळेच महाविकास आघाडी सरकार आले आहे. शेततळ्यातून झालेली जलक्रांती किंवा कोणत्याही योजना कशा प्रभावीपणे राबवावी हे नामदार बाळासाहेब थोरात यांच्याकडून शिकावे असेही ते म्हणाले.

महसूल मंत्री नामदार थोरात म्हणाले की, भूपेश बघेल यांनी भाजपला धडा शिकवत मोठा दैदिप्यमान विजय मिळवून छत्तीसगडमध्ये काँग्रेस सत्तेवर आणले. त्यांच्या पाठोपाठ महाराष्ट्रात राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. यामध्ये जयंत पाटील यांचाही मोठा वाटा राहिला खरे तर महाराष्ट्रात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, डॉ. अण्णासाहेब शिंदे ,तीर्थरुप भाऊसाहेब थोरात यांनी घातलेल्या पायामुळे व केलेल्या कामामुळे आज आपण आनंदी जीवन जगत आहोत. हाच वारसा आपल्याला पुढे चालवायचा आहे. अडचणीच्या काळातही संजय आवटे यांनी पुरोगामी विचार जोपासला असून रणजितसिंह डिसले यांनी प्राथमिक शिक्षकांना ग्लोबल चेहरा मिळवून दिला आहे. तर माधवराव कानवडे सहकारातील महत्त्वाचे कार्यकर्ते असून त्यांच्या कार्यकाळात झालेल्या नवा कारखाना निर्मितीचा निर्णय अत्यंत ऐतिहासिक ठरला आहे. देशात शेतकर्‍यांचे राज्य पाहिजे मात्र भाजप हे शेतकर्‍यांना वेठीस धरून भांडवलदारांच्या फायद्याचे कायदे करत आहे. याविरोधात प्रत्येकाने आवाज उठवला पाहिजे असे ते म्हणाले.

संजय आवटे म्हणाले की, संगमनेरचा सहकारात शिस्तबद्ध गुणवत्तेचा आहे. येथील नेतृत्वाने ग्रामीण विकासाच्या हे सर्वसामान्यांच्या सामर्थ्याची कहाणी येथे निर्माण झाली आहे. देशात विखारी वातावरण असताना संगमनेरात अमृतवाहिनी आहे तर चंपारण्या चळवळीचा वारसा दंडकारण्य अभियान घेतला आहे.

रणजितसिंह डिसले म्हणाले की, आंतरराष्ट्रीय पातळीवर होणार्‍या सन्मानाबरोबर आपल्या मातीतील होणारा सन्मानही महत्त्वाचा आहे. संगमनेर हे मोठे शैक्षणिक केंद्र असून येथून आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक शिक्षक व विद्यार्थी चमकीला असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

अ‍ॅड. माधवराव कानवडे म्हणाले की, आपण आयुष्यभर भाऊसाहेब थोरात यांचा विचार झाला असून त्यांनी त्यांनी कार्यकर्त्यांना कायम ताकद दिली. पाणीपुरवठा योजनेतून तालुका हिरवा झाला असून सहकारात काम करताना आपण सर्वसामान्यांचा विचार केला. नवीन कारखाना निर्मितीचा निर्णय हा पुढील पन्नास वर्षासाठी धोरणात्मक ठरला असून आपल्या कार्यकाळात यांनी योगदान दिले त्यांचा हा पुरस्कार असल्याचे ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आ. डॉ. सुधीर तांबे यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर थोरात कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी आभार मानले.

नामदार थोरात यांचा फोन म्हणजे निळवंडे चे काम

जयंत पाटील म्हणाले कि, कोणत्याही कामानिमित्त महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा फोन आला की मला पहिले निळवंडे धरणाचे काहीतरी काम असणार आहे. मी इतरांना खात्री करून घेतो आणि मग थोरात साहेबांशी बोलतो. निळवंडे कालवे पूर्ण करून सर्वसामान्य जनतेला पाणी देणे हा त्यांच्या जीवनाचा ध्यास असल्याची नामदार पाटील यांनी यावेळी सांगितले.

Previous articleHinganghat Burning Case | प्राध्यापिका जळीतकांड प्रकरणी आई-वडिलांची साक्ष नोंद
Next articleभाजपचा अपप्रचार हाणून पाडण्याचे काम महाराष्ट्र काँग्रेसचे ‘सोशल मीडिया वॉरियर्स’ करणार
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).