Home BJP #Nagpur | समृद्धीचा वारकरी

#Nagpur | समृद्धीचा वारकरी

426
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेला हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाची ओळख करून देणारा. या निमित्ताने या महामार्गामुळे निर्माण होत असलेल्या रोजगार संधी आणि देवेन्द्रजींच्या नेतृत्वाचा परिचय करून देणारा आ. डॉ. परिणय फुके यांनी लिहिलेला लेख.

आज राष्ट्राला समर्पित होत असलेला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा देशाच्या इतिहासात मैलाचा दगड ठरणार यात शंका नाही. ७०१ किलोमीटर लांबी असलेला नागपूर मुंबई महामार्ग देशात दळणवळण, पर्यटन, माल वाहतूक या क्षेत्रात पथदर्शक असणार आहे. रस्त्यांच्या लांबीच्या बाबतीत भारत अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. जर्मनीतील ऑटोबाहान्स, फ्रान्समधील मोटरवेज आणि अमेरिकेतील हायवेज या दर्जाचे रस्ते आता भारतात निर्माण होत आहेत. अमेरिकेतील अवजड वाहने दररोज ६०० किलोमीटर अंतर पार करतात तर भारतातील अवजड वाहने दररोज फक्त ३०० किलोमीटर अंतर करतात हे उपहासात्मक वाक्य यानंतर तर्कसंगत असणार नाही. देवेंद्र फडणवीस हे नागपूरने महाराष्ट्राला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे असे उद्गार दिनांक ७ ऑक्टोबर २०१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर येथील जाहीर सभेत देवेंद्र फडणवीस यांची बुद्धिमत्ता, अभ्यासूवृत्ती, नेतृत्वक्षमता, दूरदर्शित्व या गुणांची पारख करूनच काढले होते.

देशातील इतर राज्यांना भूगोल आहे आणि महाराष्ट्राला इतिहास आहे. महाराष्ट्राचा इतिहास वारकरी संप्रदायाचा उल्लेख न करता पूर्ण होणे शक्य नाही. विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागलेले वारकरी निसर्ग, शरीरप्रकृती, आजार, दिवसरात्र या कशाचीही पर्वा न करता सतत पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत असतात. देवेंद्र फडणवीस हे खऱ्या अर्थाने विकासाचे वारकरी आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता, कायद्याचा पदवीधर, युवा नगरसेवक, दुसरा तरुण महापौर, तीन वेळा आमदार, महाराष्ट्राचा दुसरा सर्वात युवा मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता, सध्या उपमुख्यमंत्री अशी विविध पदे त्यांनी भूषविली असली तरी विकासाचा हा वारकरी राज्याच्या विकासाचे स्वप्न घेऊन सतत वाटचाल करीत आहे.
२०१५ साली जेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेन्द्रजींनी नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाची संकल्पाना मांडली तेव्हा महाराष्ट्र राज्याची स्थापना होऊन ५५ वर्षे झाली होती. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी तर नागपूर देशाचे मध्यवर्ती स्थान. ही दोन्ही शहरे द्रुतगती मार्गाने जोडून मध्य आणि पूर्व भारत देशाच्या आर्थिक राजधानीला जोडण्याची क्रांतिकारी संकल्पना या निमित्ताने पूर्ण होत आहे. राज्यातील दहा जिल्हे आणि सव्वीस तालुके आणि ३९० गावांमधून जाणारा महामार्ग कृषी, कृषी प्रकिया, उद्योग, निर्माण, वाहतूक, दुरुस्ती, नव उद्योग या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी निर्माण करणारा असेल. महामार्गावर निर्माण होत असलेले कृषी समृद्धी केंद्र हे स्थानिकांना वरदान ठरणार आहेत. नागपूर ते मुंबई हे अंतर ८ तासात पूर्ण करण्यास सक्षम असलेला समृद्धी महामार्ग जगभरातील पर्यटकांना रोमांचक प्रवासाची अनुभूती देणारी पर्वणी ठरणार आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी लावण्यात येणारे वृक्ष राज्याच्या वनक्षेत्रात भर टाकणार आहेत तर महामार्गाच्या बांधणीतून निर्माण झालेल्या जलाशयामुळे कृषी आणि मत्सव्यवसाय यांना संधी निर्माण करणारे ठरणार आहेत.
औषध कितीही गुणकारी असले तरीही जोपर्यंत आजारी व्यक्ती त्याचे सेवन करत नाही तोपर्यंत ते उपयोगाचे नसते. त्याचप्रमाणे समृद्धी महामार्गामुळे निर्माण होणाऱ्या रोजगार आणि स्वयंरोजगार संधी प्राप्त करण्यासाठी युवा पिढीने सज्ज होणे आवश्यक आहे. हॉटेल व्यवस्थापन, अन्न प्रक्रिया, ऑटोमोटिव्ह, बांधकाम, दुरुस्ती, लॉजीस्टीक या क्षेत्रातील कौशल्य विकास प्रशिक्षण घेतलेले उमेदवार नक्कीच रोजगार मिळवू शकतील यात शंका नाही. प्रस्तावित कृषी समृद्धी केंद्रासाठी भूसंचयन पद्धतीने जमीन एकत्रित करण्यात येत आहे यात सहभागी होणारे भूधारक हे भविष्यातील स्थानिक उद्योजक असणार आहेत.
समृद्धी महामार्गाच्या निर्मिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे देऊन राज्यातील शासकीय यंत्रणा जागतिक दर्जाचे महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यास सक्षम आहेत याचा परिचय देवेन्द्रजींनी दिला आहे. २०१५ साली मा. ना. एकनाथजी शिंदे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची जबाबदारी आणि श्री. राधेश्याम मोपलवार यांचेकडे समृद्धी प्रकल्पाची व्यवस्थापकीय संचालकाची जबाबदारी सोपवून देवेन्द्रजींनी आपल्या गुणग्राहकतेचा परिचय दिला आहे. फडणवीस सरकारने राबवलेल्या जलयुक्त शिवार अभियान, मुंबई नेक्स्ट, पोलीस डीजीटलायझेशन, अनाथांना १ टक्के आरक्षण, छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना, प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता अभियान या योजना राज्याला विकासाच्या मार्गावर घेऊन जाणाऱ्या ठरल्या आहेत.
आषाढी आणि कार्तिकीला पंढरीच्या दिशेने अविरत चालणाऱ्या वारकऱ्यांना पावसाचा त्रास होऊ नये म्हणून ५ लाख रेनकोटचे वाटप करण्याचा त्यांचा निर्णय मुख्यमंत्री पदावर असूनही सामान्य नागरिकांवर असलेले लक्ष आणि वारकरी पंथावरील प्रेम दर्शवते. आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगणाऱ्या गंगाधर फडणवीस यांचे पुत्र असलेल्या देवेन्द्रजींनी इंदिरा गांधींच्या नावे असलेल्या शैक्षणिक संस्थेस दाखल होण्यास नकार देऊन आपल्या विचारसरणीची ओळख बालपणीच करून दिली होती. पक्षनिष्ठा आणि विचारधारा सर्वतोपरी मानणाऱ्या या उमद्या नेतृत्वाने नोव्हेंबर २०१९ ते जून २०२२ या काळात विरोधीपक्ष नेतेपद आणि जून २०२२ पासून राज्याचे उपमुख्यमंत्रीपद अगदी सहजतेने स्वीकारले आहे. आपल्या विरोधीपक्ष नेतेपदाच्या काळात देवेन्द्रजी सत्तेत परवडले पण विरोधात नको असे नेहमी म्हटले जायचे. समृद्धी महामार्गाच्या निर्मितीत एकेकाळी त्यांचे सहकारी असलेले मा. ना. एकनाथजी शिंदे आज राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आहेत आणि देवेन्द्रजी त्यांच्या सारथ्याची भूमिका घेऊन राज्याला पुढे घेऊन जात आहेत.
सत्ता असेल किंवा नसेल, पद असेल किंवा नसेल, परंतू विकासाचा हा वारकरी आपली विचारधारा, पक्षानिष्टा आणि विकसित महाराष्ट्राच्या स्वप्नाच्या वाटेवरून कधीच मागे हटणार नाही हे शाश्वत सत्य असणार आहे.
डॉ. परिणय फुके

Previous article#Maha_Metro | लवकरच कामठी आणि सेंट्रल एव्हेन्यू मार्गावर मेट्रो सेवा
Next article#Maha_Metro | प्रधानमंत्री मोदी के हाथों सेन्ट्रल एवेन्यू कामठी मार्ग मेट्रो सेवा का शुभारंभ
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).