Home Nagpur #Nagpur । प्रामाणिक व वस्तुनिष्ठ पत्रकारितेतून राष्ट्रनिर्मिती

#Nagpur । प्रामाणिक व वस्तुनिष्ठ पत्रकारितेतून राष्ट्रनिर्मिती

374
  • नागपूर खंडपीठाचे माहिती आयुक्त राहुल पांडे यांचे प्रतिपादन
  • राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त परिसंवादाचे आयोजन

    नागपूर ब्युरो : पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जातो. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्यलढ्यात माध्यमांचे अनन्यसाधारण योगदान राहिले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आजच्या काळातही प्रामाणिक व वस्तुनिष्ठ पत्रकारिता गरजेची आहे. यातून समाजातील विविध समस्या सोडविण्यास मदत होऊन पत्रकारांना राष्ट्रनिर्मितीत योगदान देता येईल, असे प्रतिपादन नागपूर खंडपीठाचे माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी आज येथे केले.

    माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर प्रेस क्लब व श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज प्रेस क्लब येथे राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त ‘राष्ट्राच्या उभारणीत माध्यमांची भूमिका’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. दै. लोकसत्ता नागपूरचे संपादक देवेंद्र गावंडे, ज्येष्ठ पत्रकार एस.एन.विनोद, माहिती संचालक हेमराज बागुल, प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, श्रमीक पत्रकार संघाचे अध्यक्ष शिरीष बोरकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांच्यासह विविध माध्यमांमधील पत्रकार बांधव यावेळी उपस्थित होते.

    पत्रकारांचे काम हे जागल्यासारखे आहे. त्यांनी समाजातील विविध वाईट प्रवृत्तीवर लक्ष ठेवून आपल्या लेखनीतून प्रहार करण्याची गरज आहे. तरच ख-या अर्थाने स्वातंत्र्य, समता व बंधूता यावर आधारित समाज उभा राहील. पत्रकारांवर समाजाने मोठी जबाबदारी सोपविली आहे. ही जबाबदारी सशक्तपणे पार पाडणे माध्यमांचे काम आहे. माध्यमांनी सशक्त व्हावे, त्यांनी बिनधोकपणे प्रश्न विचारण्याची गरज असल्याचे माहिती आयुक्त श्री. पांडे पुढे म्हणाले.
    घटनेत लोकशाहीच्या चार स्तंभांचा उल्लेख करण्यात आला आहे. यापैकी एक स्तंभ हा पत्रकारिता आहे. माध्यमे ही प्रश्न विचारण्यास सक्षम असायला हवी. माध्यमे सशक्त असतील तरच राष्ट्र उभारणीत योगदान देता येईल. लोकशाही व्यवस्थेत माध्यमांचे सशक्तीकरण आवश्यक असल्याचे प्रतिपादन दै. लोकसत्ता नागपूरचे संपादक देवेंद्र गावंडे यांनी केले.

    ज्येष्ठ पत्रकार एस.एन. विनोद म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळातील दैनिकांनी तत्कालीन ब्रिटिश व्यवस्थेवर आपल्या लेखणीतून आसूड ओढले. ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीला व कायद्याला विरोध केला. लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली. स्वातंत्र्य हाच तत्कालीन पत्रकारितेचा मुख्य उद्देश होता. स्वातंत्र्यानंतर राष्ट्राच्या नवनिर्माणाचे आव्हान पुढे उभे राहिले. राष्ट्रनिर्माणात योगदान देण्याची जबाबदारी पत्रकारांवर आली. माध्यमांना ही भूमिका सशक्तपणे बजावण्याची गरज असून लोकशाही राष्ट्रासाठी हे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

    माहिती संचालक हेमराज बागुल म्हणाले की, यंदाच्या पत्रकार दिनाचे घोषवाक्य हे ‘माध्यमांचे राष्ट्र उभारणीत योगदान’ (रोल आफ मीडिया इन नेशन बिल्डिंग) हे आहे. माध्यमांचा विकास कालानुरूप होत आहे. माध्यमांनी काळानुरूप आपली भूमिका बदलली आहे. छापखान्याचा शोध हा गेल्या काही काळातील सर्वात मोठा शोध आहे. छापखान्याच्या शोधानंतर धर्मग्रंथांची छपाई सुरू झाली. यातून वैचारिक मंथन व्हायला सुरुवात झाली. प्रारंभी सामाजिक परिवर्तनाला माध्यमांनी प्राधान्य दिले. माध्यमांनी केवळ प्रबोधनात्मक भूमिकेवर कायम न राहता सिंहावलोकन करीत राष्ट्रनिर्मिती हा केंद्रबिंदू ठेवायला हवा.

    श्रमीक पत्रकार संघाचे अध्यक्ष शिरीष बोरकर यांनी भाषणात स्वातंत्र्योत्तर काळातील प्रेस कमिशन आणि प्रेस कौन्सिल आफ इंडियाची कार्यपद्धती यावर प्रकाश टाकला. सोशल मीडियाची जबाबदारी निश्चित करण्यात यावी. तरुणांना पत्रकारितेत अधिकाधिक आकर्षक संधी उपलब्ध होण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

    प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संचालन निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी केले तर आभार जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी मानले.
Previous article#NAGPUR AIR FEST l CURTAIN RAISER ON AIR FEST SCHEDULED ON 19 NOV 22 AT HQ MC
Next article#Air Fest 2022 । नागपुरात शनिवारी रंगणार चित्तथरारक हवाई कसरती : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त होणार एअर शो
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).