डॉ. सलील कुलकर्णी यांची उपस्थिती : ‘माझे जगणे होते गाणे’मधून रंगणार गप्पांची मैफल
नागपूर ब्यूरो – डॉ. पी. जी. दंदे चॅरिटेबल ट्रस्टद्वारा संचालित डॉ. दंदे फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘व्हॉईस ऑफ लिटिल मास्टर्स’ या विदर्भस्तरीय गायन स्पर्धेची महाअंतिम फेरी येत्या बुधवारी (12 ऑक्टोबर) रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात होणार आहे. स्पर्धेनंतर सुप्रसिद्ध गायक-संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संस्कार भारतीच्या अध्यक्ष कांचन गडकरी असतील तर डॉ. दंदे फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. पिनाक दंदे यांची विशेष उपस्थिती असेल. दुपारी 2.30 वाजता महाअंतिम फेरी सुरू होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता पुरस्कार वितरण सोहळा होईल. ‘व्हॉईस ऑफ लिटिल मास्टर्स’ ही स्पर्धा 7 ते 16 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी तसेच शालेय शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आली.
21 सप्टेंबर ते 2 आक्टोबर या कालावधीत नागपूरसह अमरावती, अकोला, वाशीम, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर या ठिकाणी प्राथमिक फेरीचे आयोजन करण्यात आले. याशिवाय उर्वरित विदर्भातून व्हिडियोद्वारे स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थी व शिक्षक मिळून जवळपास एक हजार गायकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. यापैकी निवडक गायकांची उपांत्य फेरी येत्या 11 आक्टोबरला राष्ट्रभाषा संकुल येथील कीर्तनकेसरी शेवाळकर सभागृहात होणार आहे. यातील सर्वोत्तम 16 गायकांची महाअंतिम फेरीसाठी निवड करण्यात येईल. रोख व उत्तेजनार्थ पुरस्कारांच्या स्वरुपात 50 हजारांहून अधिक रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत.
डॉ. सलील कुलकर्णी यांच्या विद्यार्थी-पालकांशी गप्पा
महाअंतिम फेरीनंतर दुपारी 4.45 वाजता डॉ. सलील कुलकर्णी यांच्याशी गप्पा आणि त्यांच्या लोकप्रिय गाण्यांची मैफल रंगणार आहे. ‘माझे जगणे होते गाणे’ या मैफलीचे सूत्रधार कवी नितीन भट असतील. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सलील कुलकर्णी विद्यार्थी व पालकांसोबत संवाद साधतील. तसेच त्यांची लोकप्रिय गाणीदेखील सादर करतील.