मुंबई ब्युरो : दसरा मेळाव्यातल्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवरही निशाणा साधला आहे. दसरा मेळाव्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी वक्तव्य करू नका असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्याचा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला.
‘बोलण्याची पंचाईत होते, कारण उपमुख्यमंत्र्यांना कायदा खूप कळतो. मुख्यमंत्री असताना ते मी पुन्हा येईन म्हणाले, पुन्हा येऊन दीड दिवसांमध्ये विसर्जन झालं. आता मन मारून उपमुख्यमंत्री झाले आहेत. आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही डुकरं पाळायची. हाच जर तुमचा कायदा असेल तर जाळून टाकू,’ अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
अमित शहा हे देशाचे गृह मंत्री आहेत की भाजपचे घरगुती मंत्री आहेत? इकडे जातात तिकडे जातात आणि सरकार पाडतात. आम्हाला जमीन दाखवाल, पण पाकव्याप्त काश्मीरची एक फुट जमीन आणून दाखवा. आम्ही तुम्हाला खांद्यावर घेवून नाचू, पण तिकडे शेपट्या घालतात आणि इकडे नखं दाखवतात, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांना दिलं.
‘नगरसेवकांना धमकावतात, सलून काढलं आहे केसेस काढायचं. मी सांगतो शांत राहा म्हणून हे शांत आहेत, त्यांना पिसाळायला लावू नका. माझ्या शिवसैनिकांना त्रास दिला तर तुमचा कायदा मांडीवर घेऊन कुरवाळत बसा,’ असा निशाणा उद्धव ठाकरे यांनी साधला.