Home Education #Pune | देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्यासाठी युवकांनी सहभाग वाढवावा

#Pune | देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्यासाठी युवकांनी सहभाग वाढवावा

515

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या १२ व्या भारतीय छात्र संसदेचा समारोप समारंभ

पुणे ब्यूरो : समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा पोहचविण्याबरोबरच देशाच्या अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी आणण्यासाठी युवकांनी सहभाग वाढवावा. अशी अपेक्षा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. तसेच सोशल मीडियामुळे वाढणार्‍या नकारात्मकतेच्या भावनेला ही वेळीच आवर घालून सकारात्मकता वाढीवर भर दयावा. असे त्यांनी सूचित केले.

भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १२व्या भारतीय छत्र संसदेच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

यावेळी लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन, लोकसभेच्या माजी सभापती मीरा कुमारी, राज्याचे युवा आणि ग्रामिण विकास मंत्री गिरीश महाजन आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड होते.

तसेच, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, प्रा.शरदचंद्र दराडे पाटील, मंगेश जाधव हे उपस्थित होते. याच कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून मनोगत व्यक्त केले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करीत आहोत. त्याच बरोबर लोकशाहीचा उत्सव देखील साजरा केला जात आहे. लोकशाहीला बळकट करणारी युवा पिढी माझ्या समोर आहे याचा मला आनंद आहे. आपल्या देशाला मोठी परंपरा आहे आणि सभ्येतेचे प्रतिक म्हणून देशाकडे पाहिले जाते हे लक्षात घेता युवा पिढीने विकसीत आणि विश्वगुरूची संकल्पना जगासमोर पुन्हा एकदा आणावी. यामध्ये सर्वाचा सहभाग असावा. सोशल मीडियाच्या वापरामुळे तयार होणार्‍या नकारात्मक भावनेला वेळीच आवार घालायला हवा. त्याच बरोबरच सकारात्मक भावनेतून देशाच्या बळकटीसाठी प्रयत्न करा. कोणताही देश हा मूल्य संस्कृती कष्टाच्या आधारावर मोठा होता.

समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा पोहचली पाहिजे आणि या मध्ये युवा पिढी महत्वाची भूमिका बजावू शकते असे नमूद करून त्यांनी सांगितले की देशाची अर्थव्यवस्था अधिक शक्तीशाली होण्यासाठी युवकांनी प्रयत्नशील रहावे असे आवाहन त्यांनी केले. भ्रष्टाचाराला कोणताही थारा मिळता कामा नये आणि भष्ट्राचारी लोकांना निवडून देऊ नका असे त्यांनी सांगितले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, आधुनिक विज्ञान आणि अध्यात्म याचा संगम या उपक्रमाच्या माध्यमातून झालेला आहे. हे दोन महत्वाचे घटक आहे. आणि यातूनच देशाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे. युवकांनी जीवनामध्ये ध्येय समोर ठेवतांना दुर्दम्य आशावाद बाळगला पाहिजे. आज निराशजनक बाबींवर प्रकाश टाकला जातो आहे. हे अयोग्य आहे. राजनितीला आपण दूर ठेऊ शकत नाही. पण त्याच बरोबर युवकांनी लोकशाहीचा स्वीकार करून कार्यरत रहावे.जीवनात कधीही निराश होऊ नका. नव भारताच्या निर्मितीसाठी प्रयत्नशील रहा.असे आवाहन त्यांनी केले.

सुमित्रा महाजन म्हणाल्या, युवकांनी काम करतांना प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. हे लक्षात ठेऊन कार्य करावे. त्याचबरोबर वरिष्ठाबरोबर सतत संवाद ठेऊन अनुभवांची देवाण घेवाण करायला हवी. आपले जर मन शुद्ध असले तर राजकारणात देखील यशस्वीपणाने काम करता येऊ शकते. केवळ पदासाठी नाही तर राष्ट्रसाठी काम केले तर यश तुमचे आहे हे लक्षात ठेवा. व्यक्तीमत्व विकासबरोबरच चारित्र्याचे संवर्धन करण्यावर भर दयावा. उंचीवरील पदावर जाण्याासाठी अंगी गुण असावेत त्याला कर्तृत्वाची जोड दयायला हवी.

गिरीश महाजन म्हणाले, देशात युवकांची संख्या मोठी आहे. या शक्तीला संघटीत करून योग्य दिशेने नेण्याचे काम संस्थेच्या उपक्रमातून करण्यात येत आहे हे नक्कीच स्वागतार्ह आहे. राजकारणामध्ये कोणी कधीच निवृत्त होत नाही म्हणूनच युवकांनी पुढे येण्याची गरज आहे. राजकारणामध्ये येण्यास फारसे कोणी उत्सुक नसतो ही विचारसरणी बदलण्यासाठी युवकांनी काम करावे.अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 

मीरा कुमारी म्हणाल्या, सामाजिक समरसता संकल्पना व्यापक करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा. त्याअंतर्गत महिलांचा सन्मान सर्वांना समानतेची वागणूक अशा गोष्टींचा प्रसार केला जावा. यासाठी सकारात्मक विचार सरणीची गरज आहे. ही विचारसरणी प्रत्येक्षात यावी. यासाठी देखील युवकांनी प्रयत्न करावे असे त्या म्हणाल्या.

डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, गेली तीन दिवस सुरू असणारा हा केवळ इन्व्हेन्ट नाही तर ही एक विचारांची चळवळ आहे. भारतामध्ये संकल्पनांचा दुष्काळ नाही मात्र त्यात प्रत्येक्षात आणण्यासाठी इच्छाशक्ती असायला हवी. ही इच्छा शक्ती युवकांनी स्वीकारून पुढे न्यावी. त्यासाठी कष्टाची तयारी डोळ्यासमोर नेमके ध्येय, प्रत्यक्षात आणण्याची ईच्छा शक्ती आणि नेतृत्व गुण अंगी बाळगणे महत्वाचे आहे.

प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, भारतीय संस्कृती, तत्वज्ञान आणि परंपरा हे देशाचे वैभव आहे. तसेच अध्यात्म आणि विज्ञान यांचा संगम आपल्याला अनुभवास येतो या मुळेच युवकांना सकारात्मक दिशा देण्याचा प्रत्यन संस्थेच्या वतीने गेली अनेक वर्षे केला जात आहे. ही जवाबदारी युवा पिढीने स्वीकारून पुढे नेण्याचा प्रयत्न करावा. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यासाठी त्यांनी रोल मॉडेल म्हणून कार्यरत रहावे.

राहुल विश्वनाथ कराड म्हणाले, सर्व राजकीय नेते हे भ्रष्ट नाहीत. त्यामुळे तरूणांनी राजकारणात सक्रिय सहभाग घ्यावा. भारतीय छात्र संसदेच्या माध्यमातून चांगले व सुशिक्षीत नेते समाजाला देण्याचा प्रयत्न केला जात आहे. समाजाचा आणि देशाच्या सर्वांगिण विकासामध्ये युवकांचे योगदान मोलाचे असणार आहे.

एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू प्रा.डॉ. रवी चिटणीस यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा.डॉ. गौतम बापट यांनी केले. डॉ. के. गिरीसन यांनी आभार मानले.

Previous article#Pune | मुस्लीम भगिनींना समान नागरी संहितेचा फायदाच होईल
Next articleजगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या सुवर्णजडीत मंदीर निर्मितीसाठी खुल्या हृदयाने दान करावेः खासदार श्रीनिवास पाटील यांचे आवाहन
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).