Home Police 90 कोटींचा बिटकॉइन घोटाळा । पोलिसांच्या तांत्रिक सल्लागारांचा डल्ला, जप्त केलेले डिजिटल...

90 कोटींचा बिटकॉइन घोटाळा । पोलिसांच्या तांत्रिक सल्लागारांचा डल्ला, जप्त केलेले डिजिटल चलन वळवले आपल्या खात्यांवर

पुणे ब्युरो : सायबर पोलिसांनी जप्त केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या क्रिप्टोकरन्सीवर पोलिसांच्या दोन तांत्रिक सल्लागारांनीच डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाचे धागेदोरे एका तत्कालीन बड्या अधिकाऱ्यापर्यंत गेले असून यापैकी काही कोट्यवधी रुपये संबंधित अधिकाऱ्याच्या खात्यातही वळते करण्यात आल्याचा संशय आहे. याप्रकरणी ग्लोबल ब्लॉकचेन फाउंडेशनचे पंकज प्रकाश घोडे व केपीएमजीचे रवींद्र प्रभाकर पाटील या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी जप्त केलेल्या क्रिप्टोकरन्सीची सध्याची किंमत ९० कोटी रुपये असून हा घोटाळा शेकडो कोटींचा असल्याचा पोलिसांना संंशय आहे. देशात क्रिप्टोकरन्सी फसवणुकीचा पहिला गुन्हा सन २०१८ मध्ये पुण्यात दाखल झाला होता. या गुन्ह्यात कोट्यवधी रुपयांचे मूल्य असलेले बिटकॉइन आणि इथरम हे दोन प्रकारचे डिजिटल चलन जप्त करण्यात आले होते. याचा छडा लावण्यासाठी पुणे पोलिसांनी पंकज घोडे आणि रवींद्र पाटील या दोन तांत्रिक तज्ज्ञांची मदत घेतली होती, परंतु या दोघांनी पोलिसांचीच दिशाभूल करीत (२४१.४७८५८०५५ बिटकॉइन्स आणि ९४.२५४१२४ इथरम आणि बिटकॉइन कॅश) करन्सी आपल्या आणि काही साथीदारांच्या वॉलेटमध्ये वळवली. या दोघांना शनिवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्यांना ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. हे प्रकरण तत्कालीन पुणे पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या कार्यकाळातील आहे.

 

पंकजने ब्लाॅकचेनचे बनावट स्क्रीन शॉट्स केले तयार

पंकज घोडेने करन्सी जप्त करतानाच आरोपींच्या ब्लॉक चेनचे बनावट स्क्रीन शॉट्स तयार केले. पोलिसांनी जप्त केलेला डेटा वापर करताना आरोपींच्या वॉलेटमधील पूर्ण करन्सी जप्त न करता त्यातील काही करन्सी तशीच ठेवून दिली. तपास अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी आरोपींच्या वॉलेटचे बनावट स्क्रीन शॉट्स खरे असल्याचे सांगितले. त्यातील कोट्यवधी रुपये मग स्वत:च्या आणि साथीदारांच्या वाॅलेटमध्ये वळते केले.

यांनी केली कारवाई

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, आर्थिक व सायबर उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक चिंतामण, मीनल सुपे-पाटील, राजूरकर, खेडकर, कोळी, भोसले, भापकर, नलावडे, सहायक पोलिस निरीक्षक वाळके, उपनिरीक्षक नेमाणे, डफळ, पडवळ, व अंमलदार तसेच न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील तज्ज्ञ अधिकारी तेजस कट्टे, तनुजा सूर्यराव, राहुल कनोज व गायकवाड या पथकाने ही कारवाई केली.

पोलिसांना केवायसीवरून लागला सुगावा

आरोपींच्या केवायसीची (ग्राहकाची तपशीलवार माहिती) पडताळणी करताना पोलिसांना संशय आला. कारण त्यातील रक्कम इतर ठिकाणी वळवताना ती कोणत्या वॉलेटमध्ये वळवली गेली याचीही सविस्तर माहिती पोलिसांच्या हाती आली आणि पंकज आणि रवींद्रसह इतरांच्या वॉलेटमध्ये हे कोट्यवधीचे चलन जमा झाल्याचे सायबर पोलिसांना दिसून आले. रवींद्र पाटील हा सन २००४ चा जम्मू-काश्मीर केडरचा आयपीएस अधिकारी आहे. त्याने चार वर्षांतच स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यानंतर केपीएमजी या संस्थेत कामास होता.

पाटीलने वॉलेटमध्ये वळवली रक्कम

तपास अधिकाऱ्यांनी जप्त केलेला तांत्रिक डेटा मोठ्या विश्वासाने पंकज घोडे आणि रवींद्र पाटीलकडे सुपूर्द केला. रवींद्र पाटील याने तांत्रिक डेटाचा गैरवापर करून आंतरराष्ट्रीय क्रिप्टो एक्स्चेंजच्या वॉलेटमधून ही करन्सी स्वत:च्या आणि इतर साथीदारांच्या क्रिप्टोकरन्सी वॉलेटमध्ये वळती केली.

आयपीएस अधिकारी अडचणीत

क्रिप्टोकरन्सी घोटाळा करणाऱ्या तंत्रज्ञांपैकी एका आरोपीची पुणे पोलिस आयुक्तालयातील एका आयपीएस अधिकाऱ्यासोबत उठबस होती. याच आरोपीने काही बिटकॉइन्स संबंधित अधिकाऱ्याच्या वॉलेटमध्येही वळते केल्याचे सांगितले जाते. पोलिस आता त्याचा छडा लावत आहेत.

काय आहे नेमके प्रकरण

क्रिप्टोकरन्सीत गुंतवणुकीच्या बहाण्याने अनेकांची फसवणूक केल्याप्रकरणी सन २०१८ मध्ये दत्तवाडी आणि निगडी पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले होते. याप्रकरणी एकूण १७ आरोपींना अटक करण्यात आली होती. याची चौकशी पुणे आर्थिक व सायबर शाखेकडे होती. प्रकरण किचकट असल्याने तांत्रिक पुरावे व क्रिप्टो जप्त करण्यासाठी पोलिसांनी पंकज घोडे आणि रवींद्र पाटील या दोन संगणकतज्ज्ञांची मदत घेतली. आरोपींकडून २४१.४७८५८०५५ बिटकॉइन्स आणि ९४.२५४१२४ इथरम आणि बिटकॉइन कॅश जप्त केली होती.

Previous articleदेवेंद्र फडणवीसांना दिलेल्या नोटीस प्रकरणी भाजपचे आंदोलन सूरू, राज्यभरात नोटिसीची होळी
Next articleNagpur । संतापाच्या भरात पत्नी, मुलीचा गळा चिरून पतीची आत्महत्या, मुलाला जिवंत सोडले
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).